मुंबई, 23 मार्च : महिला व पुरुषांच्या आरोग्याचा विचार केल्यास, महिलांना वयोमानानुसार, परिस्थितीनुसार येणाऱ्या समस्यांव्यतिरिक्त स्त्रियांच्या काही विशिष्ट अशा शारीरिक समस्याही असतात. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये कर्करोगाचं प्रमाण आता वाढू लागलेलं आहे. जगभरात दर वर्षी लाखो महिलांना कर्करोगाचं निदान होतं. त्यामुळेच कर्करोगाविषयीचे गैरसमज दूर करणं, त्याबद्दल जागरूकता पसरवणं अधिक महत्त्वाचं आहे. बेंगळुरूतल्या Aster CMI रुग्णालयातल्या रेडिएशन ऑन्कॉलॉजी विभागातल्या डॉ. पुष्पा नागा सी. एच. यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.
कर्करोग म्हणजे मृत्यू असा समज समाजात जास्त पसरला असला, तरी कर्करोगामुळे होणारे जवळपास 40 टक्के मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. तसंच वेळेत निदान व उपचार मिळाल्यास सामान्य कर्करोगाचे दोन तृतीयांश रुग्ण बरेही होऊ शकतात. व्यापक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणी, लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे दर वर्षी अनेक महिलांचे प्राण वाचू शकतात.
कर्करोगाची सामान्य कारणं
प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, तसंच कर्करोगाचंही असतं. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीला होणारा कर्करोगही वेगवगळा असतो. भारतातल्या महिलांमध्ये सामान्यपणे स्तन, गर्भाशय, अंडाशय, तोंड, फुफ्फुस, कोलोरेक्टल आणि त्वचेचा कर्करोग आढळतो. कर्करोग होण्यामागे आनुवंशिक, जेनेटिक, पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी निगडित अशी विविध कारणं असू शकतात.
सामान्यपणे कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी, वाढतं वयोमान, लठ्ठपणा, मद्यपान, तंबाखूचा वापर, मसालेदार, तळलेले पदार्थ, लाल मांस यांचं सेवन, प्रजननाशी संबंधित पार्श्वभूमी (लवकर रजोनिवृत्ती, उशिरा रजोनिवृत्ती, मूल नसणं), अस्वच्छता, कमी वयात किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत शरीरसंबंध, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, रेडिएशन किंवा रसायनांशी वारंवार संपर्क येणं, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV), ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV), हिपॅटायटिस व्हायरस, हेलिकोबॅक्टर पायलोरी यामुळे होणारा संसर्ग या गोष्टी कर्करोगाचा धोका वाढवतात; मात्र कर्करोगाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये असा कोणताही घटक आढळून येत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय व निदान
योनिमार्गाचा, गर्भाशयाच्या मुखाचा आणि व्हलव्हल कर्करोग अशा HPVशी संबंधित कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रोफिलॅक्टिक लसीकरण प्रभावी ठरू शकतं. सध्या उपलब्ध असलेल्या प्रोफिलॅक्टिक लसी 45 वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांना देता येऊ शकतात; मात्र 9-15 वर्षं वयोगटातल्या म्हणजेच किशोरवयीन मुलींसाठी त्यांची अधिक शिफारस केली जाते. पहिल्या लैंगिक संबंधापूर्वी ही लस घेतल्यास ती जास्त प्रभावी ठरते.
जीवनशैलीतले चांगले बदल, नियमित शारीरिक हालचाली (व्यायाम, जलद चालणं, योगासनं), तंबाखू, धूम्रपान व मद्यपान टाळणं, चांगला आहार घेणं (फळं, भाज्या व धान्यांचं सेवन), तळलेल्या, मसालेदार पदार्थांचं व मांसाहाराचं कमी सेवन, कमीत कमी कॅलरी असलेले पदार्थ खाणं, वैयक्तिक स्वच्छता राखणं, रेडिएशनचा अनावश्यक संपर्क टाळणं, स्वतःच स्वतःच्या शरीराची नियमित तपासणी करणं या गोष्टींमुळे कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. BRCA 1 आणि 2, TP53, ATM यांसारख्या विशिष्ट जनुकीय बदलांसाठी असलेल्या काही चाचण्या आनुवंशिक कर्करोगाचा धोका ओळखण्यास मदत करतात.
काही सामान्य प्रकारच्या कर्करोगाचं निदान करण्यासाठीच्या तपासण्या कर्करोगाचा धोका जवळपास 80 टक्के कमी करू शकतात. त्यासाठी चाळीशीच्या पुढच्या महिलांनी, कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी असो अथवा नसो, काही चाचण्या नियमितपणे केल्या पाहिजेत. मॅमोग्राफी, सर्व्हायकल पॅपस्मीअर टेस्ट, अंडाशय व गर्भाशयाची तपासणी, कॉल्पोस्कोपी/सिग्मायडोस्कोपी, तसंच Faecal Occult Blood Test, तोंडाची तपासणी या चाचण्या महिलांनी केल्या पाहिजेत. CA-125 (ओव्हरीचा कर्करोग), CEA (कोलन कर्करोग) आणि AFP (यकृताचा ट्यूमर) यांसारख्या काही चाचण्या व निरीक्षणं कर्करोगाचं लवकर निदान करण्यास मदत करतात.
कर्करोगाची लक्षणं
कोणत्याही प्रकारची सूज, गाठ, स्तनांमधला विचित्र बदल, योनिमार्गातून होणारा असामान्य स्राव, रक्तस्राव, जुनाट व बऱ्या न होणाऱ्या जखमा, त्वचेवरचे बदल, जुनाट खोकला, आवाजातला कर्कश्शपणा, आवाजातले बदल, गिळण्यास येणाऱ्या समस्या, पोटदुखी, ओटीपोटात दुखणं, भूक मंदावणं, वजन कमी होणं, आतड्याच्या हालचालींमधले बदल, पोट फुगल्यासारखं वाटणं अशा प्रकारची लक्षणं तपासून कर्करोगाचं वेळेत निदान करणं शक्य असतं.
प्रत्येक कर्करोगाचं निदान व त्याचे उपचार वेगवेगळ्या प्रकारे होतात. कर्करोगाच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी अशा उपचारपद्धतींचा समावेश असतो. लवकर निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. तसंच कोणत्याही पातळीवरच्या कर्करोगासाठी उपचार शक्य असतात. शरीराच्या विविध भागांत पसलेल्या कर्करोगाच्या वरच्या टप्प्यावरही तो नियंत्रणात ठेवणं शक्य होऊ शकतं. कर्करोगावरचे प्रभावी उपचार आता उपलब्ध असल्यानं रुग्ण अधिक काळ व चांगलं जीवन जगू शकतात.
महिलांचं सक्षमीकरण, लैंगिक असमानता यांच्याबाबत बोलताना महिलांच्या आरोग्यालाही प्राधान्य देणं गरजेचं आहे. महिलांमधल्या कर्करोगाबाबतचे गैरसमज दूर केल्यास, तसंच आरोग्याच्या चांगल्या सवयींबाबत जनजागृती केल्यास कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Cancer, Health, Health Tips, Lifestyle