नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : अश्विनातील अमावास्येला दिवाळी (Diwali) असते. त्यानंतर कार्तिक (Kartik) महिन्याला सुरुवात होते. कार्तिक महिना हा हिंदू परंपरेनुसार व्रत-वैकल्यांसाठी विशेष मानला जातो. या महिन्यात श्री विष्णू आणि श्री महादेवाच्या पूजेला महत्त्व असतं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देव उठणी म्हणजेच प्रबोधिनी (स्मार्त) किंवा देवोत्थान एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं महत्त्व विशेष मानलं जातं. त्यातील कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहास (Tulsi Vivah) देखील प्रारंभ होतो. तसेच या दिवसापासून शुभ कार्य-विवाह समारंभ सुरू होतात. या एकादशीला तुम्ही तुळशी विवाहाचं आयोजन करण्याचा विचार करत असाल तर या अनुषंगानं काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. तुळशी विवाहासंदर्भातील काही विशेष गोष्टींची माहिती जाणून घ्या.
यंदा प्रबोधिनी एकादशी 14 नोव्हेंबरला साजरी होत आहे. खरंतर चार्तुमासादरम्यान चार महिन्यांचा कालावधी हा श्री विष्णू (Shree Vishnu) यांचा शयन कालावधी मानला जातो. कार्तिकी म्हणजेच देव उठणी एकादशीला श्री विष्णू यांचा शयनकाल संपतो. या दिवशी तुळशीचा विवाह शाळिग्रामासमवेत (Shaligram) संपन्न होतो. या दिवशी श्री विष्णू, महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. तुळशी विवाहासोबतच अन्य शुभ कार्य तसेच विवाहसमारंभांना सुरवात होते. देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह विधी करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.
देवउठणी एकादशीच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी श्री विष्णु भगवानांना जागं होण्यासाठी आवाहन करावं. त्यानंतर कुटुंबातील सदस्य, पाहुण्यांनी स्नान करून तुळशी विवाह सोहळ्यात सहभागी व्हावं. तुळशी विवाहासाठी मंडप उभारताना विशेष करून ऊसाचा (Sugarcane) वापर करावा.
विवाह सोहळ्यापूर्वी तुळशीच्या रोपाला ओढणी किंवा वस्त्र, बांगड्या घालाव्यात. त्यानंतर हळदी-कुंकू वाहून रोप सजवावं. ज्या ठिकाणी तुळशीचं रोप ठेवणार आहात, त्या जागेची स्वच्छता करावी. पूजन करण्यासाठी तुळशीचं रोप जागेच्या मध्यभागी ठेवावं. तुळशीचं रोप ज्या ठिकाणी ठेवणार आहात, त्या ठिकाणी सुबक रांगोळी काढावी.
तसेच तुळशीची कुंडी गेरूनं रंगवावी. त्यानंतर तुळशीच्या रोपाच्या उजवीकडं शाळिग्राम स्थापित करावा. त्यानंतर तुळशीच्या रोपासह एका भांड्यात शाळिग्राम ठेवावा आणि त्याला हळद मिश्रित दूध अर्पण करावं. भगवान शाळिग्राम यांच्यासाठी अक्षतांकरिता तिळाचा वापर करावा.
त्यानंतर शिंगाडा, ऊस, बोरं, आवळा, सफरचंद आदी फळांचा नैवेद्य दाखवावा. विवाह प्रसंगी मंगलाष्टका जरूर म्हणाव्यात. तसेच घरातील पुरूषानं भगवान शाळिग्राम हातात घेत तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्यात.
तुळशी पूजन आणि विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित कुटुंबीय, आप्तस्वकियांना प्रसादाचं वाटप करावं. सुख-समृद्धीसाठी या दिवशी तुळशी पूजन करणं लाभदायक मानलं जातं.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या घरी तुळशी-विवाह विधी करू शकता आणि त्यांचा आनंद लुटू शकता.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.