मुंबई, 27 जानेवारी : प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व असतं. लाल रंग प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. विशेषतः लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. व्हॅलेंटाइन्स डे आता जवळ आलाय. त्या दिवशी लाल रंगाच्या गुलाबांना प्रचंड मागणी असते. प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचं फूल का देतात? लाल गुलाब आणि प्रेमाचं काय नातं आहे हे जाणून घेऊ या. त्याबद्दल माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज'ने दिलं आहे.
प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. कोणी पत्र किंवा चिठ्ठी लिहून प्रेम व्यक्त करतात. कोणी प्रत्यक्ष भेटून आपल्या मनातलं समोरच्याला सांगतात. कोणी चॉकलेट्स देऊन, कोणी भेटवस्तू देऊन तर कोणी सरप्राइज पार्टी देऊन प्रेम व्यक्त करतात; मात्र काहीही जमलं नाही, तर साधं एक फुलही तुमच्या मनातली भावना सांगायला पुरेसं असतं. फेब्रुवारी महिन्यात 14 तारखेला व्हॅलेंटाइन्स डे असतो. त्या निमित्ताने लाल गुलाबाच्या फुलांना भरपूर मागणी येते. त्याचं कारण लाल रंगाची गुलाबाची फुलं प्रेमाचं प्रतीक समजली जातात. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच का दिले जातात? प्रेमाचा आणि लाल गुलाबाचा काय संबंध असतो हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल.
हेही वाचा - खरंच 'मेड फॉर इच अदर' असतात? रक्ताचं नातं नसलं तरी नवरा-बायकोचे चेहरे सारखे का दिसतात?
प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबाचं फूल देण्याची प्रथा खूप जुनी आहे. ग्रीक धर्मामध्ये लाल गुलाबाचा अफ्रोडाइट या प्रेमाच्या देवतेशी संबंध जोडला जातो. रोमन आणि ग्रीक लोकांमध्ये अफ्रोडाइट ही प्रेम आणि सौंदर्याची देवता समजली जाते. काही रोमन नागरिक या देवतेला प्रजननाची देवताही मानतात. गुलाबाचं फूल दिल्यामुळे एकमेकांमधली जवळीक वाढते असंही काही जण समजतात. लाल गुलाब आणि उत्कट भावना यांचा कायम संबंध जोडला जातो. त्याच उत्कट भावनेतून लाल गुलाब देऊन समोरच्याला आपल्या मनातलं प्रेम सांगितलं जाण्याची पद्धत पडली असावी. लाल गुलाब केवळ एकदाच नाही, तर कधीही प्रेम व्यक्त करताना दिला जातो. कायम लाल गुलाब दिल्यामुळे प्रेम वाढतं आणि नातं मजबूत होतं, असं म्हणतात.
लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो. हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं. जसं मैत्री दर्शवण्यासाठी पिवळ्या गुलाबाचं फूल देतात, तसंच प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देतात. लाल रंगामध्येही विविधता असते; मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी ब्राइट, रूबी लाल रंगाचा गुलाब दिला जातो. कोणत्याही वयोगटातली व्यक्ती प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देऊ शकते. असं म्हणतात, की एकमेकांमध्ये भांडण झालं असेल, तर ते मिटवून प्रेम वृद्धिंगत करण्यासाठीही गुलाबाचं फूल दिलं जातं. एकंदरीत लाल गुलाबाच्या फुलाचा प्रेम आणि प्रेमी युगुलांशी खूप जवळचा संबंध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.