जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / HumanStory: पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैद्याला कसं वागवतात? वाचा, एका गुप्तहेराचे थरारक अनुभव

HumanStory: पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैद्याला कसं वागवतात? वाचा, एका गुप्तहेराचे थरारक अनुभव

HumanStory: पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैद्याला कसं वागवतात? वाचा, एका गुप्तहेराचे थरारक अनुभव

कोठडीला लावलेलं भलंमोठं कुलूप कमी होतं म्हणून की काय माझ्या पायातही साखळदंड बांधण्यात आले होते. लोखंडाचे जाडजूड साखळदंड. चालताना माझ्यासोबत तेही घेऊन चालावं लागे. रात्री कूस बदलतानाही बेड्या वाजायच्या. पूर्ण जेलभर माझ्या बेड्यांचा आवाज यायचा. चार वर्षं त्या बेड्या माझ्या शरीराराच एक भाग बनल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

हेरगिरी आणि पाकिस्तानात हेरगिरी करणं या जमीन अस्मानाचा फरक आहे. पाकिस्तानात भारतीय गुप्तहेराला अटक झाली, तर सैन्य त्याला मारत नाही, जिवंत ठेवतं. पाकिस्तानात मृत्यूपेक्षाही कैदेची शिक्षा जास्त जहाल असते. गेल्या 19 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुुरुंगात अनन्वित अत्याचार सहन केलेल्या गुरुदासपूरच्या रॉबिन मसीह यांची ही कथा.


HumanStroy: माणसाच्या, माणुसकीच्या आणि हरवलेल्या माणूसपणाच्या काही निवडक गोष्टी सांगण्यासाठी आम्ही आजपासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत. यातले सगळे अनुभव खरे आहेत, फक्त ओळख उघड होऊ नये म्हणून काही ठिकाणी नावं बदलली आहेत. काही थरारक, काही आनंद देणाऱ्या, काही विषण्ण करणाऱ्या तर काही अगतिक, धक्कादायक, भावुक वाटणाऱ्या या गोष्टी वाचून काय वाटतं ते नक्की कळवा..


इंदिराजींनंतरच्या काळातील गोष्ट आहे. पंजाबच्या रात्री या प्रचंड खदखदीनं भरलेल्या होत्या. त्याचवेळी त्याच्याशी भेट झाली. जवळच्याच गावात राहत होता, मात्र लाईफस्टाईल एकदम शहरी. मैत्रीच्या भावनेतून गप्पा मारायचा. काय करतोस, किती कमावतोस, कुठे राहतोस वगैरे वगैरे. मग एकदम म्हणाला, एवढे कष्ट करून किती कमी पैसे कमावतोस. असं कसं राहतोस? यापेक्षा काही वेगळं करण्याची तयारी आहे का? मी विचारलं - काय काम? तो म्हणाला - गुप्तहेराचं काम. पाकिस्तानात जाऊन.   मी संभ्रमात होतो. पाकिस्तानात हेरगिरी करताना जर पकडला गेलो, तर काय हाल होतील, याची कल्पना करण्यासाठी फार शिक्षण घेण्याची गरज नव्हती. मी घरी परत आलो.   पुढच्या दिवशी कामात मन लागत नव्हतं. कलाकार आहे. कपड्यांची शिलाई, रफू करणं असली कामं करतो. त्या दिवशी वारंवार चुका होत राहिल्या. संध्याकाळी घऱी परत येताना तो पुन्हा दिसला. जणू काही तो माझीच वाट पाहत होता. पुढच्या काही दिवसांतच मी ‘इंटेलिजन्स’च्या ऑफिसर्सच्या समोर होतो.   अनेक महिने ट्रेनिंग सुरू राहिली. कलमा पढायला शिकलो, नमाज पढायला शिकलो. कुठेही चूक राहायला नको. मौलवीने सगळ्या गोष्टी शिकवल्या. पंजाबी कुर्ता सोडून पठाणी घालू लागलो. केस आणि दाढी काढून टाकली. उर्दू बोलताना भाषेत पंजाबी लहेजा असायचा. फक्त एकच गोष्ट बदलायला मी नकार दिला. मी मांसाहार करणार नव्हतो.  

News18

ट्रेनिंगमध्ये कोड लँग्वेजही शिकलो. पाकिस्तानात आपल्या लोकांना भेटल्यावर सुरुवातीला सांकेतिक भाषेतच बोलणं होतं. त्यातूनच समजतं की अमूक एक व्यक्ती आपली आहे की नाही. मी सगळं ट्रेनिंग मन लावून पूर्ण केलं. मी माझ्या देशासाठी तयार होत असल्याची भावना होती. जिवाला धोका होताच, मात्र ‘कंपनी’वाल्यांनी सांगितलं होतं की माझं काही बरंवाईट झालं, तर ते घरच्यांची पूर्ण काळजी घेतील.   माझं नवं बारसं झालं. रॉबिनऐवजी मी अन्वर झालो. कंपनीतील सहकारी अन्वर म्ङणून बोलावू लागले. रॉबिन हा अन्वर म्हणून हाक मारली तरच प्रतिसाद देईल, याचाही सराव घेण्यात आला. मी रॉबिनला पूर्णतः विसरून गेलो.   आता पाकिस्तानात जायचं होतं. तेही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय. रात्री उशिरा पाकिस्तानातील कठुआमध्ये पोहोचलो. पाकिस्तानात घुसण्याचा मार्ग तयार करण्यात आला आणि आम्ही थेट तिकडे दाखल झालो. घनदाट अंधारी रात्र. आम्हाला दिवस उजाडण्यापूर्वीच तिकडे पोहोचायचं होतं.   रॉबिन सांगतात, पाकिस्तानात पाच वेळा नमाज पढायचो आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात भटकत राहायचो. रेल्वेत बसलो. बस आणि ट्रकनेही फिरलो. कुणालाही संशय आला नाही. पहिल्यांदा काही दिवस तिथे राहून पुन्हा परत आलो. ज्या कामासाठी पाठवलं होतं, ते काम फत्ते करून. त्याशिवाय पाकिस्तानात आतापर्यंत 10 वेळा येणंजाणं झालं. कधी कुठली कागदपत्रं मिळवण्यासाठी, कधी कुठल्या जागेचा फोटो आणण्यासाठी. प्रत्येक वेळी मी मोहीम फत्ते करून सहीसलामत परत येत होतो.  

News18

23 मे 1990. मी सैनिकांमध्ये होतो. कागद खाऊन टाकला होता. इतर कुठलीही वस्तू माझ्याकडे नव्हती. पहिले काही महिने मला जबर टॉर्चर करण्यात आलं. सैनिकांनी प्रचंड मारहाण केली. पूर्ण शरीर काळंनिळं पडलं होतं. त्यावर मलम लावल्याप्रमाणे मीठ चोळत असत. झोपलो तर डोक्यावर पाणी ओतायचे. उलटं लटकावून जबर मारहाण करायचे. खुर्चीवर हात पाय बांधून वीजेचा शॉक द्यायचे. शुद्धीत आलो की डोकं जड झालेलं असायचं. मी जिवंत आहे, यावरही विश्वास बसत नव्हता.   बहुतेक झोप आणि वेदना यांच्या भरात एखादी गोष्ट माझ्या तोंडून बाहेर पडली असावी. पाकिस्तानात येण्याचा रस्ता कुठला वगैरे प्रश्नावर मी तोंड उघडलं असू शकतं. तेही माझ्या नकळत. मात्र भारतात मिळालेल्या ट्रेनिंगनुसार एक चकार शब्दही माझ्या तोंडून बाहेर पडला नाही.   10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वेगवेगळ्या तुरुंगांत राहिलो. एका तुरुंगात तर खतरनाक कैद्यांमध्ये मला ठेवण्यात आलं होतं. कित्येक खून आणि बलात्कार केलेले गुन्हेगार. माझी कोठडी सगळ्यांपेक्षा वेगळी होती. सहा फुटी कोठडीत दिवसाही मिट्ट काळोख असायचा. तिथंच संडास आणि बाथरूम. कित्येक दिवसांनी मला दिवस आणि रात्र यातला फरक समजायला गेले.   कोठडीला लावलेलं भलंमोठं कुलूप कमी होतं म्हणून की काय माझ्या पायातही साखळदंड बांधण्यात आले होते. लोखंडाचे जाडजूड साखळदंड. चालताना माझ्यासोबत तेही घेऊन चालावं लागे. रात्री कूस बदलतानाही बेड्या वाजायच्या. पूर्ण जेलभर माझ्या बेड्यांचा आवाज यायचा. चार वर्षं त्या बेड्या माझ्या शरीराराच एक भाग बनल्या होत्या.   हा कैदी पळून जाणार नाही, याची खात्री पटल्यानंतर मग बेड्या काढण्यात आल्या. बेड्यांच्या जागी जखमा झाल्या होत्या आणि नंतर त्या जखमांच्या खुणा झाल्या. पाकिस्तानातून परत येऊन 19 वर्षं झाली तरीही त्या खुणा अजून पायांवर आहेत.  

News18

त्या अंधाऱ्या आणि दुर्गंधी कोठडीत असताना पंजाबची आठवण यायची. माझं घर, माझे वडील, दोन बहिणी. घराच्या आसपासची शेती, तिथं पिकणारं धान्य वगैरे.   तिथं रोज सकाळी एक ग्लास चहा आणि चपात्यांचे दोन तुकडे मिळायचे. दोन अर्ध्या अर्ध्या चपात्या. अनेकदा मटणही असायचं. मी त्याला नकार दिला तेव्हा मला चपाती आणि डाळ मिळू लागली. माझ्यासारखेच 25 इतर कैदी होते. त्या सर्वांसाठी मिळून एक किलो डाळ शिजवली जायची. अधूनमधून बटाटेही मिळत. ते खाताना तोंडाला जरा चव येत असे.   10 वर्षांचा तुरुंगवास प्रत्यक्षात 14 वर्षांचा झाला. कधी कागदपत्रं पूर्ण नसायची तर कधी त्यावर सह्या करणारे अधिकारी नसायचे. घरी परतलो तेव्हा वडील अगदीच म्हातारे झाले होते. पाद्री चर्चमध्ये काम करून जेवढे कमवायचे, तेवढ्यात घर चालायचं. मी आता काम करायचं ठरवलं. जुनं काम करायला सुरुवात केली, मात्र आता सुई पकडली तरी हात कापायचे.  

News18

आता रंगकाम, दुकानं धुण्याचं काम वगैरे करतो. इतर वेळी मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्रं लिहितो.   त्यांना सांगतो की कशा प्रकारे एका निरागस तरुणाला फूस लावून त्याला हेर बनवलं. किती मोठमोठी स्वप्नं दाखवली गेली. कशा प्रकारे तो पाकिस्तानी तुरुंगात सडत राहिला. परत आल्यावर कसा तो पोटापाण्यासाठी संघर्ष करतो आहे वगैरे. आजपर्यंत एकाही चिठ्ठीचं उत्तर आलं नाही. ज्या ऑफिसर्सनी ट्रेनिंग दिलं होतं, ते कुठं गायब झाले कळत नाही. चौकशी केल्यावर एका अधिकाऱ्यानं सांगितलं की तुला प्रशिक्षण देणारा अधिकारी मरण पावला.   रॉबिन मुलाखतीदरम्यान वारंवार आपण पाठवलेल्या चिठ्ठ्यांचा उल्लेख करतात. मुलाखत संपल्यावर व्हॉट्अपवरून एकामागून एक सर्व चिठ्ठ्यांचे फोटो पाठवतात.   निराशेच्या गर्तेतून आवाज येतो, “वडिलांनी चर्चचं काम सोडून दिलं आहे. त्यांना आता नीटसं दिसत नाही. बहिणी लग्नाच्या प्रतिक्षेत म्हाताऱ्या होऊ लागल्या आहेत आणि मी मला मिळालेली आश्वासनं पूर्ण होण्याची वाट पाहतो आहे. आता मी 56 वर्षांचा आहे. केस दाढी सगळं पिकलं आहे. गावातले आणि आजूबाजूच्या शहरातले लोक माझी कहाणी ऐकायला येतात. मनापासून ऐकतात, सहानुभूती देतात आणि परत जातात. मी देशासाठी माझ्या आयुष्यातील 14 वर्षं दिली. त्याची भरपाई कुणीच करू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात