मुंबई, 2 ऑगस्ट : निरोगी राहण्यासाठी चांगल्या अन्नाचं सेवन केलं पाहिजे. निरोगी म्हणजे केवळ शरीरच नाही, तर मनही निरोगी असलं पाहिजे. आपण जे अन्न खातो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. शरीराचं आरोग्य चांगलं असेल, तर साहजिकच मानसिक स्वास्थ्य (Mental Health) मिळायला मदत होते. म्हणजेच आपण जे अन्न खातो, ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करतं. डिप्रेशन (Depression), काळजी (Anxiety), अस्वस्थता असेल, तर काही पदार्थ अजिबात खाऊ नयेत. नाही तर डिप्रेशन आणखी वाढू शकतं. अशा पदार्थांबाबत माहिती घेऊ या. ‘एबीपी माझा’ने त्या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. डिप्रेशन हा बदललेल्या जीवनशैलीचा आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी व्यायाम, योगासनं, औषधांसोबतच आहाराचंही पथ्य पाळावं लागतं. मैदा किंवा साखर न वापरता तयार केलेले पदार्थ आहारात घेतल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं. सोबत मनाचं स्वास्थ्यही जपलं जातं. डिप्रेशन किंवा अस्वस्थता, चिंता सतावत असेल, तर आहारातल्या काही पदार्थांच्या समावेशावर बंधनं घातली पाहिजेत. फळांचा रस फळं शरीरासाठी चांगली असतात. त्यात फायबर्स असतात. नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळतात; मात्र फळांच्या रसात (Fruit Juices) कृत्रिम साखर घातली जाते. त्यामुळे त्यातून शरीराला लगेचच ऊर्जा मिळत असली, तरी थोड्या वेळानं पोट रिकामं वाटतं. म्हणून भूक लागल्यावर फळांच्या रसाऐवजी नुसती फळं खा आणि तहान लागली असल्यास पाणी प्या. मैद्याचा ब्रेड व्हाइट ब्रेड (White Bread) मैद्यपासून बनवलेला असतो. मैदा हा एक प्रक्रिया केलेला पदार्थ आणि त्यापासून बनणारा ब्रेड हाही प्रक्रिया करून बनवला जातो. असा ब्रेड खाऊन लगेचच एनर्जी मिळते; पण पुन्हा थकल्यासारखं वाटू शकतं. म्हणून डिप्रेशनमध्ये मैद्याचा ब्रेड खाऊ नये. टोमॅटो केचप एक चमचा केचपमध्ये 4 ग्रॅम साखर असते. हे प्रमाण खूपच जास्त आहे. त्याशिवाय त्यात कृत्रिमरीत्या गोडवा आणणारे घटक आणि रंगही घातलेले असतात. हे खाल्ल्यामुळे डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते. सॅलडवर घातल्या जाणाऱ्या ड्रेसिंगमध्येही हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. त्यामुळे मूड अप-डाउन होऊ शकतात. म्हणून ड्रेसिंगचा वापर मर्यादित ठेवावा. शीतपेय नॉर्मल सोडा, डाएट सोडा किंवा कोणतंही शीतपेय (Cold Drinks) डिप्रेशनचे हॉर्मोन्स वाढवतं. डाएट सोड्यामध्ये साखर नसली, तरी कॅफेन खूप जास्त असतं. यामुळे डाउन फीलिंग येतं. शीतपेय पिण्याची इच्छा झाली, तर Seltzer Water एखाद्या ज्यूसमध्ये मिक्स करून पिऊ शकता. म्हणजे शीतपेयासारखे बुडबुडे दिसतील. अल्कोहोल अगदी थोड्या प्रमाणात अल्कोहोल (Alcohol) घेतल्यामुळे नर्व्हजना आराम मिळतो. त्यामुळे चांगली, शांत झोप लागते. याचा परिणाम म्हणून डिप्रेशन कमी होतं; पण मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केलं, तर डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे अगदी थोडं मद्यपान करणं किंवा मद्यपान बंद करणं योग्य ठरतं. आहाराचा थेट संबंध शरीराशी असला, तर चुकीच्या आहार सवयींमुळे हॉर्मोन्सचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.