• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

माझ्यासाठी अशी संभाषणं काही नवी नव्हती. पण एका मुलीचा विषय सुरू असताना जगातील इतर मुलीही तशाच असतात हे बोलणं मला फारसं पटलं नाही.

 • Share this:
  मुंबई, 22 मार्च- काही महिन्यांपूर्वी एका मुलीचा ट्रेनमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुरुषांच्या डब्यात ती चढली आणि तिथे दारात उभी राहून ती स्टंट करत होती. अचानक तिचा हात सटकला आणि ती खाली पडणार इतक्यात इतर प्रवाशांनी तिला धरलं. पुढच्या एक- दोन दिवसांमध्ये माध्यमांनी तिला शोधून काढलं आणि तिची मुलाखतही घेतली. तिच्या त्या स्टंटचा आणि त्यानंतरच्या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. ट्रेनमध्येही पुढचे काही दिवस त्याच मुलीच्या बातमीची चर्चा होती. मी नमिता नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि अपेक्षेप्रमाणे डब्यात एका ग्रुपमध्ये त्या स्टंटबाज मुलीचीच चर्चा सुरू होती. एकीने रागानेच तिच्या मैत्रिणीला म्हंटलं की, काय गरज होती त्या मुलीला पुरुषांच्या डब्यात जाऊन असे स्टंट करायची? तिची चॅनलवर मुलाखत पाहिली तेव्हा वाटलं आता समोर असती तर मी दिली असती एक कानशिलात लगावून? हे काय संस्कार झाले का? काय ते बोलणं.. काय ते वागणं... आजकालच्या मुलींना काही ताळतम्य राहिलं नाही. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Life In लोकल ः मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- माझ्यासाठी अशी संभाषणं काही नवी नव्हती. पण एका मुलीचा विषय सुरू असताना जगातील इतर मुलीही तशाच असतात हे बोलणं मला फारसं पटलं नाही. मी त्यांना माझ्य़ापरीने लूक देत ‘मला त्यांचं बोलणं पटलेलं नाही…’ हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या लूकचा त्यांच्यावर फार परिणाम झालेला दिसला नाही कारण त्या बोलण्यात एवढ्या गुंतल्या होत्या की, आजूबाजूचं त्यांना काहीच भान नव्हतं. त्यांचं हे बोलणं मध्येच तोडतं त्यांच्याच ग्रुपमधली दुसरी मैत्रिणी म्हणाली की, ‘ती मुलगी होतीच हाताबाहेर गेलेली. पण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं का तो माणूस तिला कसा जवळ घेत होता. दोन- तीन वेळा त्याने अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा कॅमेरा सुरू असल्याचं त्याला कळलं तेव्हा त्याने लगेच तिला दूर सारलं. अशावेळीही पुरूष जात संधी सोडत नाही.’ त्यांचा हा विषय आता चांगलाच लांबणार असं मला वाटत होतं. पण इतक्यात एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारत त्यातलीच एक महिला म्हणाली की, ‘अंगलगटवरून आठवलं त्या दिवशी निलम सांगत होती तिच्या मुलीची ट्रेनमध्ये छेड काढण्याचा कोणीतरी प्रयत्न केला. पण नशिब बलवत्तर म्हणून पोलीस लगेच आले नाही तर होत्याचं नव्हतं झालं असतं..’ मग काही वेळ मुंबईत आता काही राम राहिला नाही या गोष्टीवर चर्चा केल्यानंतर अखेर त्या मंडळींची गाडी आताचं सरकार कसं आहे याविषयी चर्चा करू लागल्या. एवढं बोलून त्या थांबल्या नाहीत तर रात्री जेवणात मिठ का कमी पडलं याबद्दलही त्यांची चर्चा सुरू झाली. एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे कसं वळायचं हे तुम्हाला मुंबई लोकलमध्ये चांगलंच शिकायला मिळेल. यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स करायची गरज नाही. फक्त ऑफिसच्या वेळेतली एक ठरलेली ट्रेन पकडा आणि ग्रुप दिसेल त्यांच्या बाजूला जाऊन उभे रहा.. राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि कोहली- धोनीपासून ते सलमान खानच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल. अशी जगात एकही गोष्ट नसेल ज्याचं उत्तर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे नसेल. - मधुरा नेरुरकर
  First published: