गरोदरपण हे स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी एक आहे. याकाळात स्त्रियांच्या पोटात एक जीव वाढत असतो त्यामुळे स्त्रियांना यादरम्यान अनेक समस्या जाणवतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे पायांना सूज येणे. गरोदरपणादरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होत असतात तेव्हा बहुतेक स्त्रियांच्या पायांना सूज येते. गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यात स्त्रियांच्या पायांना सूज येऊ शकते, साधारणतः तिसऱ्या महिन्यानंतर ही सूज तीव्र होऊ लागते. गरोदर स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स सतत बदलत असून यावेळी शरीर अधिक पाणी आणि द्रवपदार्थ शोषून घेते. यात पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वजनाचा देखील तुमच्या पायांच्या नसांवर दाब येतो त्यामुळे पायांना सूज येते. रम हवामान, असंतुलित आहार, कॅफिन ओव्हरडोज, पाणी कमी पिणे आणि जास्त वेळ उभे रहाणे ही देखील पाय सुजण्यामागची कारण सांगितली जातात. मिठाचा वापर कमी करा : गरोदरपणात पायांना सूज येत असेल तर अन्नातील मिठाचे सेवन कमी करावे. मीठ हे शरीरात अतिरिक्त पाणी साठवते, त्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते. मिठात सोडियम हा घटक असतो तेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यावर सूज येऊ शकते.
पोटॅशियम असलेले पदार्थ खावा: पोटॅशियम हे सूज कमी करण्यासाठी मदत करते. तेव्हा आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. केळी, नारळपाणी, संत्री, डाळिंब, दही, रताळे, पालक, बटाटा इत्यादी पदार्थ शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यात मदत करतात. कॉफीचे सेवन कमी करा : कॉफी ही गरोदर महिला आणि त्यांच्या बाळासाठी हानिकारक असते. कॉफीमुळे सतत लघवी होत असल्यामुळे शरीर लघवीच्या रुपात द्रव बाहेर टाकते त्यामुळे शरीरातील पाणी साठवण्याची प्रवृत्ती वाढते. ब्लॅक कॉफीऐवजी दुधाची कॉफी किंवा हर्बल चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. भरपूर पाण्याचे सेवन करा :
गरोदरपणात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता भासते म्हणून द्रव जमा होत असते. अशावेळी तुम्ही भरपूर पाणी प्यालात तर डिहायड्रेशन होणार नाही. यामुळे शरीरात साचलेला द्रव हळूहळू बाहेर पडेल. यामुळे पायांची सूज कमी होण्यास मदत होईल. एप्सम सॉल्टच्या पाण्यात पाय ठेवा : गरोदरपणात पायाला सूज येत असेल तर तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा एप्सम सॉल्ट टाका आणि साधारपणे २० ते २५ मिनिट पाय त्या पाण्यात ठेवा. एप्सम सॉल्टचा वापर करावा. याच्या गुणांमुळे पायांवरील मांसपेशी मोकळ्या होतात आणि पायाच्या सुजेने होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळते. पायाखाली उशीर घेऊन झोपणे :
गरोदर महिलेच्या पायाला सूज येत असेल तर तिने झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपल्यास सूज उतरण्यास फायदा होईल.