बीड, 18 जुलै: आपण नाश्त्याला पोहे, उपमा हे पदार्थ खातो. रोज तोच नाष्टा करून कंटाळा येऊ शकतो. विशेषत: लहान मुलांना चटपटीत खायला आवडते. मुलांना आवडेल असा नवा चटपटीत पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर पोह्याचा डोसा या खास पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बीडच्या दिपाली पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. तुम्ही आजवर मसाला पोहे, मिरची पोहे, दही पोहे, हे पदार्थ खाल्ले असतील. याच पोह्यापासून अवघ्या पाच मिनिटात डोसा तयार करता येतो, असं पाटील यांनी सांगितलं. दक्षिण भारतीय पदार्थ अनेकांना आवडतात. यामधील डोसा तयार करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे तो सहसा रोजच्या नाशत्याला करत नाहीत. पण, पोह्यांचा डोसा झटपट तयार होतो.
साहित्य आणि कृती पोहा मसाला डोसा बनवण्यासाठी 1 वाटी पोहे, 1कप दही, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा खाण्याचा सोडा, 1 बटाटे उकडलेले एक वाटी, 1 चमचा सांबार मसाला, तेल, पाणी आणि चवीनुसार मीठ घ्या. पहिल्यांदा पोहे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता त्यात दही आणि थोडे पाणी घाला. पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या मिश्रणात बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घालून मिक्स करा. तुमचा डोसा पीठ तयार आहे. आता गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा. त्यानंतर तव्यावर हलके पाणी शिंपडा आणि स्वच्छ कापडाने पुसून टाका.आता डोसा पीठ तव्यावर ओता आणि गोलाकार हालचालीत पसरवा. त्यानंतर गरमागरम कुरकुरीत असा डोसा तयार होतो. शेवपुरी सँडविच कधी खाल्लं का? एकदा पाहा हा VIDEO डोसासाठी भाजी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ, चणा डाळ घाला. मोहरीच्या तव्यावर काही सेकंद तळून घ्या. चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला आणि कांदे पारदर्शक होईपर्यंत तळा. हळद आणि हिंग घालून काही सेकंद परतून घ्या. मॅश केलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा. मिश्रण गरम होईपर्यंत काही मिनिटे शिजवा.गॅसवरून काढा आणि काही मिनिटे थंड होऊ द्या. गरमागरम बटाट्याची भाजी पोह्याच्या डोसा सोबत सर्व्ह करा.