मुंबई, 21 डिसेंबर: थंडीत अंघोळीला जास्त गरम पाणी लागतं. गॅसवर पाणी तापवण्याची कटकट नको म्हणून अनेक जण बाथरुममध्ये गिझर लावून घेतात. मात्र गिझरमुळे बाथरुममध्ये श्वास कोंडण्याच्या, आग लागण्याच्या घटना घडू शकतात. विजेवर चालणारा गिझर असेल तर पाण्यात वीज उतरण्याचाही धोका असतो. म्हणूनच गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत ‘टीव्ही 9 हिंदी’नं वृत्त दिलं आहे. कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करताना सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असते. गिझरबाबतीत तर सुरक्षेची खात्री करून मगच गिझर निवडावा. त्यासाठी आयएसआय चिन्ह असलेला गिझर खरेदी करावा. विजेच्या उपकरणांची जोडणी माहीत नसेल, तर तज्ज्ञ व्यक्तीला बोलावून गिझर जोडून घ्यावा. चुकीची जोडणी केल्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो. चांगल्या कंपनीचा गिझर घ्यावा. स्थानिक व स्वस्त दरातले गिझर घेतल्यावर सुरक्षेची हमी राहत नाही. हेही वाचा - तुम्हालाही आहेत का सकाळच्या या वाईट सवयी? वजन वाढत राहायला त्याच कारणीभूत गिझरचं काम झाल्यावर तो बंद करायला कधीही विसरू नये. आजकाल बाजारात ऑटोमॅटिक बंद होणारे गिझर आले आहेत. पाणी गरम झाल्यावर ते आपोआपच बंद होतात. मात्र काही गिझर काम झाल्ययावर बंद करावे लागतात. तसे ते न केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. बाथरूममध्ये गिझर उंचावर बसवावा. यामुळे लहान मुलं गिझरला हात लावू शकणार नाहीत. काही वेळेला आपल्या नकळत लहान मुलांकडून चालू गिझरला हात लागण्याची शक्यता असते. तसं झाल्यास विजेचा शॉक बसू शकतो. तसंच भाजण्याचाही धोका असतो. त्यामुळे गिझर उंचावर लावावा. म्हणजे मुलांचा हात तिथे पोहोचणार नाही.
गिझर वापरणाऱ्यांनी बाथरूममध्ये एग्झॉस्ट फॅन लावणं जरूरीचं असतं. गिझरमध्ये पाणी तापवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार होतो. एग्झॉस्ट फॅनमुळे तो वायू बाहेर जातो. अन्यथा कार्बनडाय ऑक्साईड बाथरूममध्ये जमा होऊन जीवावर बेतू शकतं. विजेवर चालणारा आणि गॅसवर चालणारा अशा दोन प्रकारचे गिझर सध्या बाजारात आहेत. दोन्ही गिझरमुळे आरोग्याला समान धोका असतो. गिझरमधून येणारं पाणी काही वेळेला खूप जास्त गरम असतं. अशा वेळी पाण्यात हात घालताना सावधगिरी बाळगावी लागते. लहान मुलांना अशा उपकरणांपासून लांब ठेवावं लागतं. गिझर खूप जास्त तापला, तर त्याचा स्फोट होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शक्यतो काम झाल्यावर गिझर बंद करावा. गिझर चालू असतानाच अंघोळ करणं शक्यतो टाळावं. यामुळे विजेचा शॉक बसू शकतो. गिझर वापरताना ही काळजी घेतल्यास सुरक्षेबाबत कोणतीही शंका राहणार नाही.