मुंबई, 07 जानेवारी: अनेक महिलांचे चेहरे उजळ असतात. कांती तुकतुकीत, नितळ चमकदार असते पण त्यांचे पाय मात्र काळे, डाग असणारे असतात. स्त्रिया चेहऱ्याची विशेष काळजी घेतात, पण पायांची काळजी घेण्याबाबत मात्र दुर्लक्ष केलं जातं. पाय (Feet) स्वच्छ, सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी त्यांचीही काळजी घ्यावी लागते. त्याचं नियमितपणे पेडीक्युअर (Pedicure)करावं लागतं. ब्युटीपार्लरमध्ये जाऊन महागडं पेडीक्युअर करणं अनेकांना आवडत नाही. यासाठी खूप वेळही लागतो. पण आता घरच्याघरी अवघ्या दहा मिनिटांत पेडीक्युअर करून पायही सुंदर करू शकता. ज्यांना फार कमी वेळ मिळतो, त्यांच्यासाठी हा उपाय अगदी उपयुक्त आहे. या पद्धतीमुळे पायांवरील डाग नाहीसे होतील. पाय अगदी स्वच्छ आणि उजळ दिसू लागतील. पेडिक्युअरसाठी कोणतं साहित्य वापरायचं ? खोबरेल तेल नेलकटर टूथपेस्ट आणि ब्रश फाईलर उटण्याचा साबण किंवा तुरटी, हळदीचे पाणी मसूर डाळीचं पीठ मुलतानी माती टोमॅटो प्युरी हळद दही कसं कारायचं पेडिक्युअर ? सर्वात आधी पाय स्वच्छ धुवून नखं कापून घ्या. नेलकटरनं व्यवस्थित आकारात नखं कापा. नेलकटरच्या सहाय्यानं नखांच्या कडेला अडकलेली घाण काढून टाका. फाईलरच्या मदतीनं नखांना शेप द्या. त्यानंतर खोबरेल तेलानं पायांना मसाज करा. यामुळे पायांना पोषण मिळेल. त्यानंतर टूथपेस्ट आणि जुन्या ब्रशच्या सहाय्यानं नखं साफ करून घ्या. शक्य असल्यास मिंटयुक्त पेस्ट वापरा. यामुळे नखांचा पिवळेपणा कमी होईल. यानंतर उटण्याचा साबण किंवा तुरटीचं पाणी आणि बॉडी वॉश वापरून पाय स्वच्छ करून घ्या. पाण्याने पाय स्वच्छ धुवा. स्क्रब आणि पायांसाठी पॅक तयार करा : आता दोन चमचे मसूर डाळीचं पीठ, तीन चमचे मुलतानी माती, चार चमचे टोमाटो प्युरी, 1/4 चमचा हळद आणि 2-3 चमचे दही घालून मिक्स करा. हे स्क्रब आणि पॅक दोन्हींचं काम करेल. हा पॅक पायांना लावून सुकेपर्यंत ठेवा किंवा पाच मिनिटांनी काढून टाका. पाय पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. झालं पेडीक्युअर पूर्ण. आता पायांना मॉईश्चरायझर लावा. तुमचे पाय स्वच्छ आणि सुंदर झालेले असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.