मुंबई, 15 मार्च : दागिन्यांची हौस प्रत्येक स्त्रीला असतेच. मग ते सोन्याचे दागिने असोत वा चांदीचे दागिने असोत. कपाटात ठेवलेले दागिने सणावाराच्या निमित्ताने आवर्जून बाहेर येतात; पण चांदीचे दागिने (Sliver Jewellery) बऱ्याचदा काळे पडल्याचं आढळून येतं. खासकरून मुंबईसारख्या ठिकाणी दमट हवेमुळे चांदी लगेच काळी पडते. तसंच चांदीच्या मूर्ती, ताम्हण-पळी किंवा वाट्या आदी भांडीसुद्धा काळी पडतात; पण या दागिन्यांची किंवा वस्तूंची चमक काही घरगुती उपाय करून तुम्ही परत आणू शकता. चांदी कालांतराने काळी पडल्यामुळे हिरमोड होतो. असं असलं तरी ती खराब होते किंवा त्याचं मूल्य कमी होतं असं नाही. चांदी काळी पडणं हा हवेतलं प्रदूषण आणि धुळीमुळे होणार परिणाम आहे. आता चांदीची ज्वेलरी (Silver Jewelry) किंवा वस्तू काळी पडल्यावर तशीच वापरणं योग्य नाही. त्यामुळे ती स्वच्छ करावी लागते; पण यासाठी ज्वेलर्सकडे जाण्याची गरज नाही. घरीच काही सोपे उपाय वापरून तुम्ही चांदी पुन्हा चमकवू शकता. ते उपाय अगदी पारंपरिकरीत्या वापरले जातात. हे वाचा - Salt Water : मिठाचे पाणी अनेक आजारांवर आहे गुणकारी, वाचा हे महत्त्वाचे फायदे 1) सर्वांत सोपा उपाय म्हणजे रोजच्या वापरातली टूथपेस्ट किंवा टूथ पावडरचा वापर तुम्ही चांदीच्या वस्तू चमकवण्यासाठी करू शकता; पण लक्षात घ्या चांदीच्या वस्तू घासण्यासाठी फक्त पांढरी पेस्ट किंवा टूथ पावडरच उपयोगी पडते. घरातल्या जुन्या ब्रशवर पेस्ट घेऊन त्याने चांदीची भांडी किंवा वस्तू घासा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग गरम पाण्याने धुवा. चांदीच्या वस्तू पुन्हा नव्यासारख्या दिसतील. 2) व्हाइट व्हिनेगार, मीठ आणि गरम पाण्याचा वापर करूनही चांदीचे दागिने धुता येतात. यासाठी गरम पाण्यात व्हिनेगार आणि मीठ मिसळा आणि त्यात चांदीच्या वस्तू किमान अर्धा तास तरी ठेवा. हा उपाय केल्यास चांदीच्या वस्तूंवरचा मळ आणि काळेपणा दूर होतो. 3) कोरोना आता कमी झाला असला, तरी अजूनही आपल्या घरी सॅनिटायझर असतंच. मग आता जास्त वापरात नसलेल्या सॅनिटायझरचा वापर तुम्ही चांदी चमकवण्यासाठी करू शकता. सॅनिटायझर एका भांड्यात घ्या आणि त्यात चांदीच्या वस्तू बुडवून ठेवा. थोड्या वेळाने बाहेर काढून थोडं चोळून घ्या आणि मग पुन्हा गरम पाण्याने धुवा. 4) सगळ्यांच्या फ्रिजमध्ये लिंबू असतंच. लिंबू आणि मीठ वापरूनही तुम्ही चांदीची ज्वेलरी किंवा वस्तू चमकवू शकता. लिंबाच्या रसात मीठ घालून ते वापरा. तसंच कपडे धुण्याची साबण पावडर गरम पाण्यात घालून त्यात चांदीच्या वस्तू ठेवा आणि काही वेळाने चोळून धुऊन टाका. 5) अजून एक सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोड्याचा वापर करा. गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात चांदीची भांडी ठेवा. चांदीच्या वस्तू किंवा दागिने चोळण्यासाठी फॉइल पेपरचा वापर करा. हे वाचा - सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं यासाठी आहे फायदेशीर काळी पडलेली चांदीची भांडी आणि दागिने सणावाराच्या आधी चमकवण्यासाठी वरचे सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.