मुंबई 11 जून : आरोग्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. गरजेइतकं पाणी प्यायल्यास आरोग्य चांगलं राहतं. हायड्रेटेड राहण्यामुळे आपला मेंदू जास्त अलर्ट राहतो, त्वचा चमकदार होते, शिवाय शारीरिक कार्यक्षमतादेखील वाढते. काही जणांना रात्री बाटलीत ठेवलेलं पाणी सकाळी पिण्याची सवय असते. त्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात, हे जाणून घेऊ या. 1. आयुर्वेदामध्येही पाण्याचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होतेच. शिवाय शरीरातले विषारी पदार्थही बाहेर पडतात. 2. काही जणांना पाण्याची बाटली सतत जवळ बाळगण्याची सवय असते. काही जण रात्रीदेखील उशाजवळ पाण्याची बाटली भरून ठेवतात आणि ते पाणी रात्री किंवा सकाळी पितात. हे असं बाटलीमध्ये दीर्घकाळ भरून ठेवलेलं पाणी आरोग्यासाठी योग्य आहे का, असा प्रश्न यातून निर्माण होतो. 3. बाटलीमध्ये जास्त काळ ठेवलेल्या पाण्याची चव नळाच्या किंवा फिल्टरच्या पाण्याच्या तुलनेत वेगळी लागते. कार्बन डायऑक्साइडमुळे या पाण्याच्या चवीत बदल होतो. रिसर्चर्सच्या अभ्यासानुसार, 12 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ पाणी झाकण नसलेल्या बाटलीत किंवा भांड्यात भरून ठेवल्यास त्यात अणूच्या पातळीवर बदल होतात. 4. झाकण नसलेली बाटली किंवा उघड्या भांड्यातलं पाणी प्यायल्यास त्याच्या रीमवरचे जिवाणू पाण्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. सतत अशा प्रकारे पाणी प्यायलं गेल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नेहमी नळाचं किंवा फिल्टरचं पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अर्ध्या रात्री तहान लागत असेल, तर आपल्या उशाशी पाणी झाकून ठेवावं आणि प्यावं. 5. सतत एकाच भांड्यातलं किंवा बाटलीतलं पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण, त्याच्या तळाशी बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचं भांडं किंवा बाटली नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. 6. वाहतं पाणी किंवा उघड्यावरचं पाणी न पिण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. कारण, अशा पाण्यामध्ये घाण आणि माती असण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारचं पाणी प्यायल्यास डायरिया, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी सामान्य तापमान असलेलं स्वच्छ पाणी प्यायलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.