स्तन (breast) हा महिलांच्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग असतो. बहुतेक महिलांना स्तनाशी संबंधित समस्यांविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे स्तनांमध्ये थोडाजरी बदल झाला किंवा समस्या जाणवू लागली तर लगेच महिलांना भीती वाटू लागते. त्यापैकीच एक म्हणजे स्तनांना येणारी सूज. स्तनांना सूज येताच महिलांच्या मनात कित्येक प्रश्न घर करतात. myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, स्तनांमध्ये सूज आल्यानंतर त्याची लक्षणं स्पष्ट दिसतात आणि जाणवू देखील लागतात. जेव्हा सूज येते तेव्हा स्तनांच्या रचनेत बदल होतो, त्याच्या सभोवतालच्या त्वचेतही बदल होतो. स्तनाचा भाग भारी वाटू लागतो. इतकंच नाही तर स्तनांना स्पर्श केल्यावर त्यातील उबदारपणादेखील जाणवतो. स्तनांच्या आजूबाजूला स्पर्श केल्याने काही वेळा वेदनाही होतात. स्तनांना सूज नेमकी का येते? स्तनांमध्ये फॅट टिश्यू , मिल्क डक्ट, ग्रंथी आणि कनेक्टिव टिश्यू अशा चार ऊती असतात. या ऊतींमधील बदलांमुळे स्तनांमध्ये सूज येते. जेव्हा चरबीच्या ऊतींमधील द्रवपदार्थाचं प्रमाण असंतुलित होते तेव्हा स्तनांमध्ये सूज येते. रजोनिवृत्तीच्या वेळी देखील हार्मोन्समध्ये बदल होतात, त्यामुळे स्तनांमध्ये सूज येते. मासिकपाळी सुरू होण्यापूर्वीच शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरकांचे उत्पादन देखील वाढतं आणि या बदलाने स्तनाच्या दुधाच्या ग्रंथी वाढतात. ज्यामुळे स्तनाची सूज वाढते. myupchar.com च्या डॉ.मेधवी अग्रवाल यांनी सांगितलं, शरीर प्रामुख्याने पाण्याने बनलेलं असतं आणि जेव्हा शरीरात पाणी अधिक शोषलं जातं, तेव्हा शरीर फुगणं, लठ्ठपणा, सूज येणं अशा समस्या उद्भवणं सामान्य आहे. स्तनांना सूज आल्यास काय करावं? स्तनावरील सूजेपासून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहेत ज्यात प्रथम बर्फाचे तुकडे कपड्यात टाकून काही मिनिटं सूजलेल्या जागी शेकवा. याशिवाय एरंडेल तेल देखील वापरता येते. एरंडेल तेलात असं अॅसिड असतं जे स्तनाचा दाह आणि सूज दूर करण्यास मदत करतं. एक चमचा एरंडेल तेलात साधारण दोन चमचे मिसळा आणि मालिश करा. स्तनांना सूज येण्याची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जर मासिक पाळी दरम्यान संप्रेरक बदलांमुळे ही प्रक्षोभक स्थिती उद्भवली असेल तर डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्या सुचवू शकतात. यामुळेच स्तनात सूज येण्याची लक्षणं कमी होण्यास मदत होते. जर ही सूज संसर्गामुळे झाली असेल तर डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधं देऊ शकतात. जर सूजेचे कारण कर्करोग असेल तर त्याची स्थिती वेळेत ओळखली जाऊ शकते आणि डॉक्टर त्यानुसार थेरपी किंवा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ शकतात. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - स्तनामधील गाठीचे लक्षण, कारणे आणि उपचार न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.