मुंबई, 13 मार्च : ब्रेन स्ट्रोक हा एक गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. स्ट्रोकला ब्रेन अटॅकही संबोधलं जातं. जेव्हा मेंदूतील विशिष्ट भागाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ब्लॉक होते किंवा फुटते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागाचे नुकसान होते किंवा संबंधित रुग्णाचा मृत्यू होतो. स्ट्रोकमुळे मेंदूचं दीर्घकालीन नुकसान होतं किंवा रुग्णाला दीर्घकालीन अपंगत्व येतं किंवा त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्यावरील उपाय कोणते ते जाणून घेऊया. बेंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटीतील कावेरी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट न्यूरॉलॉजिस्ट आणि इपिलिप्टोलॉजिस्ट डॉ. सोनिया तांबे यांनी याविषयी माहिती दिली आहे. ब्रेन स्ट्रोक हा जगातील तिसरा सर्वांत जीवघेणा आजार मानला जातो. स्ट्रोकचे सामान्यपणे तीन प्रकार आहेत. यात इस्चेमिक, हेमोरेजिक आणि टीआयए यांचा समावेश होतो. जेव्हा रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि या रक्तवाहिनीद्वारे मेंदूच्या ज्या भागाला रक्तपुरवठा होत असतो तो खंडित होतो. परिणामी मेंदूचा काही भाग मृत होतो, तेव्हा त्याला इस्चेमिक स्ट्रोक असं म्हणतात.
रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे की नाही? तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा!जेव्हा रक्तवाहिनी फुटून मेंदूच्या ऊतींमध्ये रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे ऊतींचे नुकसान होते, त्याला हेमोरेजिक स्ट्रोक म्हणतात. याशिवाय ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक अर्थात टीआयए हा देखील स्ट्रोकचा एक प्रकार असून, यात मेंदूला होणारा रक्तपुरवठा पुनर्संचयित केल्याने स्ट्रोकची लक्षणं आपोआप सुरू होतात आणि आपसूकच बंद होतात. बऱ्याचवेळा स्ट्रोक आल्यानंतरच्या काही दिवस किंवा आठवड्यात टीआयएची लक्षणं दिसतात. मात्र हे भविष्यातील स्ट्रोकचे संकेत असू शकतात. त्यामुळे त्याचे निदान करून उपचार केल्यास भविष्यातील मोठा स्ट्रोक टाळता येऊ शकतो.
स्ट्रोक येतेवेळी नेमकं काय होतं, ते जाणून घेऊया. मेंदूला सातत्याने ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वांचा पुरवठा होणं गरजेचं असतं. मात्र रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याने किंवा फुटल्याने ऊर्जा पुरवठ्यावर परिमाण होतो आणि काही मिनिटांतच न्यूरॉन्स मृत होतात. मेंदूचा प्रत्येक निम्मा भाग शरीराच्या विरुध्द बाजूच्या अर्ध्या भागावर नियंत्रण ठेवतो. उजव्या बाजूच्या मेंदूला स्ट्रोक बसला तर शरीराच्या डाव्या भागात समस्या निर्माण होतात. स्ट्रोकची जोखीम वाढवणारे काही घटक असतात. त्याचे सुधारण्यायोग्य (जे बदलता येतात) आणि न बदलता येणारे घटक असे त्याचे वर्गीकरण केले जाते. मॉडिफाएबल अर्थात सुधारण्याजोग्या जोखमीच्या घटकांमध्ये उच्च रक्तदाब (जो 140/90 पेक्षा कमी असावा), डायबेटिस, झोपेची कमतरता, लठ्ठपणा, धूम्रपान, हाय प्लाझ्मा लिपिड्स, व्यायामाचा अभाव, तोंडाद्वारे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या, हृदयविकार आणि असामान्य हृदयाचे ठोके यांचा समावेश होतो. नॉन मॉडिफाइड अर्थात न बदलता येणाऱ्या घटकांमध्ये वृद्धत्व, पुरुष, आफ्रिकन - अमेरिकन वंशाच्या व्यक्ती, स्ट्रोकची पार्श्वभूमी, जेनेटिक रिस्क फॅक्टर्स फॉर स्ट्रोक्स यांचा समावेश होतो. स्ट्रोकची लक्षणं ही अचानक उद्भवतात. ती भिन्न असू शकतात. - सामान्यतः शरीराच्या एका बाजूकडील चेहऱ्याचा भाग, हात किंवा पायााला अशक्तपणा जाणवणं किंवा सुन्नपणा येणं. - बोलण्यात किंवा समजण्यास त्रास होणं. - दृष्टीशी संबंधित समस्या. एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंधूक होणं किंवा दृष्टी जाणं. - चक्कर येणं, शरीराचं संतुलन जाणं किंवा उलट्या होणं - हालचाली करताना किंवा चालताना त्रास होणं - फिट येणं. - कोणत्याही कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी. याशिवाय यापैकी कोणतेही लक्षण अचानक उद्भवले तर ते बीईएफएएसटी यानुसार ओळखता येते. बी म्हणजे बॅलन्स अर्थात तोल, ई म्हणजे डोळ्यांच्या समस्या, एफ म्हणजे चेहऱ्याचा भाग लुळा पडणं, ए म्हणजे हातात कमकुवतपणा येणे, एस म्हणजे स्पीच अर्थात अडखळत बोलणं, टी म्हणजे टाइम अर्थात वेळ जी लक्षणं दिसतात त्याचा कालावधी होय. अशा प्रकारची कोणतीही लक्षणं दिसताच तातडीने संबंधित रुग्णावर वैद्यकिय उपचार करणे गरजेचे असते. स्ट्रोकवरील उपचारांमध्ये तत्काळ निदान, वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि रुग्णाचे पुनर्वसन यांचा समावेश असतो. स्ट्रोकची लक्षणं दिसताच तातडीने सीटी स्कॅन किंवा एमआरआय करून मेंदूचे न्यूरोइमेजिंग करणे गरजेचे असतं. यातून स्ट्रोक इस्चेमिक आहे की हेमोरेजिक आहे हे समजते. लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्ण चार ते पाच तासांच्या आत रुग्णालयात पोहोचला तर त्याला रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यासाठी आणि रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी टिश्यू प्लाझमिनोजेन अॅक्टिव्हेटर नावाचे इंजेक्शन दिले जाते. हे उपचार फक्त इस्चेमिक स्ट्रोकसाठी केले जातात. जर मोठी रक्तवाहिनी ब्लॉक झाली असेल तर त्यावर मॅकेनिकल थ्रोम्बेक्टॉमी करून इन्डो व्हॅस्क्युलर तंत्राने गुठळी काढू टाकली जाते आणि रक्तपुरवठा पुर्ववत केला जातो. पात्र रुग्णांमध्ये लक्षणं दिसू लागल्यापासून 24 तासांपर्यंत हे केले जाऊ शकते. ज्या रुग्णांमध्ये सतत न्यूरोलॉजिकल कमतरता असते, त्यांना फिजिओथेरपी, बॅलन्स थेरपी, स्पीच थेरपी स्वरुपात रिहॅबिलिटेशन आवश्यक असते. मोठ्या स्वरुपाचा स्ट्रोक असल्यास या गोष्टींची रुग्णाला दीर्घकाळ गरज भासू शकते. कोलेस्टेरॉलपासून मुक्त करून हृदयाचे आरोग्य संभाळते व्हिटॅमिन डी, वाचा इतर फायदे स्ट्रोक हा कोणालाही, कधीही येऊ शकतो. यामुळे एखाद्याचं आयुष्य कायमचं बदलून जातं. जोखीम घटक बदलणे, चांगली जीवनशैली, संकेत लवकर ओळखणे, वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे यामुळे अपंगत्व आणि मृत्यू टाळता येतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)