Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

अकलूजवरून कामानिमित्त मी मुंबईत पहिल्यांदा आलो. ट्रेनचा प्रवास काय असतो.. वेस्टर्न लाइन, सेंट्रल लाइन, हार्बर लाइन काय असतं याचा मला थांगपत्ताही नव्हता.

  • Share this:

मुंबई, २५ एप्रिल- मुंबई आणि ट्रेन हे एक वेगळंच रसायन आहे. दररोज लाखो लोक यातून प्रवास करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात. यातून प्रवास करणारा प्रत्येकजण भविष्यातली स्वप्न पाहत असतो तर काही वर्तमानात चाललेल्या गोष्टींचा विचार करत असतात. मीही त्यांच्यापैकीच एक होतो. १० वर्षांपूर्वी अकलूजवरून कामानिमित्त मी मुंबईत पहिल्यांदा आलो. ट्रेनचा प्रवास काय असतो.. वेस्टर्न लाइन, सेंट्रल लाइन, हार्बर लाइन काय असतं याचा मला थांगपत्ताही नव्हता. नोकरी निमित्ताने मी वयाच्या २२ व्या वर्षी मुंबईत आलो. सीेएसटीला उतरलो आणि मित्राच्या घरी कुर्ल्याला गेलो. सकाळी ७ ची वेळ होती. न्यूज चॅनलमध्ये आतापर्यंत पाहिलेल्या मुंबईचा आज मी एक भाग झालो होतो.

सीएसटी ते बदलापूर प्रवासच मला थकवणारा होता. उलटा प्रवास असल्यामुळे गर्दी तशी नव्हतीच. पण, ट्रेनचा तो एक दीड तासाचा प्रवास संपणारच नाही असं वाटत होतं. लोक कसा एवढ्या लांबून प्रवास करतात.. मला शक्य होईल का.. असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू होते. दुपारी १२ वाजता लोअर परेलला एका ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला जायचं होतं. त्यामुळे किमान १० वाजता कुर्ल्याहून निघण्याचा मी विचार केला.

मित्राकडे जाऊन माझी बॅग ठेवली आणि मुलाखतीला जाण्यासाठी तयारी करून मी १० ला घर सोडलं. माझ्या मित्राने कोणत्या प्लॅटफॉर्मवरून कोणती ट्रेन पकडायची याची माहिती दिली. मी अगदी ठरल्याप्रमाणे तिकीट काढलं आणि ट्रेनची वाट पाहत होतो. तेव्हा अचानक अनाउन्समेन्ट करण्यात आली की माझी ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. मी धावत जाऊन ट्रेन पकडणार इतक्यात ती ट्रेन सुटली. यानंतरची ट्रेनही याच प्लॅटफॉर्मवर येईल म्हणून मी ट्रेनची वाट पाहत तिथेच उभा राहिलो.

माझ्या बाजूला एक कॉलेजला जाणाऱ्या वयाचा मुलगा उभा होता. त्याला मी सीएसटीकडे जाणारी ट्रेन इथेच येणार का असं विचारलं तर त्याने हो असं उत्तर दिलं. ट्रेन आली आणि मी त्या ट्रेनमध्ये चढलो. त्या मुलाने मला शेवटचं स्थानक करी रोड आहे असं सांगितलं.

त्या मुलाच्या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि शेवटचं स्टेशन येण्याची वाट पाहत राहिलो. आतासारख्या तेव्हा ट्रेनमध्ये अनाउन्समेन्ट होत नसल्यामुळे पुढचं स्टेशन काय येईल याची मला कल्पनाच नव्हती. रात्रभर आणि दिवसाही प्रवास घडल्यामुळे मला ट्रेनमध्ये झोप लागली. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा माझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने मला उठवलं. तो मला म्हणाला, 'उठा कर्जत आलंय.. रिकामी झाली ट्रेन...' त्याचे ते शब्द माझ्या कानात गरम तेल ओतल्याचा अनुभव मला देत होते.

त्या मुलाने माझ्यासोबत मस्करी केली होती. पण त्याच्या मस्करीमुळे माझी नोकरी गेली होती. ट्रेनमधून प्रवास करणारा माणूस कोणत्या हेतूने.. कशासाठी.. प्रवास करतो याची कल्पना नसतानाही माणसं एखाद्याच्या आयुष्याशी कसं खेळू शकतात हाच प्रश्न मला पडला. मुंबईतला माझा पहिल्याच दिवसाचा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता.

-मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading