मुंबई, 2 जुलै: चांगल्या आरोग्यासाठी आहारात सुका मेवा असावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, जर्दाळू, सुके अंजीर अशा सगळ्याच प्रकारच्या सुक्या मेव्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. त्यातल्या घटकांमुळे शरीराचं चांगलं पोषण होतं, शरीराची झीज भरून निघायला मदत होते आणि प्रकृती सुधारण्यास हातभार लागतो. बदाम हे बुद्धिवर्धक असतात. त्यामुळे रात्री थोडे बदाम (Almonds) पाण्यात भिजत घालून सकाळी खावेत, असा सल्ला दिला जातो. तसंच, बदामांच्या आहारातल्या समावेशामुळे त्वचाही चांगली होते. बदामाचं तेलही त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरलं जातं. असं सगळं असलं, तरी काही जण बदाम खाणं चांगलं असतं म्हणून खूप जास्त प्रमाणात बदाम खातात. कोणतीही गोष्ट ठरावीक आणि मर्यादित प्रमाणात खाल्ली तरच त्याचा अपेक्षित गुण मिळतो. अन्यथा त्यापासून अपाय होण्याची शक्यताच अधिक असते. FDAच्या माहितीनुसार, दररोज 40 ग्रॅम्सपेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत. बदाम त्यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले गेले, तर शरीराला अपाय होतो. याबद्दलची सविस्तर माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केली आहे.
बदामांमध्ये फॅट्स (Fats) आणि कॅलरीज (Calories) मोठ्या प्रमाणावर असतात. 100 ग्रॅम बदामांपासून साधारण 50 ग्रॅम फॅट्स मिळतात आणि त्यातले बहुतांश फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असलेल्या प्रकारचे असतात; पण तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल, तुमचं काम बैठं असेल, जीवनशैली आरोग्यदायी नसेल, तर या फॅट्सचा शरीर वापर करू शकत नाही. त्यामुळे फॅट्स शरीरात साठून चरबी वाढू शकते. त्यामुळे वजन वाढतं. वजन जास्त प्रमाणात वाढणं हे बाकीच्या अनेक विकारांना आमंत्रण देणारं ठरतं.
बदामांमध्ये फायबर्स (Fibres) अर्थात तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. खूप जास्त प्रमाणात बदाम खाल्ले गेल्यास शरीरात जास्त प्रमाणात फायबर्स जातात. त्यामुळे शरीराची पाण्याची गरजही वाढते. या सगळ्यामुळे पचनाचं चक्र बिघडतं. बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते, पोटातल्या अस्वस्थतेला निमंत्रण दिलं जातं.
कडू बदाम अजिबात खाऊ नका
काही बदाम कडू असतात. त्यात हायड्रोसायनिक अॅसिड (Hydrocyanic Acid) असतं. असे कडू बदाम खाल्ले गेले तर विषबाधा होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, अगदी एखाद्या केसमध्ये मृत्यूही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भवती महिलेने असे बदाम चुकूनही खाऊ नयेत, असं सांगितलं जातं.
बदाम जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास काही जणांना रॅशेस येणं, जळजळ होणं वगैरे अशा प्रकारची अॅलर्जी येऊ शकते. पूर्वीपासून एखादी व्यक्ती बदाम खात असेल आणि तिला काहीही त्रास नसेल, तरीही दररोज खूप जास्त प्रमाणात बदाम दीर्घ काळ खाल्ले गेले, तर अॅलर्जी निर्माण होऊ शकते. अॅलर्जी आली, तर बदामांचा पोषक घटक म्हणून उपयोग होत नाही, त्यापासून त्रासच होतो. जास्त प्रमाणात बदाम खाल्ले गेल्यास ब्लड शुगर (Blood Sugar) वाढू शकते, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मर्यादित खाल्ले तर पोषक नाहीतर...
बदामांमध्ये ऑक्सेलेट्स (Oxalates) मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात बदाम खाल्ले, तर शरीराला पोषक ठरतं; मात्र ऑक्सेलेट्सचं शरीरातलं प्रमाण खूप वाढलं, तर किडनी स्टोन्स (Kidney Stones) तयार होण्याचा धोका वाढतो. मूत्रविकारही होऊ शकतात.
कोणतं फळ खावं जेवणानंतर, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ
शरीराला दररोज 15 मिलिग्रॅम व्हिटॅमिन Eची आवश्यकता असते. 100 ग्रॅम बदामांपासून सुमारे 25 मिलिग्रॅम व्हिटॅमिन ई (Vitamin E) शरीराला मिळू शकतं. बदाम जास्त प्रमाणात खाल्ले गेले, तर या व्हिटॅमनिचा ओव्हरडोस होऊ शकतो. त्यातून डायरिया, अशक्तपणा, अंधूक दिसणं अशा समस्या उद्भवू शकतात.
100 ग्रॅम बदामांमध्ये 2.3 मिलिग्रॅम मँगनीज (Mangenese Mineral) असतं. शरीराला दररोज 1.3 ते जास्तीत जास्त 2.3 मिलिग्रॅम एवढ्या प्रमाणातच हे खनिज आवश्यक असतं.
Heart Attack मुळे मंदिराने गमावला आपला नवरा; कुणालाही हार्टअटॅक येताच करा 5 उपाय
या व्यतिरिक्त अन्य आहारातूनही आपल्या शरीरात हे खनिज जातच असतं. त्यामुळे तुम्ही घेत असलेली रेचक औषधं, बीपीची औषधं, अँटीबायोटिक्स आदींच्या परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
हे सगळे दुष्परिणाम लक्षात घेता बदाम आणि कोणतेही पौष्टिक पदार्थ ठरावीक आणि मर्यादित प्रमाणातच आहारात ठेवणं श्रेयस्कर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips