मुंबई, 13 जानेवारी : मानवी मन आणि मेंदूची क्षमता या गोष्टींचं गूढ अजूनही पूर्णपणे उकलेलं नाही. प्रत्येक माणसामध्ये खास गुणवैशिष्ट्यं असतात. अर्थात प्रत्येकाला याची जाणीव असतेच असं नाही. काही व्यक्ती कोणत्याही यंत्राच्या वापराविना आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात किंवा त्यांचे विचार जाणून घेतात. काही व्यक्तींना भविष्यातल्या एखाद्या घटनेची जाणीव होते. या क्षमतेला टेलिपॅथी असं म्हणतात. ही क्षमता सर्वांकडे असते; पण प्रत्येकाला ती जाणवते असं नाही. टेलिपॅथीसारखी गोष्ट खरी असते का, या शक्तीच्या आधारे एखादा मेसेज पोहोचवता येतो का असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. अनेकदा आपल्या बाबतीत असं काही घडतं, ज्याची जाणीव आपल्याला काही पूर्वीच झालेली असते. कधीकधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची खूप आठवण येत असते आणि अचानक त्याच वेळी त्या व्यक्तीचा फोन येतो. अशा वेळी आपल्याला आश्चर्य वाटतं आणि योगायोग समजून आपण या गोष्टी विसरून जातो. प्रत्येक वेळी हा केवळ योगायोग असतोच असं नाही. कोणत्याही उपकरणाशिवाय आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणं, इतरांचे विचार समजून घेणं किंवा एखादी घटना घडण्यापूर्वीच तिची जाणीव होणं याला टेलिपॅथी म्हणतात. टेलिपॅथीविषयी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण यासंबंधीचं महाभारतातलं उदाहरण पाहू या. महाभारत काळात संजयकडे एक विशेष क्षमता होती. याद्वारे त्याने धृतराष्ट्राला दूरवर चाललेल्या युद्धाचं वर्णन सांगितलं. तो भ्रम किंवा जादूची शक्ती नव्हती. हे टेलिपॅथीचं एक उत्तम उदाहरण होतं. प्राचीन काळी ऋषी या शक्तीच्या माध्यमातून भूतकाळ, भविष्यकाळ आणि इतरांच्या मनातले विचार जाणून घेत असत. त्या काळात ही शक्ती दैवी दृष्टी आणि त्रिकालदर्शी शक्ती म्हणून ओळखली जात होती. कालांतराने विज्ञान युग सुरू झालं. विज्ञानाने टेलिपॅथीची पुष्टी केली. साधारणपणे आपण पंचेंद्रियांद्वारे ज्ञान प्राप्त करतो. कधीकधी कुणाच्या मनात सिक्स्थ सेन्स जागृत होतो. विज्ञानाने याला अतींद्रिय शक्ती अर्थात एक्स्ट्रा सेन्सरी पर्सेप्शन असं नाव दिलं आहे. सर्वांमध्ये कमी-अधिक प्रमाणात टेलिपॅथीची क्षमता असते. काही जणांमध्ये ती इतकी मजबूत असते, की ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत मानसिक संवादाच्या माध्यमातून पोहोचतात किंवा भविष्यातल्या कोणत्याही घटनेबद्दल आधीच सांगू शकतात. यामध्ये आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचा म्हणजेच पाहणं, ऐकणं, वास घेणं, स्पर्श करणं किंवा चव घेणं यांचा वापर केला जात नाही. ही आपल्या मन आणि मेंदूची क्षमता असते. वाचा - तिशीनंतर आहारात सामील करा हे पदार्थ, स्मरणशक्ती वाढवण्यास करतील मदत टेलिपॅथी या शब्दाचा सर्वांत पहिला वापर 1882 मध्ये फॅड्रिक डब्लू मायर्सने केला. ज्या व्यक्तीमध्ये सिक्स्थ सेन्स जागृत असतो ती समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, हे जाणून घेऊ शकते. हा पॅरासायकॉलॉजीचा विषय असून, त्यात टेलिपॅथीचे अनेक प्रकार सांगितले आहेत. आपला मेंदूने अशा प्रकारे अनुकूलन करून घेतलं आहे, की आपण आपल्या सभोवतालच्यांशी संवाद साधण्यासाठी विविध गॅजेट्सवर पूर्णपणे अवलंबून राहू लागलो आहोत. परंतु, टेलिपॅथी वापरण्याची क्षमता विकसित करणं फारसं कठीण नाही. कारण ती आपल्यात आधीपासूनच अस्तित्वात असून केवळ जागृत करणं आवश्यक आहे. टेलिपॅथीचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे विचार तोंडी स्पष्ट करू शकत नाही, अशा वेळी टेलिपॅथी कामी येते. ऑरा रीडर आणि पॉडकास्ट होस्ट मिस्टिक मायकेला यांनी सांगितलं, `या भौतिक जगात आपल्याला आवश्यक असलेल्या किंवा दुसऱ्याला सांगू इच्छित असलेल्या गोष्टी स्पष्ट बोलणं नेहमीच शक्य नसतं. टेलीपॅथिक संभाषणातून संबंध, दुःख व्यक्त करणं आणि क्षमा करणंदेखील शक्य आहे. या गोष्टी नेहमी प्रत्यक्ष संभाषणातून साध्य होतातच असं नाही.` वाचा - Bhagavad Geeta : कसा होतो पुनर्जन्म ? श्रीमद्भागवत गीतेत आहे या गूढ प्रश्नाचे उत्तर ! टेलिपॅथी ही बाहेरून मिळवायची गोष्ट नाही तर ती आपल्यात आधीपासूनच आहे. अलीकडे बहुतेकांचा त्यांच्या अंतर्मनाशी संवाद नसतो. त्यामुळे त्यांना त्यांची आंतरिक शक्ती आणि क्षमतेबाबत जाणीव नसते.
टेलिपॅथीची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी आहे आणि प्रत्यक्ष प्रयोगातून ती अनुभवता येऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं, तर ध्यान, प्राणायाम आणि लक्ष केंद्रित करून सिक्स्थ सेन्स जागृत करता येतो. याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे शवासनात झोपून डोळे बंद करून ध्यान करणं होय. या गोष्टींचा नियमित सराव करून योगनिद्रेत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योगनिद्रेत शरीर आणि जागृत मन झोपी जातं; पण सुप्त मन मात्र जागृत राहतं. या माध्यमातून मानसिक स्तरावर संदेश पाठवता येऊ शकतो. सुरुवातीला,जोडीदार किंवा चांगले मित्र, तसंच ज्या व्यक्ती आपल्या जास्त जवळच्या आहेत, ज्यांच्याशी आपला रोजचा संवाद आहे, अशांसोबत टेलिपॅथी उत्तम प्रकारे केली जाऊ शकते. कारण तुम्हाला कळत नसलं तरी तुमच्या जवळच्या व्यक्ती आधीच काही स्तरावर टेलिपॅथिक पद्धतीने संवाद साधत असण्याची शक्यता अधिक असते.