मुंबई, 25 मे : शारीरिक संबंध आनंदी सहजीवनात खूप महत्त्वाचा घटक समजला जातो. कारण आनंददायी शारीरिक संबंध तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकाळापर्यंत बांधून ठेवतात, असं म्हटलं जातं. पण, तुम्हाला माहिती आहे का, मधुमेह अर्थात डायबेटीसमुळे या लैंगिक संबंधांवर सुद्धा परिणाम होतो. ‘डीएनए’ने याबाबत वृत्त दिलंय. मधुमेह आणि हाय ब्लड शुगर हा व्यक्तीच्या शरीरावर विविध प्रकारे परिणाम करत असतो. व्यक्तीचा आहार आणि चयापचयवरसुद्धा याचा मोठा परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, टाईप 2 मधुमेहाचा व्यक्तीच्या लैंगिक आरोग्यावर अर्थात शारीरिक संबंधांवरही मोठा परिणाम होतो. मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार आणि वजन कसं वाढू शकतं, याबद्दल बरेच अभ्यास झाले आहेत. परंतु बहुतेकांना हे माहीत नाही की, मधुमेह हा लैंगिक आरोग्यावरदेखील परिणाम करू शकतो. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांची शारीरिक जवळीकीची इच्छा कमी असते. अमोरिकन डायबेटिस असोसिएशनचं मत काय? अमेरिकन डायबेटिस असोसिएशननं सांगितलं की, ‘ज्या पुरुषांना मधुमेह आहे, त्यांना अनेकदा इरेक्टाइल डिसफंक्शन तसंच अकाली वीर्यपतनाचा त्रास होतो. हे संप्रेरकांच्या प्रवाहात अडथळा आणतं, ज्यामुळे संबंधांमध्ये अडथळा येऊ शकतो.’ तर, मधुमेह असलेल्या महिलांना अनेकदा वजन वाढणं आणि हॉर्मोन्समधील असंतुलन यांचा सामना करावा लागतो. ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक संबंधांवर होतो. तसंच टाइप 2 मधुमेह आणि हाय ब्लड शुगर नियंत्रणासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळेसुद्धा व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. खरं तर, मधुमेहामुळे गंभीर परिणाम होणाऱ्या घटकांपैकी शारीरिक संबंध हा एक प्रमुख घटक आहे; पण याबद्दल खुलेपणानं बोलणं आजही अनेक कुटुंबांमध्ये निषिद्ध मानलं जातं. पण तुमचं वैवाहिक आयुष्य आणि लैंगिक आरोग्यावर हाय ब्लड शुगर तसंच मधुमेह याचा काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्या व्यक्तीची कामवासना कमी असते. याचा अर्थ असा की, जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी असते. दरम्यान, मधुमेहाचे ज्याच्यावर दुष्परिणाम होत नाहीत, असा शरीरातील अवयव शोधूनही सापडणार नाही. त्वचेपासून हाडांपर्यंत, हृदयापासून मेंदूपर्यंत सर्वच अवयवांवर मधुमेहामुळे परिणाम होत असतो. शारीरिक संबंधांवरसुद्धा मधुमेहाचे दुष्परिणाम घडून येतात. अशा वेळी योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.