बीजिंग, 01 फेब्रुवारी : माहिती-तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यातल्या अनेक गोष्टी सुलभ केल्या. आता अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) आधारे अनेक असाध्य गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगभरात याबाबत संशोधन सुरू आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चिनी शास्त्रज्ञ (China Scientist) तर चक्क गर्भाशयाबाहेर गर्भनिर्मिती करण्याचा आणि त्यांची वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे काही वर्षांनी भ्रूणदेखील (Fetus) गर्भाशयाबाहेर (Womb) वाढवला जाईल आणि रोबोट (Robot) त्याची देखभाल करतील, असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्नल ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये नुकतंच याबाबतचं संशोधन प्रकाशित झालं आहे. चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गर्भाशयाबाहेर गर्भ वाढवण्याचं तंत्र विकसित करण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याला कारण आहे तिथं घटत असलेला जन्मदर (Birth rate). जगातली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला आता घटत्या जन्मदराची समस्या भेडसावत आहे. चीनमधला जन्मदर सध्या गेल्या सहा दशकांतल्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे तिथे नवीन पिढीची लोकसंख्या अगदी कमी असण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी चिनी शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेलं हे आगळंवेगळं तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. चीनच्या झुझू इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतले शास्त्रज्ञ हे संशोधन करत असून, या तंत्रामुळे महिलांना बाळाला नऊ महिने पोटात ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गर्भधारणेदरम्यानच्या समस्यांपासूनदेखील मुक्तता मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे, तर गर्भावर (Fetus) लक्ष ठेवण्यासाठी रोबोट्स असतील. गर्भाची वाढ झाल्यापासून बाळाची सगळी काळजी या एआय नॅनी म्हणजे रोबोट नॅनी घेतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा - पहिल्या प्रसूतीनंतर 8 व्या महिन्यातच झालं दुसरं बाळ; प्रेग्न्सीमुळे महिला शॉक सध्या उंदरांवर (Mouse) हे संशोधन केलं जात असून, शास्त्रज्ञ इन व्हिट्रो कल्चर ( Invitro culture) प्रणालीच्या मदतीने भ्रूण तयार करत आहेत. गर्भाच्या विकसनाची सर्व प्रक्रिया पूर्णपणे नियंत्रित वातावरणात होत आहे. चिनी शास्त्रज्ञांनी लाँग-टर्म एम्ब्रियो कल्चर डिव्हाइस (Long-Term Embryo Culture Device) तयार केलं आहे. या उपकरणामध्ये पोषक द्रव्यांची एक जटिल प्रणाली आहे. त्याच्या आत गर्भ विकसित होतो. द्रव मर्यादित करण्यासाठी नियंत्रक असून, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठादेखील यात आहे. या उपकरणात एक ऑप्टिकल उपकरणही (Optical Device) आहे, जे गर्भाचा आकार मोठा करून दाखवतं, जेणेकरून त्याच्या शरीराच्या विकसनावर बारकाईने लक्ष ठेवता येईल. हे उपकरण रोबोट नॅनीला सूचना देते. त्यानुसार ती काळजी घेण्याचं काम करते. गरज असेल तेव्हा ती डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना माहिती देते. हा प्रयोग उंदरांच्या कृत्रिम भ्रूणांवर (Fetus) केला जात असल्याचं या संशोधन अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे उंदरांच्या बाबतीत जसं घडत आहे, तसं ते मानवालाही लागू होईल, असं नाही. भलेही भविष्यात मानवी भ्रूणांवर रोबोट्सद्वारे देखरेख ठेवली जाऊ शकते. इतर प्राण्यांच्या भ्रूणांवर लक्ष ठेवण्याचं काम रोबोट नॅनी करेल आणि त्याच्या परिणामांच्या आधारे मानवावर प्रयोग केले जाण्याची शक्यताही आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय कायद्याची अशा प्रयोगांना मान्यता नाही. माणसांवर असे प्रयोग करण्यास मनाई असून, अनेक देशांमध्ये कृत्रिम भ्रूण बनवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध होत आहे. हे वाचा - ‘माझा श्वास गुदरमतोय’, ब्रेस्टला वैतागली महिला; लोकांसमोर मदतीसाठी पसरले हात चिनी शास्त्रज्ञांच्या हवाल्याने ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे, की या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जीवसृष्टीची उत्क्रांती समजण्यास मदत होत असून, भविष्यात आपल्याला मानवी भ्रूणाचा विकास अधिक जवळून समजून घेता येईल. मानवी गर्भाच्या विकासाशी संबंधित अनेक समस्यांवर मात करता येईल. आपल्याला कसं मूल हवं आहे तसं मूल जन्माला घालता येण्याची सुविधा उपलब्ध होईल, असंही संशोधकांनी म्हटलं आहे, असं वृत्त झी न्यूज ने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.