मुंबई,20 ऑक्टोबर: निम्याहून अधिक चिनी लोकांना दूध का पचत नाही? चीनमधील निम्याहून अधिक लोक लॅक्टोज इनटॉलरंट आहेत, म्हणजे ते दूध पचवू शकत नाहीत. संशोधनातून सिद्ध झालं आहे की, चिन्यांच्या डीएनए(DNA)मुळेच असं होतं आणि जन्मल्यापासूनच ते दूध पचवू शकत नाहीत. मग साप, वटवाघूळासारख्या प्राण्यांचं पचायला अवघड मांस ते सहज पचवतात पण त्यांना दूध का पचत नाही? जाणून घेऊया.
चिनी लोकांना दूध का पचत नाही?
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही, तूप, पनीर, बटर या सगळ्यात लॅक्टोज नावाची साखर असते.ती पचवणारी एंझाइम छोट्या आतड्यात स्रवतात. पण ज्यांना दूध पचत नाही त्या व्यक्तींच्या शरीरात ही एंझाइमच स्त्रवत नाहीत त्यामुळे ते लॅक्टोज आणि पर्यायाने दूधही पचवू शकत नाहीत यालाच लॅक्टोज इनटॉलरंट म्हणतात.
लॅक्टोज इनटॉलरन्स कसा कळतो?
दूध प्यायल्यानंतर अर्ध्या तासापासून ते 2 तासांपर्यंत पोटात दुखणं, उलटी होणं, पोटातून आवाज येणं किंवा जुलाब होणं अशी लक्षणं दिसली तरी दूध पचलं नाही असं म्हणता येईल. हाच त्रास नेहमी दूध प्यायल्यावर झाला तर तुम्हाला लॅक्टोज पचत नाही हे निश्चित आहे. तुम्ही लॅक्टोज इनटॉलरंट आहात का हे तुम्हाला काही चाचण्या करूनही जाणून घेता येतं.काहींचा वयानुसार हा त्रास कमी होतो तर काहींना कायम राहतो. आशियातील लोकांमध्ये लॅक्टोज इनटॉलरन्स जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. त्यातल्यात्यात चिनी लोकांमध्ये याचं जास्त प्रमाण आहे. युरोपातील लोकांना हा त्रास फारसा सहन करावा लागत नाही.
चिनी नागरिकांना हा त्रास का?
चीनच्या या समस्येचं कारण शास्रज्ञांना अद्याप सापडलेलं नाही. पण असा समज आहे की चीन आणि आफ्रिकेतील देशांमध्ये इतकी गरिबी होती की त्यांच्या पूर्वजांना दूधही मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या डीएनएमध्ये तसे बदलच झाले नाहीत आणि ते आजपर्यंत तसेच आहेत.शरीरात झाले बदल शास्रज्ञांच्या मते पाषाण युगापासून मानवी शरीरात आणि बाहेरच्या अवयवांमध्ये अनेक बदल झाले. खाण्याच्या सवयीही बदलल्या. हा बदल खायला उपलब्ध पदार्थांनुसार झाला, म्हणजे शेतकऱ्यांना जनावरांमुळे दूध मिळालं आणि दूध प्यायची सवय झाली त्यामुळे शरीराला हळूहळू दूध पचवायची सवय होत गेली. biorxiv या सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. त्या काळात चीनबरोबरच आशियातील अनेक देशांत दूध उपलब्ध नव्हतं त्यामुळे तिथल्या माणसांच्या शरीरांत त्याला अनुकूल बदल घडले नाहीत त्यामुळे चिनी लोक दूध पचवू शकत नाहीत.
दूध उत्पादनात चीन तिसरा
या सगळ्यात सर्वांत महत्त्वाची आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावरील सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशांत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकवर आहे. UK Agriculture & Horticulture Development Board ही क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांत चीनने दरवर्षी 37 मिलियन टनांहून अधिक दूधाचं उत्पादन केलं आहे.एवढं दूध असूनही ते पिण्याऐवजी त्याच्या निर्यातीला चीन प्राधान्य देतो.