अनाथ मुलांचा विषय निघाला आणि अनाथांची माय झालेल्या सिंधूताई सपकाळांचं नाव घेतलं नाही तर ही गोष्टच अपूर्ण ठरेल. जानेवारी महिन्यात सिंधूताई आपल्याला सोडून गेल्या आणि राज्यातील हजारो मुलं पुन्हा एकदा निराधार झाली. ज्या वेळी सख्ख्या आई-बापांनी दूर लोटलं होतं, त्यावे ताईंचा हात डोक्यावर पडला आणि अनेक मुलांना मायेचा, हक्काचा पदर मिळाला. हा पदर धरून मुलं मोठी झाली. याच पदाराने अनेक निराधार मुलांना जगण्याचं बळ दिलं. ताईंच्या कर्तृत्वाला सलाम. आज राज्यातच काय, पण देशभरात ताईंच्या कामाचं कौतुक केलं जातं. पण दुर्देवाने आपण फक्त कौतुकच करतो. ताईंनी जे काही केलं ते आपण फक्त लांबून पाहू शकतो. जेव्हा प्रत्यक्षात त्याचा अवलंब करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण मागे जातो. पण मी या परंपरागत चालणाऱ्या गोष्टींना बळी पडले नाही. माझं खूप आधीच ठरलं होतं. त्यानुसार मी वागले. माझं नाव इंदू. (नाव बदललेलं आहे) राहणारी नाशिकची. जेव्हा माझ्या लग्नाची बोलणी सुरू होती, तेव्हा मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नासाठी एक अट घातली होती.
‘मला स्वत:च मूल नको. मी दत्तकच मूल घेणार आणि त्याला वाढवणार’. दुसरं मूल हवं असेल तरी दत्तकच घेणार.’ जेव्हा मुलाला हे सांगितलं तर त्याला धक्काच बसला. स्वत: मूल नको??? म्हणजे त्याच्यावर डोंगरच कोसळला होता. त्याहून जास्त म्हणजे जेव्हा त्याने याबाबत त्याच्या आईला सांगितलं तर त्या माझ्या नावाने दूषणे लावून मोकळ्या झाल्या होत्या. मुलगीच वाझं असेल, तिला मूल होत नसेल वगैरे वगैरे…अर्थात हे लग्न केव्हाच मोडलं होतं. मात्र त्या इथवर थांबल्या नाहीत. त्या आमच्या नातेवाईकांच्या वर्तुळातील असल्यामुळे त्यांनी आणखी 10 जणांना माझ्या या निर्णयाविषयी सांगितलं होतं. त्यानंतर नातेवाईक माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होते, ते मी आजतागायत विसरू शकणार नाही. पण मी याचा फार विचार करत नव्हते. मात्र जग इतकही क्रूर नाहीये. पाच वर्षांपूर्वी माझ्या इच्छेला पाठिंबा देणाऱ्या एका तरुणासोबत माझं लग्न झालं. तोदेखील सामाजिक जाणीवा जपणारा होता. त्याला माझी सहवेदना लक्षात आली. त्याने मला पाठिंबा दिला. लग्नाच्या दोन वर्षानंतर आम्ही दत्तकची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर आमच्या घरात एक गोंडस मुलगी आली. अगदी एखाद्या परीसारखी. तिचे बोलके डोळे, प्रेमळ हसू..सकाळी तिचा चेहरा पाहिला की, आमचा दिवसच साजरा व्हायचा. या वयात करिअरवर फोकस; आई होण्याची आधीच करून ठेवलीय तयारी आम्ही पोटच्या लेकीपेक्षाही तिची जास्त काळजी घेतो. बऱ्याचदा तिचं आजूबाजूला असणच आम्हाला खूप आनंद देऊन जातं. ती कुठची आहे, तिचे खरे आई-वडील कोण, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. आणि जाणून घेण्याची इच्छाही नाही. ती आनंदात आणि सुदृढ राहावी हिच इच्छा. खरं सांगू तर आमची स्वत:ची मुलगी असती तरी ती देखील अशीच असली असती. काहीच फरक वाटत नाही. परंतू ज्यांना हा फरक वाटतो, तो का? मुलांवर तुम्ही जे संस्कार करता, त्यांना जसं वागवता ते मूल तसंच वाढतं. बऱ्याचदा मूल आई-बाबांकडे पाहूनच शिकत असतं. मग ते स्वत:च असो वा दुसऱ्याचं. आणि चुका फक्त दत्तक मूलच करतात का? स्वत:च्या रक्ताची मुलंही मोठ मोठे गुन्हे करू शकतात. हे आपण का विसरतो. मला ही सहवेदना अधिक कळते, कारण मलाही एका बुद्धिजीवी दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं आणि चांगलं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं. जर मला त्यांनी त्या आश्रमातून बाहेर काढलं नसतं, एक सुखी कुटुंब दिलं नसतं, तर कदाचित मी कधीच आयुष्यात CA होऊ शकले नसते. माझ्यात गुणवत्ता होती. पण या दाम्पत्याने मला शिक्षण, चांगलं घर, आई-बाबांचं प्रेम सर्वकाही दिलं. त्यांनी त्यांचं काम केलं, आता मला माझ्या कर्तव्याचं पालन करायला हवं. मीदेखील आमच्या परीला असंच सुखी आयुष्य देण्याचा प्रयत्न करेन.