Home /News /lifestyle /

बापरे! लग्नासाठी द्यावी लागते विचित्र परीक्षा; थेट Whale च्या जबड्यात घालावा लागतो हात

बापरे! लग्नासाठी द्यावी लागते विचित्र परीक्षा; थेट Whale च्या जबड्यात घालावा लागतो हात

चंद्र-तारे फक्त बोलण्यापुरते मात्र इथं आवडत्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिचे वडील तरुणाकडून चक्क व्हेल माशाचा (whale) दात मागतात.

    फिजी, 19 ऑक्टोबर : मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणे हा प्रेमातील एक ठरलेला डायलॉग. मात्र कुणी तुम्हाला सांगितलं की चंद्र तारे नको मला पण समुद्रात जाऊन व्हेल माशाचा दात आण तर! हे फक्त बोलण्यापुरतं नाही बरं का, तर प्रत्यक्षात करून दाखवावं लागतं. आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिच्यावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी फिजीतील तरुणाला डेंजर असं काम करावं लागतं. मुलीचे वडील या तरुणाकडून व्हेल माशाचा दात मागतात. फिजीमध्ये अठराव्या शतकापासून चालत आलेली अनोखी आणि विचित्र प्रथा. व्हेल माशाचा दात देणं याला तबुवा असं म्हटलं जातं. तबुवा म्हणजे पवित्र. व्हेलच्या दातात अधिक नैसर्गिक शक्ती आहे ज्यामुळे लग्न टिकून राहतं, असं फिजीतील लोक मानतात. यासाठी प्रत्येक नवीन जोडपं हे दात शोधण्याचा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त असतं. लग्नाव्यतिरिक्त हा दात मृत्यू आणि जन्माच्या निमित्ताने सुद्धा भेट दिला जातो. ब्रिटीश वृत्तपत्र इंडपेडंटच्या रिपोर्टनुसार जर एखाद्या कुळाला दुसऱ्या कुळातील प्रमुखाला ठार मारण्याची इच्छा असेल तर त्याला पैसे नव्हे तर मारेकरी व्हेल माशाचा दात द्यायचे. म्हणजे भारतात जसं मारण्याची सुपारी देतात अगदी तसंच. दात मिळवण्यासाठी खास प्रकारच्या व्हेल माशाची शिकार केली जाते, ज्याला स्पर्म व्हेल म्हणतात. तो दात असलेल्या माशांच्या श्रेणीतील सर्वात मोठा मासा आहे. त्याच्या मोठ्या डोक्यावर 20 ते 26 दातांच्या जोड्या असतात. प्रत्येक दाताची लांबी 10 ते 20 सेंटिमीटर असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दाताचं प्रत्येकी वजन कमीत कमी एक किलो असतं. या माशाचा दातइतका मौल्यवान मानला जाऊ लागला आहे की त्याच्या दाताच्या छोट्या तुकड्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. हे वाचा - देवमाशाची कृपा! Whale ने केली उलटी आणि तो झाला करोडपती आता प्रत्येक जण समुद्रात जाऊन व्हेल माशाचा दात आणू शकत नाही. प्रशिक्षित लोक हे काम करतात आणि ज्यांना हे दात हवे असतात ते या लोकांकडून खरेदी करतात.  गोगलगायींचा शोध घेताना व्हेल समुद्रात डुबकी मारतो. 35 मिनिटं ते सुमारे एक तासांनंतर त्याला समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची आवश्यकता भासते. त्यानंतर व्हेल समुद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 10 मिनिटं असतो. त्याच वेळी त्याची शिकार केली जाते आणि त्याचे दात काढले जातात. केवळ तबुवा या प्रथेमुळेच नाही तर अशा अनेक कारणांमुळे व्हेल माशाला मारलं जात आहे. हेच कारण आहे की ह्या माशांची जात आता दुर्मिळ होत चालली आहे. आता अंदाजे संपूर्ण जगात केवळ तीन लाख स्पर्म मासे शिल्लक आहेत. हे मासे आता गायब होऊ लागल्याचे लक्षात येताच आता त्यावरती अनेक निर्बंध लावले जात आहेत. या माशांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरी अजूनही छुप्या पद्धतीनं शिकार केली जाते. हे वाचा - शास्त्रज्ञांना सापडल्या 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास स्पर्म व्हेलच्या तोंडात इतके अधिक आणि मजबूत दात का आहेत याचं रहस्य अद्याप वैज्ञानिकांना समजलेलं नाही. हा मासा केवळ एक प्रकारची गोगलगाय खातो यासाठी अशा दातांची आवश्यकता नसते. जवळजवळ सर्व प्राण्यांमधील अनावश्यक अवयव आता नष्ट होत चालले मात्र स्पर्म व्हेलचे दात अजूनही तसेच कायम का आहेत, याची माहिती कुणालाही नाही. या दातांची मागणी लक्षात घेऊनच आता बनावट दातसुद्धा बाजारात येणं सुरू झालं आहे. व्हेल माशाचा दात म्हणून लोकांनी प्लॅस्टिकचे दात विकण्यास सुरुवात केली आहे. पण खरा आणि नकली दात ओळखण्यासाठी त्याला आगीजवळ नेलं जातं. तर तो दात वितळला आणि त्याचा रंग बदलला तर तो नकली आणि तसं नाही झालं तर तो खरा दात, असं समजलं जातं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Other animal, Whale

    पुढील बातम्या