मुंबई, 05 मे : डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी, पोलीस तसंच महापालिका आणि सरकारी कर्मचारी घराबाहेर पडून कोरोनाव्हायरसशी दोनहात करत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते नागरिकांचा जीव वाचवत आहे. दिवसरात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत आणि या परिस्थितीत अशीच लढाई सुरू ठेवण्यासाठी त्यांना गरज आहे ती योग्य आहाराची. कोरोनाशी लढा देणाऱ्या या सर्व कोरोना योद्धांचा आहार नेमका कसा असावा याबाबत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
उपाशीपोटी घराबाहेर पडू नका घरातून निघताना किमान चहा-पोळी, दूध-पोहे किंवा केळं खा. जेणेकरून अॅसिडीटीची समस्या बळावणार नाही. दिवसभर फक्त चहा पिऊ नका चहाशिवाय ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत आणि शहाळ्याचं पाणी शक्य तेव्हा प्या. जेणेकरून चहाचं सेवन कमी होईल आणि पोट चांगलं राहिल. भूक लागल्यास काय खाल? संध्याकाळच्या वेळेला भूक लागल्यावर शेंगदाणे, चणे, डब्यातील पोळी, चिवडा, केळं, आंबा असं काहीतरी खा. जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळेल, हेल्दी खाणं होईल आणि डोकंही दुखणार नाही. घरी गेल्यानंतर लगेच जेवा घरी गेल्यावर चहा-कॉफी पिऊ नका. डाळ-भात, आमटी-भात, वरण-भात, खिचडी असं हलकं काहीतरी खा. संपादन - प्रिया लाड