
रोमच्या लॅटियम भागात स्वस्त घरांची विक्री सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका युरोत घरं विक्रिला सुरुवात करणारं मेन्झा टाउन हे पहिलचं शहर आहे.

ज्या भागात घरे विकली जात आहेत त्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. एवढेच नाही तर इथे जंगली लेपिनी टेकड्या आहेत. ज्याच्या मध्यभागी ही घरं बांधलेली आहेत.

मेन्झा शहराचे महापौर क्लाउडिओ स्पेरदुट्टी यांनी सीएनएनला सांगितलंय की, त्यांनी मेन्झाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यांना आशा आहे की लोकेशन पाहून लोक लवकरच खरेदी करतील आणि हा परिसर पुन्हा गजबजेल.

सुरवातील घरं खरेदीसाठी इन्ट्रेस्टेड असणाऱ्या 100 लोकांना संपर्क केला जाणार आहे. त्यासाठी नोटीस काढून घरांबद्दलची माहिती दिली जात आहे. या घरांसदर्भातली सगळी माहिती ऑन लाईन उपलब्ध असणार आहे.

या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि प्राचीन मध्ययुगीन काळातील हे एक गाव आहे. हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून रिकामं झालं आहे. पण, इथल्या जुन्या घरांची दुरुस्ती गरजेची आहे. या घरांमध्ये लोक राहत नसल्याने काही घरं जीर्ण अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे या घरांचा स्वस्त दरात लिलाव होत आहे, पण घर खरेदी करणाऱ्यांना ते दुरुस्त करावं लागेल.

पण, एक अट असणार आहे. ही घरं खरेदी करणाऱ्यांना 5000 युरो म्हणजेच सुमारे 4.3 लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतील. जेव्हा घराची दुरुस्ती पूर्ण होईल, तेव्हा हे पैसे देखील खरेदीदारांना परत केले जातील. घर घेणारे याचा खासगी किंवा व्यावसायिक वापर करणार असल्याची माहिती सरकारलाही द्यावी लागेल. या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, घर खरेदीदाराच्या नावावर होईल.




