पावसाळ्यात आजार वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढलेली असते. त्यामुळे आजारांपासून वाचण्यासाठी,आपण स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. थोडासाही निष्काळजीपणा आपल्या संपूर्ण कुटुंबाला आजारी पाडू शकतो. किचनप्रमाणे फ्रीजची स्वच्छता महत्वाची असते. कारण आपण खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असतो.
रेफ्रिजरेटर व्यवस्थित साफ न केल्यास,अन्न पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. कधीकधी फ्रीज इतका खराब होतो की, त्याला खराब वास येऊ लागतो.
अशा परिस्थितीत फ्रीजची साफसफाई योग्य वेळी केली पाहिजे. फ्रीज सहजपणे साफ करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊयात.
फ्रिज साफ करण्यापूर्वी पूर्णपणे रिकामा करून बटण बंद करा. सर्व भाज्या आणि फळं हवेशीर ठिकाणी ठेवा. फ्रिजच्या खाली जाड कापड आणि कागद घाला. आता फ्रिज डी-फ्रॉस्ट करा. यामुळे फ्रिजमधून बाहेर पडणारं पाणी पसरणार नाही.
फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस मिसळा, त्याने फ्रीजचा आतला भाग पुसून टाका.
फ्रीज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. एका भांड्यात थोडं गरम पाणी घाला आणि त्यात मीठ घाला आणि कपड्याच्या साहाय्याने फ्रीज स्वच्छ करा.
फ्रीजमधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि चांगले धुवा. कोरडे झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. लसूण कधीही फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. त्याचा वास फ्रीजमध्ये पसरतो.
फ्रीजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवा. साफ केल्यावर फ्रीजमधून वास येत असेल तर फ्रीज व्हिनेगरने साफ करा.