Home /News /lifestyle /

पावसाळ्यात कपड्यांचा दुर्गंध कसा घालवाल? या आहेत सोप्या टिप्स

पावसाळ्यात कपड्यांचा दुर्गंध कसा घालवाल? या आहेत सोप्या टिप्स

पावसाळ्यात (Monsoon) मनमुराद भिजताना वाफाळलेल्या चहाचा आनंद घेणं हे स्वर्गसुख वाटतं. पावसात भिजताना काहीच वाटत नाही; पण घरी आल्यावर ओले कपडे वाळवणं हे अत्यंत कठीण काम होतं. हा अनुभव सगळ्यांचाच असेल.

मुंबई, 7 जुलै : पावसाळ्यात (Monsoon) मनमुराद भिजताना वाफाळलेल्या चहाचा आनंद घेणं हे स्वर्गसुख वाटतं. पावसात भिजताना काहीच वाटत नाही; पण घरी आल्यावर ओले कपडे वाळवणं हे अत्यंत कठीण काम होतं. हा अनुभव सगळ्यांचाच असेल. एकतर बाहेरची पावसाळी हवा, सतत चिकचिक आणि त्यात कपडे न वाळल्यामुळे कपड्यांना येणारा कुबट वास (How To Get Rid Of Musty Odor Of Clothes) असं वातावरण झालं, की पावसाळ्याची मजाच निघून जाते. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असते. तसंच ऊनही पुरेसं नसतं. त्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. कपडे कितीही वेळा धुतले, तरी हा वास पूर्णपणे जात नाही. कारण हा वास कपडे न धुतल्यामुळे नाही, तर कपडे नीट न सुकल्यामुळे येत असतो. कपड्यांना वास येऊ नये, यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येतात. पावसाळ्यात कपड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. एक तर चिखलामुळे कपडे खराब होतात. त्यातच पावसामुळे भिजतात. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीचे कपडे वापरावे लागतात. हवेतील ओलसरपणामुळे कपड्यांना विचित्र वास येण्याची शक्यता असते. ही दुर्गंधी टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. काहींना घरी आल्यावर कपडे काढून लगेच मशीनमध्ये किंवा लाँड्री बॅगमध्ये टाकायची सवय असते. असं केल्यानं घामाची दुर्गंधी तशीच राहते. हे कपडे एक किंवा दोन दिवस तसेच एकावर एक जमा केले, तर ती दुर्गंधी वाढते. म्हणून घरी आल्यावर कपडे काढून हँगरला लावून ठेवा किंवा बाहेर मोकळ्या हवेत ठेवा. अशानं कपड्यांना हवा लागून दुर्गंधी येणार नाही. लिंबू आम्ल गुणधर्माचं असतं. लिंबाच्या रसामुळे (Use Lemon) कपड्यांची दुर्गंधी कमी होतो. कपडे भिजवल्यावर त्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा. त्यात कपडे भिजवून थोड्या वेळानं धुवा किंवा ज्या ठिकाणी कपड्यांना वास येत असेल, तिथे लिंबाच्या रसात पाणी घालून ते पाणी लावा. त्यामुळे दुर्गंध नाहीसा होईल. व्हिनेगरसुद्धा (Vinegar) याच प्रकारचं काम करतं. कपड्यांच्या वास येणाऱ्या भागावर व्हिनेगर लावून ठेवा. थोड्यावेळानं साध्या पाण्यानं धुवून टाका. म्हणजे दुर्गंध येणार नाही. कपड्यांना दुर्गंध येण्यामागे ते घामट किंवा ओलसर राहणं हे कारण असतं. म्हणून कपाटात एखादा खडू किंवा सिलिकॉन पाऊच (Silicon Pouch) ठेवा. या वस्तू दुर्गंध शोषून घेतात. त्यामुळे कपडे ओलसर राहत नाहीत व त्यांना वासही येत नाही. स्वयंपाकघरात असणारा बेकिंग सोडाही (Baking Soda) कपड्यांचा वास कमी करतो. एक बादली पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून त्यात कपडे थोडा वेळ भिजवा. मग साध्या पाण्यानं धुवा. त्यानं कपड्यांना वास येणार नाही. पावसाळ्यात ऊन नसतं. हवेत पावसाळी दमटपणा असतो. त्यामुळे कपडे हवेशीर जागी वाळवले पाहिजेत. घरात हवा खेळती राहत नसेल, तर पंख्याखाली कपडे वाळवा. अल्कोहोलही कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी मदत करते. पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास वोडकामुळे (Vodka) कमी करता येतो. वोडकामध्ये थोडं पाणी मिसळा. मग ते मिश्रण कपड्यांवरील दुर्गंध येणाऱ्या जागी लावा. थोड्यावेळानं दुर्गंधी निघून जाईल. कपडे धुण्यासाठी चांगली व सुगंधी वॉशिंग पावडर वापरा. आवश्यकता असेल, तर फॅब्रिक सॉफ्टनरही वापरू शकता. कपडे 10 ते 15 मिनिट सॉफ्टनरच्या पाण्यात भिजवून ठेवा. नंतर साध्या पाण्यानं धुवा. त्यामुळे कपड्यांना सुगंध येईल. कपडे वाळल्यानंतर कोरड्या जागी ठेवा. त्यामुळे कपड्यांमध्ये ओलसरपणा राहणार नाही व वासही येणार नाही. कपडे जास्त वेळा वापरल्यानंही त्यांना वास येऊ लागतो. उन्हाळ्यात घाम व पावसाळ्यात दमट हवा असते. त्यामुळे या काळात कपडे शक्यतो एकदा घालून स्वच्छ धुतले पाहिजेत. वारंवार घातल्यानं कपड्यांना दुर्गंध येतो. कपडे नीट न वाळल्यामुळे किंवा स्वच्छ न ठेवल्यामुळे इन्फेक्शनचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. तसंच ओलसर कपड्यांमुळे सर्दी किंवा कफही होऊ शकतो. त्यामुळे कपड्यांची काळजी घेतलीच पाहिजे.
First published:

पुढील बातम्या