नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : जेव्हा कोणी प्रेमात पडतं, तेव्हा जग त्याला सुंदर दिसू लागतं. सर्व काही छान दिसू लागतं. सतत उत्साह असतो आणि मन चंचल असतं. पोटात फुलपाखरं उडू लागल्यासारखं वाटू लागतं. बहुतेक जण प्रेम आयुष्यात आनंद आणतं, असं (Romantic relationships) मानतात. परंतु, आता विज्ञानानंही हे मान्य केलंय. प्रेमात असणं केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमच्या अहवालानुसार, फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील हृदयरोगतज्ज्ञ (cardiologist) डॉ. विवेक महाजन (Dr Vivek Mahajan) आणि फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) डॉ. केदार तिलवे (Dr Kedar Tilwe) यांच्या मते, जेव्हा तुम्ही प्रेमळ नातेसंबंधांत (हेल्दी रिलेशनशिप - healthy relationship) असता, या काळात तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असल्याचा अनुभव येतो.
प्रेम आणि आकर्षण हे मुख्यतः दोन टप्प्यांत विभागलं गेलंय
प्रारंभिक आकर्षण
आपलं शरीर नॉरपेनेफ्रिन (norepinephrine) आणि एड्रेनालाईन (adrenaline) सारखी हार्मोन्स त्वरित प्रतिसाद म्हणून सोडतं, जे आपल्याला उत्तेजित करतं. जेव्हा तुम्ही प्रणयाच्या दृष्टीकोनातून आकर्षित झालेल्या व्यक्तीकडे पाहता, तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. तुमच्या नाडीचे ठोकेही (Pulse Rate) वाढतो आणि तुमच्या डोळ्यांची बुब्बुळं विस्फारतात.
जुनं आणि दीर्घकाळ टिकणारे प्रेमसंबंध
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता आणि त्याच्याशी भावनिकरित्या जोडलेले असता, त्या वेळी मेंदू एंडोर्फिन्स (endorphins), वासोप्रेसिन (vasopressin) आणि ऑक्सिटोसिन (oxytocin) सोडतो. हे अशी संप्रेरकं आहेत, ज्यांच्यामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणं आदींसारखे लाभ मिळतात.
बॉण्डिंगसाठी हार्मोन्स जबाबदार
डॉक्टर म्हणतात की, एंडोर्फिनमुळं आपण आनंद आणि समाधान अनुभवतो. जेव्हा आपल्याला आपल्या खास व्यक्तीसह सुरक्षितता वाटत असते, तेव्हा असं होतं. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन दोन व्यक्तींमधील संबंध विकसित करण्यास मदत करतात. ही रसायनं आई-वडील आणि मुलांमधील संबंधांसाठीही जबाबदार असतात.
प्रेमामुळं रक्तदाब आणि हृदयगती कमी होतात
हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही ही संप्रेरकंच जबाबदार असतात. विज्ञानानं जेव्हा लोक त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवतात, तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सुरक्षितता, आरामदायी जीवन आणि समाधानाच्या भावनेनं कमी होतात, हे मान्य केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Relationship