मुंबई, 14 डिसेंबर : ऋतुबदलामुळे आरोग्यावर परिणाम होत असतो. सध्या हिवाळा सुरू आहे. हवामानात सातत्याने बदलही होत आहेत. यामुळे साहजिकच सर्दी, कफ, ताप, अंगदुखी यांसारखे शारीरिक आजार होत असल्याचं दिसून येत आहे. काही जणांना प्रामुख्याने हिवाळ्यात हाता-पायाला मुंग्या येणं, हात-पाय बधिर झाल्यासारखं वाटणं, हाता-पायाच्या संवेदना कमी झाल्यासारखं वाटणं असे त्रास जाणवतात. या समस्या अशक्तपणामुळे जाणवतात असं काही जणांना वाटतं आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा हाता-पायाला मुंग्या येणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण किंवा पूर्वसंकेत असू शकतात. नेमक्या कोणत्या आजारात अशी लक्षणं दिसतात, ते जाणून घेऊ या. काही जणांना थंडीत हाता-पायांना मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं, हात-पाय आखडल्यासारखे वाटणं अशा प्रकारचा त्रास होतो. बहुतांश जण अशक्तपणा असेल असं समजून या त्रासाकडे दुर्लक्ष करतात; मात्र अशा प्रकारचा त्रास हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. लिव्हर, किडनी आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारांमुळे हाता-पायाला बधिरपणा जाणवू शकतो. याशिवाय रक्ताशी संबंधित आजारामुळे हाता-पायाला मुंग्या येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला हॉर्मोनल असंतुलन, एमायलोयडोसिस, जुनाट दाह किंवा कॅन्सरसारखा आजार असेल तर नर्व्ह सिस्टीमवर दबाव येतो आणि त्यामुळे हाता-पायाला मुंग्या येण्याचा त्रास होतो. अशावेळी अशक्तपणादेखील जाणवतो. याशिवाय शरीरात व्हिटॅमिन बी आणि ई यांचं प्रमाण कमी झालं, तरी हाता-पायाला मुंग्या येतात. हेही वाचा - ऑफिसमध्ये काम करुन दुखतेय मान? परिस्थिती गंभीर होण्याआधी या टिप्स करा फॉलो रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लॉकेज झालं, तर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं आणि मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते. पेरोनियल नर्व्ह पाल्सी, कार्पल टनेल सिंड्रोम, रेडियल नर्व्ह पाल्सी आणि अल्नर नर्व्ह पाल्सी यांसारख्या आजारांमुळेदेखील हात-पायात सुन्नपणा किंवा बधिरपणा जाणवतो. बऱ्याच शिरांशी संबधित आजारामुळेदेखील हाता-पायाला मुंग्या येतात. हाता-पायाला मुंग्या येणं हे डायबेटीसचेही संकेत असू शकतात. ही समस्या पेरिफेरल न्यूरोपॅथीने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हाता-पायाला मुंग्या येणं, बधिरपणा जाणवणं आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे हाता-पायाला वारंवार मुंग्या येणं, बधिरपणा किंवा सुन्नपणा जाणवणं यांसारखे त्रास होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून औषधोपचार सुरू करावेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.