नवी दिल्ली, 01 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी भारतात कोरोना लस तयार करणाऱ्या औषधं कंपन्यांना भेटी दिल्या. पुण्यातील अहमदाबाद, हैदाराबाद आणि लस निर्मिती केंद्रांना भेटी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही व्हर्च्युअल चर्चा केली आहे. covid-19 च्या लशीवर संशोधन आणि त्याची निर्मिती करणाऱ्या तीन कंपन्यांसोबत व्हर्च्युअल मीटिंग केली. पुण्यातील बायो फार्मास्युटिकल लिमिटेड, आणि हैदराबादेतील बायलॉजिकल ई लिमिटेड तसंच डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज या कंपन्या त्यांच्या परदेशी जोडीदार कंपन्यांसोबत लस विकसित करत आहेत.
जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स
पुणे येथील जेनोवा बायो फार्मासिटिकलने अमेरिकेतील सिएटलमधील HDT बायोटेक कॉर्पोरेशनसोबत mRNA लस विकसित केली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगांत त्यांची लस ही सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी जेनोवाला भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून निधी मिळाला आहे.
कंपनीनं डिसेंबर महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. mRNA प्लॅटफॉर्मचा वापर करून बनवलेली ही भारतातील एकमेव लस आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने असे म्हणले आहे की, mRNA वर आधारित ही लस शरीरातील पेशींना विषाणूंविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी प्रोटिन तयार करण्यासाठी प्रेरित करेल. ही लस मॉलिकुलर सूचना वापरून प्रथिने तयार करेल आणि यासाठी सिन्थेटिक RNA चा वापर केला जाईल. यामुळे शरीरामध्ये व्हायरल प्रोटीन निर्माण होईल आणि त्यांचा प्रतिकार म्हणून शरीर आपली स्वतःची प्रतिकार क्षमता तयार करेल असं कंपनीने म्हणलं आहे.
बायोलॉजिकल ई व्हॅक्सिन
हैदराबाद असलेल्या बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीने यासाठी अमेरिकास्थित डायनावॅक्स टेकनॉलॉजीज कॉर्पोरेशन आणि ह्युस्टनमधील हेल्थ सायन्सेस विद्यापीठातील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन यांच्याशी करार केला आहे. ही लस SARS- CoV-2 च्या स्पाईक प्रथिनांच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनपासून बनली आहे. तसेच बायॉलॉजिकल ई या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नंतरच्या लशीसाठी जनसीन फार्मस्युटिकलसोबत पण करार केला आहे.
कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून या लसीच्या फेज 1 आणि फेज 2 साठीच्या सुरक्षितता, परिणामकारकता आणि प्रतिकारक्षमता या चाचण्या करण्यासाठी लागणारी परवानगी मिळवली आहे, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया(CTRI) नुसार या लशीच्या चाचणीसाठी दिल्ली, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून 360 जणांची निवड करण्यात आली आहे. या लसीचे परीक्षण 28 दिवसाच्या अंतराने 2 डोस देऊन करण्यात येईल असं CTRI ने म्हणलं आहे.या क्लिनिकल ट्रायलचे निकाल फेब्रुवारी 2021 पर्यंत लागण्याची शक्यता आहे.
डॉ. रेड्डीज स्पुटनिक व्हॅक्सिन
हैद्राबादमधेच असलेल्या डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजने रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड(RDIF)सोबत स्पुटनिक लसीच्या फेज 1 आणि फेज 2 च्या चाचणीसाठी तसेच भारतामध्ये त्याचे वितरण करण्यासाठी करार केला आहे.
लस निर्मितीसाठी RDIF ने हेटेरो बायोफार्मासोबत स्वतंत्र करार केला आहे. हेटेरो फार्मा या लसीचे 10 करोड डोस तयार करणार आहे आणि जी गमालिया इन्स्टिटयूट, मॉस्को यांनी विकसित केली आहे.
क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीनुसार ही चाचणी उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील 9 केंद्रावर होणार आहे. गॅम-कोविड व्हॅकक कंबाइनन्ड व्हेक्टर व्हॅक्सिनची रँडम पद्धतीने डबल ब्लाइंड, प्लासिबो कंट्रोल्ड चाचणी केली जाणार असून लशीची सुरक्षितता आणि प्रतिकारक्षमता तपासली जाईल. ही चाचणी जगात अन्यत्र चालू असणाऱ्या इतर संशोधनासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. फेज 1 मध्ये 100 स्वयंसेवक आणि फेज 3 मध्ये 1500 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.