प्राण्यांसाठी तयार झालेली जगातील पहिली कोरोना लस आहे तरी कशी?

प्राण्यांसाठी तयार झालेली जगातील पहिली कोरोना लस आहे तरी कशी?

कार्निव्हॅक - सीओव्ही (Carnivak-Cov) ही प्राण्यांसाठीची कोरोना लस (Corona vaccine for animal) विकसित केल्यानंतर त्याची मागणीही होऊ लागली आहे.

  • Share this:

मॉस्को, 04 एप्रिल : माणसांसाठी जगातली पहिली कोरोना लस देण्याचा दावा करणाऱ्या रशियाने अलीकडेच घोषणा केली की, तिथं जनावरांसाठीही जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine for animals) विकसित करण्यात आली आहे. त्या लशीची नोंदणी करण्यात आली आहे. या विषाणूत स्वतःहून होणारे जनुकीय बदल म्हणजेच म्युटेशन रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं रशियन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या लशीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन एप्रिल महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.

कार्निव्हॅक - सीओव्ही (Carnivak-Cov) असं त्या लशीचं नाव असून, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कुत्रे, मांजरं, कोल्हे आणि अन्य जनावरांवर तिची चाचणी घेण्यात आली आहे. तसंच त्या चाचण्या यशस्वीही झाल्या आहेत.

रोसेलक्होज्नेड्जोर या कंपनीने ही लस विकसित केली आहे. या कंपनीचे उपप्रमुख कोन्सतान्तिन सेवनकोव यांचं म्हणणं आहे, की लस देण्यात आलेल्या सगळ्या जनावरांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या. ही जगातली अशी पहिली आणि एकमेव लस आहे, की जी प्राण्यांमधलं कोविड संक्रमण रोखू शकेल.

हे वाचा - Corona vaccination : लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाचा संसर्ग का होतो?

डेन्मार्कमध्ये (Denmark) गेल्या वर्षी केवळ कसला तरी संसर्ग सापडला म्हणून दीड कोटी मिंक (Mink) प्राणी नष्ट करण्यात आले होते. त्याचं उदाहरण रोसेलक्होज्नेड्जोर या कंपनीने दिलं आणि सांगितलं, की ही लस विकसित केल्यामुळे जनावरांमध्ये कोरोना विषाणूचं म्युटेशन (Mutation) होण्यास प्रतिबंध होईल आणि जनावरांमधून माणसांमध्ये संक्रमण होण्याचा धोकाही टाळता येऊ शकेल. विषाणूच्या म्युटेशनची वाढ या लशीमुळे रोखली जाईल, असं शास्त्रज्ञांनी सांगितल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं.

मागणी येऊ लागली

कार्निव्हॅक - सीओव्ही (Carnivak-Cov) ही प्राण्यांसाठीची कोरोनाप्रतिबंधक लस विकसित केल्यानंतर ग्रीस, पोलंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, कॅनडा आणि सिंगापूरमधल्या प्राणिपालन केंद्रांकडून, तसंच खासगी कंपन्यांकडून लस विकत घेण्यात रस दाखवण्यात येऊ लागला आहे. सेंट पीटर्सबर्ग हे रशियातलं एक मोठं शहर. या शहरातल्या सैन्याधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे, की सैन्यातल्या श्वानांना ही लस देणं अनिवार्य केलं जाणार आहे. मे महिन्यात होऊ घातलेल्या जागतिक पातळीवरच्या कार्यक्रमांअगोदर हे काम पूर्ण केलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

पशुचिकित्सक आणि फर उत्पादकांची भूमिका मात्र थोडी वेगळी आहे. लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मॉस्कोतल्या एका व्हेटर्नरी क्लिनिककडून (Veterinary Clinic) सांगण्यात आलं, की या लशीसंदर्भातल्या अधिक माहितीची ते वाट पाहत आहेत. सध्या तरी कुत्रे (Dogs) आणि मांजरांना (Cats) लस देण्याचं कोणतंही कारण त्यांना दिसत नाही.

हे वाचा - कोरोनानंतर आता Mad Cow Disease चं संकट; काय आहेत याची लक्षणं आणि कारणं?

त्या क्लिनिकचं असं म्हणणं आहे, की प्राणी कोविड-19चे वाहक (Carrier) आहेत, असा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. तसंच, रशियाच्या फर उत्पादकांकडे असलेल्या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं फर ब्रीडिंग असोसिएशनचे प्रमुख नादजेहदा जुबकोवा यांनी सांगितलं. नादजेहदा जुबकोवा यांनी असंही सांगितलं, की काही प्राण्यांना चाचणीदरम्यान लस देण्यात आली होती आणि ते प्राणी आता व्यवस्थित आहेत. ती लस चांगली आहे. जुबकोवा यांच्या असोसिएशनमध्ये सहभागी असलेल्या फार्ममध्ये एकूण 20 लाख प्राणी आहेत. त्यात मिंक आणि कोल्ह्यांचाही समावेश आहे.

रशियाने या लशीची देश-विदेशात जाहिरात करणं सुरू केलं आहे; मात्र पाश्चिमात्य देशांत आणि काही प्रमाणात रशियातही त्या लशीबद्दल संशयाचं वातावरण आहे.

First published: April 4, 2021, 7:51 AM IST

ताज्या बातम्या