टेक्सास, 16 डिसेंबर करोनाकाळात (corona) जगभरात असंख्य लोक अकाली मृत्युमुखी पडले. मृत्यूच्या आणि पर्यायानं करोनाच्या थैमानाला कसं रोखायचं यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लस (vaccine) सापडल्यानंतर कदाचित एक काळ असा येईल, की करोनाला लोक विसरू लागतील. मात्र करोनाकाळात घडलेल्या काही वास्तवकथा मात्र कधीच विसरता न येण्यासारख्या.
त्यापैकीच एक अगदी मेलोड्रॅमॅटिक म्हणावी अशी खरीखुरी गोष्ट घडली नॉर्थ टेक्सासच्या ग्रँड प्राइरी इथं. एका जोडप्याचं आयुष्य कोरोनानं हिरावून घेतलं. पॉल ब्लॅकवेल आणि रोज मेरी ब्लॅकवेल हे एक विवाहित जोडपं. दोघंही स्थानिक शाळांमध्ये शिक्षक होते. दोघांनाही करोनाचा संसर्ग झाला आणि डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केल्याचं वृत्त 'डीएफडब्ल्यू-सीबीएस'नं दिलं आहे.
या वृत्तानुसार, हे जोडपं फोर्ट वॉर्थ इथल्या हॅरिस मेथॉडिस्ट हॉस्पिटलमध्ये एकत्र उपचार घेत होतं. दरम्यान कोविड -19 जास्तच बळावल्याने दोघांची प्रकृती अधिकच बिघडली आणि दोघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. रोज आणि पॉल जास्त काळ जगू शकणार नसल्याचं दोघांच्याही कुटुंबियांना कळवण्यात आलं.
कुटुंबीयांनी मनावर मोठा दगड ठेवत नाईलाजानं निर्णय घेतला. जीवरक्षक यंत्रणा अर्थात लाईफ सपोर्ट सिस्टम हटवण्याचा निर्णय. प्रत्यक्ष व्हेंटिलेटर आणि इतर नळ्या काढत मृत्यूला सामोरं जाताना पॉल आणि रोज यांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता. या दोघांचा मुलगा ख्रिस्तोफर ब्लॅकवेल यानं हा निःशब्द करणारा प्रसंग अनुभवला. आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय, "हे सगळं शब्दात सांगणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. असलं काही याआधी मी कधीच अनुभवलं नाही."
पॉल फेनिन माध्यमिक शाळेत तर रोज ही ट्रॅव्हिस लँगवेज अकॅडमीमध्ये शिकवायची. त्यांना करोनाचा संसर्ग नक्की कसा झाला हे अद्याप कळलेलं नाही. या दोघांच्याही विद्यार्थ्यांना ही बातमी ऐकून मोठाच धक्का बसल्याचे कळते. त्यामुळे दोघेही जिथं शिकवायचे त्या संस्थांनी आपापल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.या दोघांच्याही अंत्यसंस्कारासाठी कुटुंबांनी फंड उभारणीही सुरू केली आहे.
कोरोनामुळे विदेशातच नाही तर आपल्या देशातही अकाली मृत्यू होत आहेत. आणि त्यातून निर्माण होणारे असंख्य भावनिक प्रसंगही आपण सगळे अनुभवत आहोत.