मुंबई, 10 जानेवारी : मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक असतं. हे माहिती असूनही मद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मद्य जितकं जुनं तितकं ते दर्जेदार मानलं जातं. खरं तर ही गोष्ट मद्यप्रेमींच्या मनात कोरली गेली आहे. एज स्टेटमेंट अर्थात मद्याच्या कालावधीचा उल्लेख बाटलीवर पाहायला मिळतो. असं मद्य बाजारात जास्त किमतीत विकलं जातं. व्हिस्कीच्या बाबतीतदेखील हाच नियम लागू होतो. व्हिस्की जितकी जुनी तितकी तिची किंमत जास्त असते. त्या तुलनेत नो एज स्टेटमेंट असलेली व्हिस्की कमी दरात विकली जाते. एज स्टेटमेंट असलेली व्हिस्की महाग कशी असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या. मद्य जितकं जुनं तितकं ते चांगलं असा समज मद्यप्रेमींमध्ये दिसून येतो. खरं तर बॉलिवूड चित्रपटातली पात्र आणि स्वयंभू तज्ज्ञांनी ही गोष्ट मद्यप्रेमींमध्ये रुजवली आहे. एज स्टेटमेंट म्हणजे ते मद्य जुनं असल्याचा पुरावा म्हणता येईल. व्हिस्कीच्या अनेक बाटल्यांवर 7, 12 आणि 15 वर्षं असा उल्लेख असतो. ही व्हिस्की नो एज स्टेटमेंटच्या व्हिस्कीच्या तुलनेत जास्त दराने विकली जाते. एजिंग अर्थात व्हिस्कीचा जुनेपणा हा नेमका काय प्रकार आहे, ते पाहू या. एज्ड व्हिस्की अर्थात जुनी व्हिस्की ही अशी असते, जी तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही वर्षं ती खास लाकडी पिंप किंवा बॅरलमध्ये साठवली जाते. याला एजिंग असंही म्हणतात. त्यामुळे व्हिस्कीच्या बाटलीवर समजा 7 वर्षं असा उल्लेख असेल तर ती व्हिस्की कमीत कमी सात वर्षं बॅरलमध्ये ठेवली गेली होती, असा त्याचा अर्थ. बोर्बन, आयरिश, स्कॉच आदी व्हिस्कीचे विविध प्रकार विशिष्ट प्रकारच्या लाकडी पिंपांमध्ये ठरावीक काळासाठी ठेवण्याचा नियम आहे. उदाहरणार्थ, बोर्बन तयार करण्यासाठी व्हिस्की किमान दोन वर्षं जळलेल्या ओक लाकडाच्या बॅरलमध्ये ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे स्कॉचसाठी व्हिस्की किमान तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बॅरलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. व्हिस्की इतकी वर्षं बॅरलमध्ये ठेवण्यामागे काही कारणं आहेत. ज्या खास लाकडाच्या बॅरलमध्ये व्हिस्की साठवून ठेवली जाते, ते लाकूड व्हिस्कीचे गुणधर्म वाढवण्यास मदत करतं. एजिंगदरम्यान या लाकडाचा फ्लेवर व्हिस्कीत मिसळला जातो. हा फ्लेवर व्हिस्की बाटलीत भरेपर्यंत कायम असतो. एजिंगदरम्यान व्हिस्की लाकडामध्ये प्रवेश करते आणि रासायनिक अभिक्रिया घडते. त्यामुळे वुडशुगर आणि इतर अनेक रसायनं तयार होतात आणि ती व्हिस्कीत विरघळतात. यात तापमानाची भूमिकादेखील महत्त्वाची असते. जेव्हा लाकूड गरम होतं, तेव्हा ते प्रसरण पावतं आणि जास्त अल्कोहोल शोषून घेतं; मात्र जेव्हा थंडी असते तेव्हा या लाकडांमधून व्हिस्की, रंग, साखर आणि अन्य फ्लेवर बॅरलमधल्या द्रवात मिसळले जातात आणि अशा पद्धतीने व्हिस्कीचा रंग, स्वरूप आणि चव तयार होते. खरं तर बॅरलमध्ये मद्य साठवण्याची प्रक्रिया खूप किचकट असते. अशी काही लाकडं असतात, की ज्यात काही वर्षं व्हिस्की साठवली तर तिची गुणवत्ता खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, ती एका विशिष्ट वेळेपेक्षा जास्त काळ साठवता येऊ शकत नाही. याचाच अर्थ 12,15 किंवा 18 वर्षांपर्यंत एजिंग करणं खूप कठीण काम असतं. या बॅरलमध्ये मद्य ठेवल्यानंतर काही दशकं त्याकडे दु्र्लक्ष करा आणि एखाद्या दिवशी या मद्यातून लाखो-कोटी कमवा, असं कदापि होत नाही. विशिष्ट लाकडी बॅरलमध्ये वर्षानुवर्षं व्हिस्की साठवण्यामागे खास विज्ञान असतं. या गुंतागुंतीमुळे एज्ड व्हिस्कीच्या किमती वाढतात. या संदर्भात आपण यामाजाकी-55 या जपानी व्हिस्कीचं उदाहरण पाहू या. ही व्हिस्की तयार करण्यासाठी 55 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. ही जपानमधली आतापर्यंतची सर्वांत जुनी आणि महागडी व्हिस्की मानली जाते. ही व्हिस्की लाकडाच्या बॅरलमध्ये साठवून तयार केली जाते. याला मिजुनारा कास्क असं म्हणतात. ही मिजुनारा झाडाच्या लाकडापासून तयार केली जाते. हे लाकूड खूप दुर्मीळ असतं. मिजुनारा कास्क तयार करण्यासाठी झाड किमान 200 वर्षं जुनं असणं आवश्यक असतं. एज स्टेटमेंट असलेल्या व्हिस्कीची बाटली महाग असते. याचं कारणदेखील अगदी सामान्य असतं. व्हिस्की वर्षानुवर्षं साठवून ठेवणं हे खर्चिक काम असतं. या कालावधीत मद्य उत्पादक वेळ आणि संसाधनासह अनेक गोष्टींची गुंतवणूक करत असतो आणि मद्य तयार होण्यासाठी त्याला अनेक वर्षं प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अशी व्हिस्की महाग असण्यामागे हेदेखील कारण आहे. बॅरलमध्ये व्हिस्की जितकी जास्त वेळ ठेवली जाते तितकं तिचं बाष्पीभवन होतं. म्हणजेच अल्कोहोलच्या बाष्पीभवनामुळे अल्कोहोलचं प्रमाण कालांतराने कमी होते. बॅरलमध्ये ठेवताना मद्याच्या कमी झालेल्या प्रमाणाला तांत्रिक भाषेत एंजल्स शेअर म्हणजेच देवदूताचा वाटा असं म्हणतात. मद्य उत्पादक या कमी झालेल्या प्रमाणाचा खर्च उत्पादन खर्चात समाविष्ट करतात. त्यामुळे एखाद्या कंपनीची 18 वर्षं जुनी स्कॉच व्हिस्की 15 वर्षांच्या व्हिस्कीपेक्षा महाग का विकली जाते हे आता समजलं असेल. वाचा - होईल दृष्ट लागण्याजोगे सारे! हे 5 गुण तुम्हाला बनवतील चांगला जोडीदार व्हिस्कीचा गंध आणि चवीचा विचार करता, ही आवड व्यक्तिनिहाय वेगवेगळी असू शकते. एखाद्या व्यक्तीला नो एज स्टेटमेंट व्हिस्की जास्त आवडते, तर एखाद्या व्यक्तीला 12 वर्षं जुनी स्कॉच. व्हिस्की जितकी वर्षं बॅरलमध्ये साठवली जाते तितका तिचा फ्लेवर अधिक चांगला होतो, ही गोष्ट नाकारता येत नाही. तसंच कालपरत्वे अल्कोहोलचा कडवटपणाही कमी होतो. त्यामुळे बऱ्याच जणांना ही चव जास्त आवडते. एजिंगची प्रक्रिया नैसर्गिक आहे, तर डिस्टिलेशनची प्रक्रिया मानवनिर्मित आहे. त्यामुळे एज्ड व्हिस्की जास्त चांगली असल्याचं पारंपरिक मत आहे; मात्र एज्ड व्हिस्की की नो एज व्हिस्की अधिक चांगली हे मानण्यासाठी चवीशिवाय दुसरा कोणताही निकष नाही, असं वाइन तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजेच एज्ड व्हिस्की चांगली असू शकते किंवा नाही. परंतु, ती महाग आहे, हे सत्य नाकारता येत नाही. आपल्या घरात 12 वर्षं जुनी व्हिस्की ठेवली असेल आणि ती 20 वर्षांनंतर अचानक मिळाली तर तिच्या पॅकिंगला तीन दशकं उलटून गेल्याने तिचं सध्याचं मूल्य वाढेल का? एज्ड व्हिस्की घरात ठेवली आणि काही वर्षांनी ती विकली तर जास्त किंमत मिळेल का, असे प्रश्न कोणाच्याही मनात नक्की येतील. खरं तर बाटलीबंद व्हिस्की एजिंग प्रक्रियेतून जात नाही. एजिंग म्हणजे व्हिस्की बॅरलमध्ये कधी टाकली आणि ती कधी बाहेर काढली गेली याचा कालावधी. म्हणजेच लाकडी बॅरलमध्ये मद्य किती वर्षं बंद होतं, याचा कालावधी. चांगली बाब म्हणजे वर्षानुवर्षं बाटलीत बंद असूनही व्हिस्कीतल्या नैसर्गिक गोष्टी बदलत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या 12 वर्षं जुन्या स्कॉचचा फ्लेवर 20 वर्षांनंतर बाटली उघडल्यानंतरही कायम राहतो. वाचा - ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये तूर डाळ! तब्येतीवर होईल गंभीर परिणाम स्कॉच असो बोर्बन असो किंवा कोणत्याही एज्ड व्हिस्कीचं उत्पादन आणि उपलब्धता मर्यादित असल्याने त्यातून जगाची गरज भागू शकत नाही. त्यामुळे जगभरात नो एज स्टेटमेंट व्हिस्कीला मागणी वाढत आहे. नो एज स्टेटमेंट म्हणजे अशी व्हिस्की, जिचं ठराविक एजिंग नाही किंवा ती तीन वर्षं किंवा त्यापेक्षा कमी कालावधीतली असते. अशा पद्धतीने तयार केलेल्या मद्याच्या बाटलीवर एज स्टेटमेंटचा उल्लेख नसतो आणि हे मद्य वेगवेगळ्या प्रकारचं मद्य एकत्रित मिसळून तयार केलेलं असतं. एज्ड मद्य हे नॉन एज स्टेटमेंट मद्याच्या तुलनेत अधिक चांगलं असतं, असा समज पारंपरिकरीत्या पाहायला मिळतो; मात्र दर्जेदार डिस्टिलेशन तंत्र, जोरदार मार्केटिंग आणि सहज उपलब्धतेमुळे नो एज स्टेटमेंटची व्हिस्की भारतासह जगभरात जास्त लोकप्रिय झाली आहे. अनेक मद्य उत्पादक कंपन्या ब्लेंडेड अर्थात मिश्रित व्हिस्की किंवा रम तयार करतात. याचाच अर्थ अशा मद्यात अनेक प्रकारच्या मद्याचं मिश्रण असतं. उदाहरणार्थ जॉन वॉकर ब्लॅक तयार करताना त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्की मिसळल्या जातात. अशा परिस्थितीत त्यांच्या बाटल्यांवर नोंदवलेल्या एज स्टेटमेंटचा खरा अर्थ सर्व मिश्र मद्यांमध्ये सर्वांत अलीकडच्या मद्याशी संबंधित असतो. कायदेशीरदृष्ट्या ही अनिवार्य बाब आहे.
जागतिक पातळीवर अल्कोहोलची मागणी पाहता, ती केवळ एज्ड व्हिस्कीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकत नाही. वर्षानुवर्षं साठवून ठेवणं आणि त्यानंतर बाजारात विक्रीसाठी पाठवणं यासाठी लागणारा वेळ जास्त असल्याने ग्राहक त्याची वाट पाहू शकत नाही. त्यामुळे जगभरात नो एज स्टेटमेंट व्हिस्कीला मागणी वाढत आहे. भारतासारख्या देशात अल्कोहोलचा खप इतका जास्त आहे, की देशी कंपन्या एजिंगची महागडी आणि दीर्घ प्रक्रिया अवलंबू शकत नाहीत. त्यामुळे भारतातले बहुतांश ब्रँड नो एज स्टेटमेंटची व्हिस्की उत्पादित करून विकतात. भारताचं तापमान आणि हवामान असं आहे, की इथे व्हिस्की कमी वेळेत परिपक्व होते, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. भारतातलं एक वर्षाचं एजिंग स्कॉटलँडमधल्या तीन वर्षाच्या एजिंगप्रमाणे आहे,असं काही जण मानतात; मात्र आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मद्याच्या बाटलीवर एज स्टेटमेंट टाकता येत नाही. त्यामुळे बहुतांश भारतीय ब्रँड्सवर याचा उल्लेख नसतो.

)







