मुंबई, 30 डिसेंबर : देशात नव्या कोरोनाचं संकट येऊन ठेपलं आहे. त्यात आता महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण (Maharashtra Coronavirus Updates) पुन्हा वाढू लागले आहेत. तीन दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून येते आहे. सोमवारी 2,498 तर मंगळवारी 3,018 आणि आज बुधवारी 3,537 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं आणि नव्या कोरोनाला रोखण्याचं असं दुहेरी आव्हान राज्य सरकारसमोर आहे.
बुधवारी राज्याच्या आरोग्य विभागनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 3,537 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 19,28,603 वर पोहोचला आहे. तर गेल्या तीन दिवसांत मृतांची आकडेवारीही 50 ते 70 च्या दरम्यानच आहे.
राज्यातील एकूण 19,28,603 रुग्णांपैकी सध्या 53,066 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे आणि ठाण्यात आहेत. पुण्यात 13743 तर ठाण्यात 10159 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंतची आकडेवारी
राज्यातली कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या 19,28,603
गेल्या 24 तासांत राज्यात झालेले मृत्यू - 70
आजच्या घडीला उपचाराधीन रुग्णसंख्या - 53,066
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना निदान झालेले रुग्ण - 3,537
राज्याचा मृत्यूदर - 2.56%
भारतातील सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातच आहेत. देशातील जवळपास 5.3 टक्के कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांचे जरी प्रमाण जास्त असले तरी बरे होण्याचे प्रमाणही याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुण्यावरील संकट अजूनही कायम असल्याचं चित्र आहे.
त्यात आता भारतात नव्या कोरोनानं शिरकाव केला आहे. नव्या कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत. हा कोरोनाव्हायरस अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची नीट तपासणी केली जाते आहे.