गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीसह विविध कारणांमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. हृदयाशी संबंधित आजार जीवघेणे ठरू शकतात. हार्ट अॅटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. खरं तर कोणताही आजार होण्यापूर्वी त्याचे शरीरात संकेत दिसतात. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी शरीरात काही बदल दिसून येतात. हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकाराचं निदान करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात. त्यात ईसीजी, रक्त तपासणीचा समावेश असतो. ईसीजी अर्थात इलेक्ट्रो कार्डिओग्रामच्या माध्यमातून 50 टक्क्यांपर्यंत हार्ट अॅटॅकचा अंदाज बांधला जाऊ शकतो; मात्र अचूक निदानासाठी रक्त तपासणी केली जाते; मात्र आता हार्ट अॅटॅक आलेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशानं संशोधकांनी एक खास डिव्हाइस विकसित केलं आहे. हे डिव्हाइस पाच मिनिटांत हार्ट अॅटॅकविषयी 90 टक्क्यांपर्यंत अचूक माहिती देते. त्यामुळे रुग्णाला रक्त तपासणी करण्याची गरज भासत नाही आणि वेळेत उपचारही मिळतात. हे खास डिव्हाइस नेमकं कसं काम करतं, ते सविस्तर जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. एखाद्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक आला तर त्यावरच्या उपचारांना गती मिळावी यासाठी संशोधकांनी एक खास डिव्हाइस अर्थात उपकरण विकसित केलं आहे. या डिव्हाइसमुळे रुग्णाची रक्त तपासणी करण्याची गरज भासणार नाही. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वीच रुग्णाला अलर्ट करणं शक्य होईल. ईसीजीच्या रिपोर्टवरून हार्ट अॅटॅकची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत समजू शकते; पण अचूक माहितीसाठी रक्ताची तपासणी करावी लागते. मात्र, या नवीन डिव्हाइसमुळे रक्त तपासणी करावी लागणार नाही, असं संशोधकांचं मत आहे. हे डिव्हाइस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी विकसित केलं आहे. या संदर्भात युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात संशोधक डॉ. पार्था सेन गुप्ता यांनी दावा केला आहे की, `हे डिव्हाइस पाच मिनिटांत हार्ट अॅटॅकविषयी 90 टक्के अचूक माहिती देते. खास वैशिष्ट्यांमुळे हे डिव्हाइस ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणूनही वापरता येईल.` `हार्ट अॅटॅक येताना प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात. काही वेळा ही लक्षणं समजणंदेखील अवघड असतं. अशा स्थितीत रुग्णाची मेडिकल हिस्ट्री, हृदयाची इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी आणि छातीचा एक्स-रे काढला जातो; पण या डिव्हाइसच्या माध्यमातून प्रोटीनची पातळी समजत असल्याने रुग्णाला वेळीच सावध करता येऊ शकतं. यामुळे त्याला वैद्यकीय सल्ला आणि उपचार वेळेत घेता येऊ शकतात,` असं संशोधकांनी सांगितलं. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या पेशींमध्ये ट्रोपोनिन नावाचं प्रोटीन असतं. हृदयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावण्यात हे प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतं. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागते, तेव्हा पेशी मृत व्हायला सुरुवात होते. अशा परिस्थितीत ट्रोपोनिन प्रोटीन वाढू लागतं. नवीन डिव्हाइसमध्ये या प्रोटीनची स्थिती लगेच कळू शकते. कोणत्याही प्रकारची रक्त तपासणी न करता या डिव्हाइसच्या माध्यमातून ट्रोपोनिनची पातळी जाणून घेता येणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हे डिव्हाइस परिधान करील, तेव्हा त्यातला इन्फ्रारेड लाइट त्वचेच्या आता पोहोचून रक्तातल्या ट्रोपोनिन प्रोटीनची पातळी मोजू शकतो.
शरीरातल्या ट्रोपोनिन प्रोटीनच्या पातळीतले बदल हार्ट अॅटॅकचे संकेत असू शकतात. ज्या रुग्णांच्या ईसीजी रिपोर्टमधून हार्ट अॅटॅकसंबंधी निश्चित माहिती मिळत नाही, त्यांच्यासाठी हे डिव्हाइस उपयुक्त ठरणार आहे. हार्ट अॅटॅक आल्यावर तात्काळ उपचार गरजेचे असतात. रुग्णांच्या धमन्यांमधलं ब्लॉकेज हटवलं जातं. अशा स्थितीत हे डिव्हाइस अॅटॅक येण्यापूर्वीच त्याचा अचूक अंदाज देऊ शकणार आहे, असं संशोधकांनी सांगितलं; मात्र हे डिव्हाइस केव्हा उपलब्ध होणार यासंबंधीची माहिती संशोधकांनी अद्याप दिलेली नाही.