• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने जे उत्तर दिलं त्याने डब्यात हशाच पिकला आणि नेमकी हेच त्यांच्या भांडणाचं कारण झालं.

  • Share this:
मुंबई, १६ एप्रिल- मुंबईकरांना ट्रेनची भांडणं काही नवीन नाहीत. जास्त करून भांडणं पाहिली तर ती सीटवरून, ट्रेनमध्ये चढण्यावरून, गर्दीमुळे होतात. त्याहून फार काही वेगळं कारण लोकांकडे नसतं. पण मी जे भांडण पाहिलं त्यानंतर मला खरंच प्रश्न पडला की नेमकी भांडणाचा विषय होता तरी काय.. मी कौस्तुभ समेळ आज तुम्हाला अशाच एका विचित्र भांडणाचा किस्सा सांगणार आहे, जो नेमकी कशामुळे झाला याचाच प्रश्न माझ्यासकट त्या डब्यातल्या इतरांना पडला होता. सर्वसामान्यपणे गर्दीच्यावेळी ट्रेनमध्ये हमखास भांडण होतात. मी जोगेश्वरीहून दादरला दुपारच्या वेळेत प्रवास करत होतो. ट्रेन रिकामीच होती.. प्रत्येकजण सीटवर बसले होते आणि काही मोजकेच उभे होते. इतक्यात माझ्या समोर बसलेल्या माणसाला फोन आला आणि तो फोनवर बोलू लागला. सुरुवातीला तर तो फोनवर शांतपणे बोलत होता. नंतर मात्र त्याचा आवाज वाढत गेला. आता सर्वसामान्यपणे फोनवर जोरजोरात बोलणाऱ्या माणसाकडे साऱ्यांचंच लक्ष जातं, त्याचप्रमाणे त्याच्याकडेही डब्यातल्या साऱ्यांचंच लक्ष गेलं. पण तो फोनवर भांडण्यात एवढा गर्क होता की, आपल्याकडे चार लोक पाहतायेत याचंही भान त्याला नव्हतं.. काही क्षण त्याच्याकडे पाहिल्यानंतर सर्वजण आपआपल्या मोबाइलमध्ये पाहायला लागले. त्याचंही फोनवर बोलणं झाल्यावर तो थोडावेळ शांत बसला. पण मध्येच माझ्या बाजूला बसलेल्या माणसाकडे तो रागाने पाहायला लागला. मला सुरुवातीला वाटलं की त्याला विचारांची तंद्री लागली असेल आणि तो तंद्रीमध्येच माझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहत असेल. थोडावेळ गेला नसेल तो अचानक ओरडला, 'मुझे क्या देखता है..' त्यावर माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने जे उत्तर दिलं त्याने डब्यात हशाच पिकला आणि नेमकी हेच त्यांच्या भांडणाचं कारण झालं. 'तुझे देखने के लिए तू क्या आयटम है क्या..' झालं आता त्याच्या या डायलॉगबाजीवर जर त्या माणसाने उत्तर दिलं नसतं तर हा त्याचा अपमानच असता. मग सुरू झालं त्या दोघांची हमरीतुमरी.. त्याचं झालं असं की, जेव्हा तो माणूस जोरजोरात फोनवर बोलत होता तेव्हा इतरांप्रमाणे माझ्या बाजूला बसलेली व्यक्तीही त्याच्याकडे पाहत होती पण फोन ठेवून झाल्यावर इतरांनी आपल्या कामात लक्ष घातलं पण हा मात्र एकटक त्याच्याकडे पाहतच होता. नेमकी हीच गोष्ट समोर बसलेल्या माणसाला आवडली नाही. दादर येईपर्यंत दोघांनी एकमेकांच्या सात पिढ्या खाली काढल्या होत्या. एव्हाना डब्यातले दोघांच्या भांडणाला आणि गरमीला चांगलेच वैतागले होते. शेवटी एकाने मध्यस्ती करत दोघांना शांत केलं. पण तरीही दोघांमधली धुसफूस मी उतरेपर्यंत सुरूच होती. माणूस कोणता राग कुठे काढेल याचा काही नेम नाही. आपल्याकडे एक माणूस पाहतोय याचा राग एखाद्याला एवढा येईल आणि ते भांडणं अगदी मारामारीपर्यंत जाईल याचा मी कधी विचार केला नव्हता पण आता प्रत्यक्ष पाहिल्यावर कळलं की ट्रेनमध्ये कोणत्याही कारणामुळे भांडण होऊ शकतं आणि ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतं. - मधुरा नेरुरकर
First published: