प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 19 जून : दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट हा संपूर्ण राज्यातील लोकप्रिय आहे. इडली, डोसा, उतप्पा यासारखे पदार्थ घरोघरी तयार केले जातात. त्याचबरोबर या पदार्थांचे स्पेशल हॉटेल आणि स्टॉलही फेमस आहेत. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागातही हे पदार्थ मिळतात. तुम्ही नेहमीचा डोसा खावून कंटाळला असाल तर एका खास हैदराबादी डोस्याची ओळख आम्ही करून देणार आहोत. पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या साई डोसा सेंटरमध्ये हैदराबादी डोसा मिळतो. नेहमीच्या डोस्याचा रंग पांढरा असतो. पण हा पिवळ्या रंगाचा आहे. त्यामध्ये बटाटा किंवा इतर भाजी नाही तर उपमा टाकून दिला जातो. ज्ञानेश्वर देवकाते या नांदेड जिल्ह्यातल्या तरुणाकडं हा स्पेशल डोसा मिळतो.
ज्ञानेश्वरनं बारावीपर्यंत शिक्षण घेतलंय. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे त्याला काम करणे भाग होते. तो बारावीनंतर सहा वर्षे हैदराबादमध्ये लहान-मोठी कामं करत होता. त्यावेळी त्यानं हैदराबादी डोस्याची माहिती घेतली. त्यानंतर मित्र आणि भावंडांच्या मदतीनं त्यानं पुण्यात हा स्टॉल सुरू केला. कसा असतो हैदराबादी डोसा? हैदराबादी डोस्यात तांदूळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ समप्रमाणात वापरली जाते. इतर डोशांचे जर आपण पीठ बघितले तर ते पूर्ण तांदळाचे असल्याने पांढऱ्या रंगाचे असतात परंतु हैदराबाद डोसा हा पिवळ्या रंगात येतो. यात टाकल्या जाणाऱ्या डाळिंमुळे आणि त्याचबरोबर जेवणात महत्त्वाच्या असणाऱ्या हळदीमुळे या डोस्याच्या पिठाला पिवळसरपणा येतो. सुरुवातीला गरम असणाऱ्या तव्यावर पाणी शिंपडले जाते त्या पाण्याला उकळी आल्यानंतर डोसाचे पीठ त्यावर पसरवले जाते. हात न लावता भरणार पाणीपुरी, ठाणेकराने आणलं सेन्सर पाणीपुरी मशीन, अशी तयार होते प्लेट! VIDEO आता तयार झालेल्या डोस्यावर उपमा टाकला जातो. त्यावर कांदा-टोमॅटो-कोथिंबीर तसंच खास हैदराबादी आलम चटणी टाकली जाते आणि तो ग्राहकांना दिला जातो, अशी माहिती ज्ञानेश्वर देवकाते यांनी दिली. ‘आमच्या या डिशला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. कधी दुकान बंद असेल तर ग्राहकांकडून विचारणा होते. रोज दुकान सुरू राहिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. दिवसभरात पाचशे ते सहाशे डोसाच्या प्लेटची विक्री होते. शनिवार-रविवार तर दीड ते दोन हजार ग्राहक ही डिश खायला येतात,’ अशी माहिती ज्ञानेश्वरनं दिलीय.