मुंबई, 28 फेब्रुवारी : वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जल, वायू आणि ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणाचा दुष्परिणाम निसर्गातल्या सर्वच घटकांवर कमी-अधिक प्रमाणात दिसत आहे. प्रदूषणामुळे गंभीर आजार होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. प्रदूषणामुळे अनेकांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जे शहर किंवा परिसरात वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे, तिथल्या नागरिकांची हाडं लवकर कमकुवत होऊ शकतात. ऑस्टिओपोरॉसिससारख्या गंभीर आजारांचं प्रमाण तिथे जास्त असतं. या भागातल्या नागरिकांची हाडं इतकी नाजूक होतील, की ती साध्या दुखापतीतही फ्रॅक्चर होऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन नेमकं काय सांगतं याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वायू प्रदूषण जितकं जास्त असेल, तितकी तिथल्या माणसांची हाडं लवकर कमकुवत होतात, ऑस्टिओपोरॉसिससारखे आजार होतात, असं संशोधनात दिसून आलं आहे. वाढत्या वयानुसार ऑस्टिओपोरॉसिस होण्याची शक्यता जास्त असते. महिलांना मेनोपॉझनंतर हा आजार होऊ शकतो. अशा 9041 महिलांची माहिती गेल्या सहा वर्षांत जमा करण्यात आली. या संशोधनादरम्यान संशोधकांनी अशा महिलांच्या हाडांमधल्या खनिजांच्या घनतेचा अर्थात मिनरल्स डेन्सिटीचा अभ्यास केला. तसंच संशोधकांनी या महिलांच्या घराच्या परिसरातलं नायट्रिक ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि पीएम 10ची तपासणी केली. या महिलांच्या शरीरातल्या लाल रक्तपेशींचा व्यास तपासण्यात आला. म्हणजेच या महिलांच्या आरोग्याची तपासणी केली गेली. ज्या भागात या विषारी वायूंची आणि प्रदूषणाची पातळी जास्त होती, त्या भागातल्या महिलांची हाडं अत्यंत कमकुवत होती. यात प्रामुख्याने घसा, पाठीचा कणा आणि नितंबातल्या हाडांचा समावेश होता. वाचा - सुंदर दिसण्यासाठी भरपूर खा लिची, त्वचेला होणारे फायदे वाचून थक्क व्हाल! न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतले बायोमेडिकल सायंटिस्ट डिडियर प्राडा यांच्या संशोधनानुसार, नायट्रोजनशी संबंधित प्रदूषित घटकांचा थेट परिणाम मणक्यावर होतो. गेल्या तीन वर्षांत नायट्रोजनशी संबंधित प्रदूषक तत्त्वांमुळे मणक्याच्या समस्यांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाठीच्या कण्यातल्या खनिजांची घनता 1.22 टक्क्याने कमी झाली आहे. वायू प्रदूषणामुळे हाडांमधल्या पेशी लवकर मृत होतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे विषारी घटक हाडांमध्ये विरघळू लागतात. नायट्रोजन ऑक्साइडमुळे मणक्यासह शरीराच्या इतर हाडांचं मोठं नुकसान होतं, असा सबळ पुरावा प्रथमच प्राडा यांच्या टीमला मिळाला आहे. प्राडा यांनी सांगितलं, `कोणत्याही व्यक्तीच्या हाडांची मजबुती केवळ त्याच्या खाण्या-पिण्यावर अवलंबून नसते. तो कुठे राहतो यावरही ते अवलंबून असतं. तो राहतो त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, प्रदूषण किती आहे, हे घटकही महत्त्वाचे असतात. ज्या शहरांमध्ये वायू प्रदूषण जास्त असतं, तिथल्या व्यक्तींना हाडं मोडण्याचा धोका जास्त असतो. त्यांच्या हाडांची ताकद दिवसेंदिवस कमी होत जाते.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.