मुंबई, 12 नोव्हेंबर: धनत्रयोदशीच्या (dhanteras 2020) विविध वस्तूंची खरेदी केली जाते. धन या शब्दाचा अर्थ संपत्ती असा होतो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात धनदेवता कुबेराचं आणि लक्ष्मीचं पूजन करतात. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देव आणि दानावांनी केलेल्या समुद्रमंथनातून आजच्याच दिवशी (dhanteras 2020 date) देवी लक्ष्मीमाता प्रकट झाली होती. तिच्या हातात सोन्याचं भांडं होतं. तसंच आयुर्वेदाची देवता धन्वंतरींचीदेखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी नागरिक आपल्या घराबाहेर यम दीपम म्हणून दिवे लावतात. या दिवशी हिंदू सोनं, चांदी, सोने-चांदीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनं तसंच विविध प्रकारच्या चैनीच्या वस्तू खरेदी करतात. देवाची पूजा करून त्याचे आशीर्वादही घेतात. आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीला कोणत्या 5 वस्तू खरेदी करू शकता याची माहिती देणार आहोत.
1) भांडी: या धनत्रयोदशीला तुम्ही घरामध्ये वापरासाठी लागणारी भांडी विकत घेऊ शकता. भांडी हा घरातील दैनंदिन वापराचा भाग आहे. चांदीची किंवा तांब्याची भांडी खरेदी पवित्र मानली जाते त्यामुळे तुम्ही अशी खरेदी करून धनत्रयोदशी साजरी करू शकता. ही भांडी तुम्ही पूजेसाठी देखील वापरू शकता.
2) झाडू हिंदू पुराणांनुसार झाडूमध्ये लक्ष्मी देवीचा निवास असतो. त्यामुळे या दिवशी झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. त्याचबरोबर झाडू म्हणजेच लक्ष्मी गरिबी हटवण्याचे प्रतीक समजलं जातं. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे झाडूरूपी लक्ष्मची पूजाही केली जाते.
3) गोमती चक्र : गोमती चक्र पवित्र मानलं जातं. द्वारकेमधील गोमती नदीमध्ये आढळणाऱ्या गोगलगायी ज्या शंखात राहतात त्या शंखांना गोमती चक्र म्हटलं जातं आणि ही चक्र घरात असेल की संपत्ती, समृद्धी आणि आरोग्य लाभतं असा हिंदू धर्मामध्ये समज आहे. पिवळ्या वस्त्रामध्ये 11 गोमती चक्र ठेऊन ती धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवणं पवित्र असतं असं मानलं जातं.
4) सोन्याचांदीचे दागिने: दिवाळीच्या सणामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करत असतात. धनत्रयोदशीला सोन्याचे आणि चांदीचे दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी विविध ब्रँड्सच्या दागिन्यांवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळू शकतो.
5) इलेक्ट्रॉनिक वस्तू: या दिवशी तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील खरेदी करू शकता. फ्रीज, ओव्हन, मोबाईल फोन, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी तुम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काऊंटदेखील मिळू शकतात.