प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 21 जून : शिक्षण, नोकरी किंवा अन्य कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्यांची संख्या पुण्यात मोठी आहे. या सर्वांना बाहेरगावी राहताना घरच्या खाण्याची आठवण नेहमी येते. हॉटेलमध्ये रोज खाऊन खाण्याचा त्यांना कंटाळा येतो. या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. कसं मिळणार घरचं जेवण? पुणेकरांना आता चांगलं खाण्यासाठी हॉटेलमध्येच ऑर्डर करण्याची गरज नाही. त्यांना आपल्या बाजूच्या घरातूनही घरचं जेवण ऑनलाईन ऑर्डर करता येईल. ‘स्वयंपूर्णा फाऊंडेशनं’ यासाठी मायमा खास अॅप सुरू केलय. या अॅपच्या माध्यमाधून तुम्ही एखाद्या घरातील सुगरणीनं बनवलेलं जेवण ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
‘या अॅपवर गृहिणींना रजिस्टर करावं लागतं. त्यानंतर त्या आज घरच्यांसाठी काय जेवायला बनवणार आहेत, याची माहिती अॅपवर देतात. त्यांच्या जवळपास राहणाऱ्या कुणाला हे जेवण हवं असेल तर त्यांना तशी मागणी करता येते. त्यानंतर ती गृहिणी त्या ऑर्डरनुसार जेवण बनवते. या माध्यमातून खाणाऱ्यांना घरच्यासारखं नाही तर घरचंच जेवण मिळतं,’ अशी माहिती मायमाचे संस्थापक अरविंद गंधारे यांनी दिली. 2019 साली सुरू झालेल्या या उपक्रमात राज्यातील जवळपास 40 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमामुळे त्यांची स्वयंपाकाची कला इतरांपर्यंत पोहचतीय तसंच रोजगारही मिळतोय, असं गंधारे यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील प्रसिद्ध रोडगे आप्पेपात्रात बनवा सोप्या पद्धतीने, पाहा खास recipe Video गरज ही शोधाची जननी असते. आमचे एकेकाळी खाण्याचे खूप हाल झाले. रोज बाजूच्या घरातून मसाल्याचा, स्वयंपाकाचा वास यायचा. बाजूच्या घरातून आम्हाला जेवण मिळालं तर बरं झालं असतं, असं नेहमी वाटायचं, त्याच उद्देशानं हे अॅप सुरू केलंय असं त्यांनी सांगितलं. किचनमध्ये काम करणं ही एक कला आहे. या माध्यमातून मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय त्याचा आनंद आहे,अशी भावना येथील सदस्य सुरेखा ढोबळे यांनी व्यक्त केली.