मुंबई, 9 मार्च- शरीरातले सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं काम किडनीज करतात. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किडनीज योग्यरीत्या कार्यरत असणं गरजेचं आहे. योग्य काळजी घेतली नाही तर किडनी स्टोन होऊन खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘द क्विंट’ने दिलं आहे. किडनीचं कार्य आपल्या शरीरात दोन किडनीज कण्याच्या दोन्ही बाजूला असतात. शरीरातून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकणं, हे त्यांचं मुख्य कार्य आहे. असं करून त्या आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध करतात, शरीरातले द्रव नियंत्रित करतात आणि इलेक्ट्रोलाइट्सची योग्य पातळी राखतात. किडनीत बिघाड कशामुळे होऊ शकतो? किडनीज रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन, प्रोस्टाग्लॅंडिन अशी अनेक हॉर्मोन्स तयार करतात. ते शरीरातलं पाणी व मीठ नियंत्रित करण्यास मदत करतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. याशिवाय, ते व्हिटॅमिन डीचं अॅक्टिव्ह फॉर्ममध्ये रूपांतर करतात, जे अन्नातून कॅल्शियमचं योग्य शोषण करण्यासाठी आवश्यक असते; पण काही गोष्टींमुळे आपल्या किडनीजमध्ये बिघाड होऊ शकतो. (हे वाचा: शरीरातील हट्टी कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ‘या’ बिया! विज्ञानानेही केले मान्य.. ) किडनी स्टोन हा सर्वांत मोठा त्रास आहे. आनुवंशिक समस्या नसलेल्यांनाही हा त्रास होतो. उन्हाळ्यात स्टोनची समस्या वाढते. स्टोनमुळे किडनी दुखते आणि सर्जरीची गरजही भासू शकते. किडनी निकामी होऊ शकते. तसंच ती शरीरातील जास्तीचं पाणी काढून टाकण्याची क्षमता गमावू शकते. त्यामुळे सूजही येऊ शकते. किडनीची काळजी कशी घ्यायची? पाणी व इतर पेयं प्या दररोज 8-10 ग्लास पाणी प्या, जेणेकरून टॉक्सिन्स, अतिरिक्त क्षार, किडनीमध्ये साचलेला कचरा बाहेर निघून जाईल. डिहायड्रेटिंग फूड व ड्रिंक्स टाळा. यामध्ये अल्कोहोल, कॉफी, चहा, सोया सॉस, तळलेले पदार्थ यांचा समावेश होतो. डिहायड्रेशनमुळे लघवीचा रंग गडद होऊ शकतो. त्यामुळे कॅल्शियम क्षार वाढून स्टोन होऊ शकतो. एनर्जी ड्रिंक्समधल्या कॅफीनची पातळीह युरिनरी कॅल्शियम उत्सर्जन वाढवू शकते, ज्यामुळे त्रास होतो. लिंबू व संत्री यांचं सेवन करा, ते किडनीत स्टोन होण्यापासून रोखतात. काय खाऊ नये? मीठ व साखरेचं सेवन कमी करा. शेंगदाणे, शेंगा, रताळी, पालक आणि बीटरूट व एरेटेड ड्रिंक्समध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तेही टाळा. प्रोसेस्ड फूड, अॅनिमल प्रोटिन, रेड मीट, पॉल्ट्री, अंडी, सी-फूडचं सेवन मर्यादित करा. कारण यामुळे शरीरातली सायट्रेटची पातळी कमी होऊ शकते व युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. यामुळेही किडनी स्टोन होऊ शकतात.
काय खावं? क्रॅनबेरी, आलं, हळदी, बडीशेप, चेरी यांचं सेवन वाढवा. या बाबी किडनीचं कार्य सुधारण्यास मदत करतात. पुरेसं व्हिटॅमिन बी -6 मिळवण्यासाठी केळी, आंबा, सोयाबीन आणि अॅवाकॅडो खा. औषधांचा मर्यादित वापर स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका. कॅल्शियमची पातळी जास्त असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्याव्याच. व्हिटॅमिन सीचा हेवी डोस टाळा. अँटासिड्स, ग्वायफेनेसिन, इफेड्रिन, सल्फा ड्रग्स, फ्रुसेमाइड, इंडिनावीर, टोपिरामेट दीर्घ काळ वापरल्यास स्टोनचा धोका वाढू शकतो. तसंच वजन नियंत्रणात ठेवा. वाढतं वजन किडनी स्टोनला कारणीभूत ठरू शकतं.