मुंबई, 25 मे : भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात महिलांना ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग होण्याचं प्रमाणही मोठं आहे. शरीरातील काही बदलांवरून ती कॅन्सरची लक्षणं असल्याचं आपल्याला कळू शकतं. त्यामुळे ही लक्षणं कोणती व या साठी खबरदारीचे उपाय कोणते याबद्दल बेंगळुरूतील फोर्टिस हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि हेमॅटो-ऑन्कॉलॉजिस्ट व सीनिअर डायरेक्टर डॉ. नीति कृष्णा रायजादा यांनी माहिती दिली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं
निपलमधून रक्त येणं, निप्पलभोवती फ्लॅकिंग त्वचा, एरिथिमिया म्हणजेच स्तनाची त्वचा लालसर होणं, त्वचेचा रंग निळा किंवा जांभळा दिसणं, लिम्फ नोड्स प्रभावित झाल्यामुळे काखेमध्ये सूज येणं, त्वचेचं टेक्स्चर बदलणं, स्तन किंवा निप्पल सतत दुखणं, स्तनाचा आकार बदलणं ही ब्रेस्ट कॅन्सरशी लक्षणं आहेत.
वयोगटानुसार काय काळजी घ्यावी
वय 20 - 30 वर्षे : स्तनांची स्वतःच तपासणी करणं / जागरूकता
वय 31 - 40 वर्षे : दर 6 महिन्यांनी ऑन्कॉलॉजिस्टद्वारे क्लिनिकल तपासणी
वय 41 - 55 वर्षे: वार्षिक मॅमोग्राम
55 वर्षांच्या पुढे: दोन वर्षांतून एकदा मॅमोग्राम
'या' गोष्टी लक्षात ठेवा
1) बर्याच कारणांनी स्तनात गुठळ्या होऊ शकतात. यापैकी सर्वांत सामान्य म्हणजे फायब्रोसिस्टिक बदल किंवा ब्रेस्ट सिस्ट होय. हे मुख्यतः तरुण स्त्रियांना होतं. यामुळे स्तनात गुठळ्या किंवा वेदना होतात, पण त्यातून कॅन्सर होत नाही.
2) हायर रिस्क कॅटेगरीमध्ये BRCA, PTEN, TP53 इत्यादी आनुवंशिक म्युटेशन असलेल्या पुरुष/स्त्रिया यांचा समावेश होतो. काही कुटुंबांमध्ये अनेकांना कॅन्सर असतो. त्यामुळे कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करण्यासाठी ऑन्कॉलॉजिस्ट किंवा जेनेटिस्टची भेट घ्यावी. बऱ्याचदा चर्चांनतर कारण आनुवंशिक आहे की नाही, यासाठी रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो.
3) छातीत रेडिएशनची पर्सनल हिस्ट्री हॉजकिन्स रोग व काही विशिष्ट परिस्थिती जसं की अॅटिपिकल हायपरप्लासिया किंवा लॉब्युलर कार्सिनोमा इन सिटू जोखीम वाढवते. अशा व्यक्तींना नियमित तपासणीचा सल्ला दिला जातो.
4) बऱ्याच महिलांना स्तनामध्ये गुठळ्या असल्यासारखं वाटतं. हा बदल मासिक पाळी, प्रेग्नन्सी, वजनातील बदल किंवा वयामुळेही होतो. त्यामुळे हे चिंताजनक लक्षण नाही.
5) भारतात तरुण स्त्रियांना (35-50 वर्षांच्या दरम्यान) ब्रेस्ट कॅन्सर होतो, पण याचं कारण अस्पष्ट आहे. काही संशोधक IVF आणि हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपींचा परस्परसंबंधदेखील शोधत आहेत. त्यामुळे महिलांनी शंका असल्यास तपासणी करून घ्यावी.
6) ब्रेस्ट कॅन्सर 1% पुरुषांनाही होतो, त्यामुळे हा फक्त स्त्रियांना होणारा आजार नाही.
7) ब्रेस्ट कॅन्सर हा नेहमीच उपचार करण्यायोग्य असतो आणि तो बरा होतो. त्यामुळे अपारंपरिक उपचार पर्यायांचा शोध घेऊ नका. त्याऐवजी योग्य औषधोपचार घ्या.
8) लिक्विड बायोप्सी, मॉलेक्युलर इमेजिंग आणि इमेजिंग बायोमार्कर्स या नवीन निदान पद्धती जास्त चांगल्या आहेत.
9) OncotypeDx, Mammaprint यासारख्या जेनेटिक टेस्टिंगच्या माध्यमातून कीमोथेरपी नाही, तर फक्त हॉर्मोनल थेरपी घ्यायची हेही डॉक्टरांच्या लक्षात येतं.
10) आपण अवयव-संवर्धनाकडे वाटचाल करत आहोत आणि त्यामुळे कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असताना क्वचित मॅस्टेक्टॉमी केली जाते. बर्याच प्रकरणांमध्ये डॉक्टर स्तन संवर्धनाची शिफारस करतात, ज्याचा उपचारानंतर निरोगी आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांवर सकारात्मक मानसिक परिणाम होतो.
11) नवीन औषधं आणि नवीन टार्गेट्स हा ब्रेस्ट कॅन्सरमधील एक प्रॉमिसिंग एरिया आहे. ज्यामध्ये अँटिबॉडी-ड्रग कॉन्जुगेट्स आणि इम्युनोथेरपी खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
12) ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हरशिप आणि कॅन्सरसह जगणारे लोक, याचाच अर्थ ज्यांनी पूर्वी उपचार घेतले आहेत आणि आता बरे आहेत ही ऑन्कॉलॉजी प्रॅक्टिसची सर्वात आश्वासक बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Cancer, Health, Health Tips, Life18, Lifestyle