मुंबई : भारतात कोविड-19 महामारीच्या तीन लाटा येऊन गेल्या. पहिल्या दोन लाटांपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी होतं. त्याचं कारण तोपर्यंत लसीकरणानं वेग घेतला होता. भारतासह काही देशांनी कोरोनाप्रतिबंधक लशी विकसित केल्या. या लशी दोन डोसमध्ये देण्यात आल्या. लहान मुलांसाठी लस तयार करण्याबाबत चर्चा सुरू झाली, तेव्हा नाकावाटे देण्यात येणाऱ्या लशीवर संशोधन सुरू झालं. अमेरिकेतल्या ग्लॅडस्टोन संस्थेतल्या संशोधकांनी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीचा (Corona Nasal Vaccine) शोध लावला आहे. यामुळे कोरोना म्हणजेच सार्स-सीओव्ही 2 या व्हायरसचा संसर्ग झालेल्या प्राण्यांपासून होणारा प्रसार आणि संसर्ग कमी होऊ शकतो. या लशीमुळे आणखी कोणकोणते फायदे (Effect Of Nasal Vaccine) होऊ शकतात, याबद्दल संशोधनातून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये एक नवीन संशोधन प्रकाशित झालं आहे. ‘थेरापेटिक इंटरफिअरिंग पार्टिकल’ (TIP) नावाचा हा उपचार प्राण्यांद्वारे होणारा विषाणू संसर्ग कमी करतो. तसंच या विषाणूचा प्रसारही कमी करण्यास मदत करतो. “इतिहासात डोकावून पाहिल्यास असं लक्षात येईल, की लस किंवा अँटी व्हायरल औषधांनी श्वासोच्छवासाद्वारे होणारा विषाणू संसर्ग रोखणं आजवर खूप कठीण होतं; मात्र टीआयपीच्या एका डोसमुळे प्राण्यांकडून होणारा संसर्ग कमी होतो, असं या अभ्यासावरून स्पष्ट झालं आहे,” असं संशोधक लियोर वीनबर्गनन यांनी सांगितलं. वीनबर्गन आणि सोनाली चतुर्वेदी या संशोधकांनी सार्स-सीओव्ही 2 झालेल्या उंदरांवर अँटी व्हायरल टीआयपी उपचार केले. या उपचारांनंतर त्यांच्या नाकातल्या विषाणूंची संख्या मोजली. ज्या उंदरांवर उपचार केले नाही त्यांच्या तुलनेत टीआयपी औषध दिलेल्यांच्या नाकात दर वेळी विषाणूंची संख्या कमी झालेली आढळली. कोविड-19 महामारीच्या काळात या आजारावर इलाज करण्याच्या दृष्टीने औषधं व लस विकसित करण्यात आली होती; मात्र संसर्ग कमी करण्यासाठी कोणतंही औषध तयार करण्यात आलं नाही. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी जेव्हा पॉझिटिव्ह येते, तोपर्यंत कोविडचा विषाणू रुग्णाच्या श्वासनलिकेपर्यंत जाऊन पोचलेला असतो. यामुळे त्या व्यक्तीच्या श्वासातून कोविडचा प्रसार सुरू झालेला असतो. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क वगैरे लावण्याचे उपाय तर झाले; पण लस किंवा औषध विकसित करण्यासाठी संशोधन सुरू होतं. अमेरिकेतल्या संशोधकांनी विकसित केलेल्या लशीमुळे सार्स-सीओव्ही2 चा प्रसार कमी करून त्याचा संसर्गही नियंत्रणात ठेवला जातो. हे अँटी व्हायरल औषध नाकावाटे दिलं जातं. कोरोना महामारीची तीव्रता कमी झाली असली, तरी संसर्ग अजून पूर्णपणे गेलेला नाही. अशा प्रकारच्या आजारांचा प्रसार कमी करण्यासाठी भविष्यात काय करता येईल, याबाबत आता शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.