वाढलेलं वय, त्यात इतर आजार यामुळे वयस्कर व्यक्तींना कोरोनाशी लढताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. ऑक्सिजन, वेंटिलेटरची गरज पडते. पण शंभरी पार दाम्पत्याने मात्र कमालच केली. घरीच उपचार घेऊन त्याने कोरोनावर मात केली आहे.
कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्याच्या तंबरागुड्डी गावात राहणारे 103 वर्षांचे एरेन्ना आणि 101 वर्षांच्या एरेम्मा या नवरा-बायकोचा 15 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे त्यांनी घरीच स्वतःला आयसोलेट केलं आणि उपचार घेतले.
12 दिवसांतच या दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनाविरोधातील लढा यशस्वी केल्याने या दाम्पत्याच्या कुटुंबानेच नव्हे तर शेजाऱ्यांनीही आनंद साजरा केला आहे.
या दीर्घायुष्याचं रहस्य काय याबाबत अनेक जण या दाम्पत्याला विचारतात. चांगलं आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारच महत्त्वाचे आहेत. आम्ही साधं अन्न खातो आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतो. माझ्या तरुणपणात मी खूप कष्ट केलं आहेत. जर तुम्ही हृदयापासून आनंदी असाल तर तुम्हाला कशामुळेच नुकसान पोहोचणार नाही, असं एरप्पा यांनी सांगितलं.
तर एरम्मा सांगतात, आम्ही हेल्दी कसं राहतो पण आमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत. पण आमच्याकडे जे आहे, त्यात आम्ही समाधानी आहोत. देवाच्या कृपेने इतकी वर्षे आम्ही एकत्र आहोत.
त्यांचे शेजारी जयम्मा यांनी सांगितलं, या दोघांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना जे कोरोना नियम सांगितला, त्याचं तंतोतंत पालनं केलं. त्यामुळेच ते बरे झाले.
या दाम्पत्याला 7 मुलं आहेत. आपली मुलं, नातवंडं आणि पतवंडांसोबत ते राहतात. जर इतके वयस्कर लोक बरे होऊ शकतात तर तरुणांनी घाबरण्याची काय गरज आहे, प्रत्येकासाठी हे दाम्पत्य एक प्रेरणा आहे.