तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या
कोरोनाव्हायरसची लक्षणं (coronavirus symptoms) दिसताच, सर्वात आधी जनरल फिजिशिअनकडे जा. 2 ते 3 दिवसांत बरं नाही वाटलं तर सरकारने जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरून (helpline for coronavirus) मिळेल.
मुंबई, 05 मार्च : सर्दी झाली, खोकला येतो, ताप आला आहे, घशात खवखवतं आहे, नाकातून पाणी वाहतं आहे. अशी लक्षणं दिसली की मला कोरोनाव्हायरस तर झालं नाही, अशी भीती प्रत्येकाच्या निर्माण होते. आधी ज्या लक्षणांकडे आपण सामान्य म्हणून दुर्लक्ष करत होतो, आता तशी लक्षणं दिसताच आपल्याला पायाखालची जमीन सरकते. कारण भारतात एकूण 30 जणांना कोरोनाव्हायरस झाल्याचं निदान झालं आहे आणि प्रत्येकाने त्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे खरंतर अशा सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाच, मात्र घाबरूनही जाऊ नका.
कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्यानंतर सर्वात आधी तुम्ही काय कराल. तर सर्वात आधी तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा, शिवाय सरकारने कोरोनाव्हायरससाठी जारी केलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही कोरोनाव्हायरसबाबत माहिती देण्यासाठी 24 तास हेल्पलाईन जारी केलेत.
तुमच्या लक्षणांबाबत माहिती विचारली जाईल, तुम्ही महिनाभरात कुठे प्रवास केला त्याची माहिती घेतली जाईल. तुमचं नाव आणि तुम्ही सांगितल्यानुसार लक्षणांची नोंद केली जाईल.
जर तुम्हाला 2 दिवसांपासून ही समस्या जाणवत असेल तर तुम्हाला आधी जनरल फिजिशअनकडे जाण्याचा सल्ला दिला जाईल. कारण अशी 99 टक्के प्रकरणं ही वातावरण बदलामुळे असतात.
जर औषधं घेऊनही तुम्हाला 2 ते 3 दिवसांत बरं नाही वाटलं तर कोरोनाव्हायरसची तपासणी करून घेण्यासाठी परिसरातील आरोग्य अधिकाऱ्याचा संपर्क दिला जातो आणि तिथं जाऊन तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जिथं मोफत तपासणी आणि चाचणी केली जाते.
जर गरज असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण म्हणून quarantine केलं जातं, म्हणजे विशिष्ट ठिकाणी वेगळं ठेवलं जातं किंवा होम आयसोलेशन म्हणजे घरातच त्याचा कुणाशी संपर्क येणार नाही, अशी खबरदारी घेतली जाते. ही व्यक्ती वैद्यकीय देखरेखीत असते.