मुंबई, 15 मे : लठ्ठपणा हा कोणत्याही व्यक्तीसाठी धोकादायक असून हा अनेक आजारांचे मूळ आहे. शरीराचे वजन वाढले की त्याचा थेट परिणाम हृदयापासून किडनीपर्यंत सर्वांवर होतो. ओटीपोटात वाढलेली चरबी इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडथळा आणते. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींमध्ये मधुमेहाचा धोका अधिक वाढतो. लठ्ठपणा हा एक आजार असला तरी शरीरातील अनेक आजारांना तो आश्रय देतो. तेव्हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य व्यायाम आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे पुरेसे आहे. तेव्हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि चाळीशीनंतर देखील पोटाची चरबी न वाढून देण्यासाठी दररोज तीन कामे उपयोगाची ठरतील. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने दृढनिश्चय केला तर तो दर आठवड्याला सुमारे एक किलो वजन कमी करू शकतो. तथापि, एका आठवड्यात एक किलोपेक्षा जास्त वजन कमी करणे धोकादायक असू शकते. अहवालानुसार, कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करणे, प्रथिने वाढवणे, वजन उचलण्याचा व्यायाम करणे आणि पुरेशी झोप इत्यादींच्या मदतीनेच लठ्ठपणाची समस्या दूर करता येते. वजन कमी करण्यासाठी 3 सोपे उपाय : रिफाइंड कार्बोहाइड्रेटची कमतरता : जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुमच्या आहारातून साखर, स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट्स काढून टाकावे अथवा कमी करावे लागतील. या रिफाइंड कार्बोहाइड्रेटऐवजी, संपूर्ण धान्य , सकस आहार करणे सुरू करा, असे केल्यास तुमची भूक आपोआप कमी होईल आणि तुम्ही खूप कमी कॅलरीज घेऊ शकाल. रिफाइंड कार्बोहाइड्रेटची उदाहरणे म्हणजे पांढरा ब्रेड, पांढरा तांदूळ, साखर, ब्रेड, फ्रेंच फ्राईज, पास्ता, कॉर्न सिरप इत्यादी.
प्रोटीन, हेल्दी फॅट आणि हिरव्या भाज्यांचे सेवन : लठ्ठपणा कमी करण्यासाठी फास्ट फूड, जंक फूड ऐवजी आपल्या आहारात जास्त प्रोटीन आणि हेल्दी फॅट देणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. वजन कमी करताना, आरोग्य आणि स्नायू कमकुवत न होऊ देण्यासाठी हाई प्रोटीनचे सेवन करणे आवश्यक असते. एका प्रौढ पुरुषाला एका दिवसात 56 ते 91 ग्रॅम प्रोटीनची गरज असते तर प्रौढ महिलेला दररोज 46 ते 75 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. हाई प्रोटीनसाठी प्लांट बेस प्रोटीन उदाहरणार्थ बीन्स, ओल्ट्स, ओल्ट्सचे जाडे भरडे पीठ, शेंगायुक्त भाज्या, टोफू, सोयाबीन इत्यादींचा आहारात समावेश करा. मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे आणि मटणातून उच्च प्रथिने मिळतील. तुम्ही जितक्या जास्त हिरव्या पालेभाज्या वापराल तितक्या लवकर वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी फुलकोबी, पालक, टोमॅटो, मोड आलेली कडधान्य, सलाड, इत्यादींचे सेवन करावे. याशिवाय ऑलिव्ह ऑईल, आवोकॅडो ऑइल, बदाम, बिया इत्यादींचे आरोग्यदायी चरबीसाठी सेवन करा. शारीरिक हालचाल : वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीर नेहमी सक्रिय ठेवणे. यासाठी सकाळ-संध्याकाळ चालण्याचा व्यायाम तसेच एरोबिक व्यायाम फायदेशीर ठरेल. वजन कमी करण्यासाठी वेगाने चालणे किंवा धावणे, सायकलिंग करणे, पोहणे या फायदेशीर ठरतात. तसेच अहवालानुसार वजन कमी करण्यासाठी वजन उचलण्याचा व्यायाम देखील फायदेशीर ठरतो ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात.