Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

मी आमोद परांजपे. त्या दिवशी करी रोडला मी असा काही अनुभव घेतला की त्यानंतर हसावं की रडावं.. चिडावं की सोडून द्यावं अशी काहीशी मनाची स्थिती झालेली.

  • Share this:

मी आमोद परांजपे. त्या दिवशी करी रोडला मी असा काही अनुभव घेतला की त्यानंतर हसावं की रडावं.. चिडावं की सोडून द्यावं अशी काहीशी मनाची स्थिती झालेली. नेहमीप्रमाणे मी ऑफिसचं काम आटपून संध्याकाळी करी रोडहून अंबरनाथला जाणारी ट्रेन पकडत होतो. माझी ट्रेन यायला अजून वेळ होता. त्याआधी कल्याण लोकल जाणार होती.

नेहमीप्रमाणेच ट्रेनला तुफान गर्दी होती. ही गर्दी प्रत्येक ट्रेननुसार वाढत होती.

माझी ट्रेन यायला अवकाश असल्यामुळे मी गर्दीपासून थोडा मागेच उभा होतो. नेहमीप्रमाणे मोबाइलमधली गाणी ऐकत निवांत उभा होतो. अचानक माझ्या बाजूला एक जोडपं येऊन थांबलं. डोक्यावरून पदर घेतलेली बाई होती. तिच्या हातात रांगताही येत नसलेलं बाळ होतं. तर नवऱ्याच्या हातात प्रवासाच्या बॅग हत्या. त्यांच्याकडे पाहिलं की कोणीही अंदाज बांधू शकत होता की ते कल्याण येथून कुठेतरी बाहेरगावी जात होते. दोघांमध्ये वेगळ्या भाषेत संभाषण सुरू होतं. मी एरव्ही कधी लक्ष दिलं नसतं पण त्यांचं बाळ सतत माझ्याकडे पाहत होतं. त्यामुळे मीही त्याच्याशी खेळत होतो. इतक्यात कल्याण ट्रेन येणार असल्याची घोषणा झाली.

गर्दी तर चांगलीच वाढली होती. हे ट्रेनमध्ये कसे चढतील हाच प्रश्न मला पडला. कारण मुंगी चढायलाही त्या ट्रेनमध्ये जागा नसणार याची कल्पना मला होती. ट्रेनला दोन मिनिटं असताना त्या माणसाने बायकोच्या हातातलं बाळ आपल्या हातात घेतलं आणि त्याच्या हातातल्या पिशव्या बायकोकडे दिल्या.

ती बाळाला स्वतःकडेच ठेवायला पाहत होती पण नवरा ऐकत नाही म्हटल्यावर तिने कोणताही वाद न घालता बाळाला नवऱ्याच्या हातात दिलं. मी त्या बाळाकडे पुन्हा एकदा पाहिलं. ते माझ्याकडे पाहून हलकसं हसलं. त्या पाच मिनिटांत जणू आमच्यात एक नातं तयार झालं. त्या बाळाकडे पाहतच मी त्याच्या वडिलांना म्हणालो, 'यावेळच्या ट्रेनने जाऊ नका.

गर्दी खूप असते. तुम्हाला आतही शिरता येणार नाही. त्यात एवढं लहान बाळ तुमच्याकडे आहे.'

माझ्या या बोलण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्याने माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तशी प्रवाशी ट्रेनमध्ये स्वतः ला जागा मिळवण्यासाठी सज्ज झाले. माझा जीव वरखाली होत होता, पण मी काही करू शकत नव्हतो. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली तशी गर्दीने ट्रेनमध्ये घुसायचा प्रयत्न केला. मुंबईकरांना ट्रेन कशी पकडायची हे वेगळं सांगायला नको. ते कदाचित त्यांच्या रक्तातच असतं. पण बाहेरून येणाऱ्यांचं मात्र तसं नसतं. त्यांना याची सवय नसते. या जोडप्याचंही तसंच झालं. ट्रेनमध्ये प्रवाशी चढल्यानंतर ते चढण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यश काही आलं नव्हतं. अखेर ट्रेन सुटली. मला वाटलं हे ट्रेन पकडणार नाहीत. इतक्यात तो नवरा छोट्या मुलाला घेऊन ट्रेनच्या मागे पळायला लागला. त्याची बायकोही त्याच्या मागे पळत होती. प्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात त्याचा धावताना तोल गेला आणि तो पडला. जसा तो पडला तिथल्या सर्वांनी एकच ओरड मारली. त्याच्याबरोबर ते बाळही पडणार असतं. एवढ्यात तिथे उभ्या असलेल्या पोलिसाने मुलाला एका हाताने झेललं. तर इतर प्रवाशांना त्या माणसाला वेळीच सावरलं. नाहीतर दोघेही ट्रेनखाली गेले असते.

त्याची बायको सामानाच्या वजनामुळे चार पावलंही चालू शकली नव्हता. पण घडलेला प्रकार पाहून ती चांगलीच घाबरली. या सगळ्या गदारोळात त्यांची ट्रेन सुटली होती. याचा राग त्याने पोलिसांवर काढला. तिथल्या प्रवाशांना कळलंच नाही की हा का संतापला. पोलिसाने पकडल्यामुळे त्याची ट्रेन चुकली होती असा अजब आरोप त्याने केला. तो चक्क त्या पोलिसाशी भांडत होता.

शेवटी प्रवाशांनी मध्यस्थी घेतली आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो काही केल्या ऐकत नव्हता. शेवटी तो पोलिसही वैतागला आणि त्याने माफी मागत प्रकरण संपवणंच योग्य समजलं.

- मधुरा नेरुरकर

First published: April 5, 2019, 10:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading