मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लेकीचं लग्न ठरवायला आलेल्या व्यक्तीने 40 वर्षीय महिलेला दिलं आपलं हृदय; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

लेकीचं लग्न ठरवायला आलेल्या व्यक्तीने 40 वर्षीय महिलेला दिलं आपलं हृदय; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बिहारमधील रिक्षाचालक लेकीचं लग्न ठरवण्यासाठी दिल्लीला गेला आणि तिथं त्याच्या हृदयामुळे एका महिलेचा जीव वाचला.

नवी दिल्ली, 05 जुलै : बिहारचा एक ऑटोचालक आपल्या लेकीचं लग्न ठरवण्यासाठी म्हणून दिल्लीला गेला. याच दिल्लीत एक महिला कित्येक वर्षांपासून हृदयाची प्रतीक्षा करत होती. लेकीच्या लग्नासाठी स्थळ पाहायला आलेल्या या व्यक्तीमुळे हृदयाची वाट पाहणाऱ्या महिलेची प्रतीक्षा अखेर संपली. या व्यक्तीने तिला आपलं हृदय दिलं. ज्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे (Auto driver donate heart to woman).

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील डेढपुरा गावातील रिक्षाचालक कारू सिंह आपल्या लेकीच्या लग्नासाठी स्थळ पाहायला 30 जूनला दिल्लीत आला. 1 जुलैला तो आपल्या एका नातेवाईकाकडे गेला होता. त्यांच्या घराच्या छतावरून तो पडला. त्यानंतर त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. काही तासांतच त्याच्या मेंदूने काम करणं बंद केलं. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. त्याच्या कुटुंबाने त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला (Organ donation).

हे वाचा - Oh no! BF ने घातली तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी; दुसऱ्या दिवशीच GF वर बोट कापण्याची वेळ

कारूचं हृदय, यकृत आणि किडनी दान करण्यात आल्या. त्याचं यकृत 62 वर्षीय वृद्धाला, तर एक किडनी 56 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली. तर हृदय एका 40 वर्षीय महिलेला देण्यात आलं. ही महिला गेल्या 7 वर्षांपासून हृदयाच्या प्रतीक्षेतच होती.

ज्या महिलेला कारूचं हृदय प्रत्यारोपित करण्यात आलं तिच्या नवऱ्याने सांगितलं, "माझ्या बायकोला हृदयाचा आजार होता. आम्ही 2015 सालापासून हार्ट डोनरची प्रतीक्षा करत होतो. अवयवदान करणाऱ्या कुटुंबाचा हा खूप मोठा निर्णय होता. एक जीव गेला पण त्याने 4 लोकांना नवं आयुष्य दिलं. आता माझ्यासोबत असं काही झालं तर मीसुद्धा अवयवदान करणार आहे"

भारतात अवयवदानाची स्थिती

भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी राहिलं आहे. अंदाजानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेमध्ये 26 अवयवांचं दान केलं जातं. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ 0.65 अवयव दान एवढं कमी आहे. भारतात केवळ 3 टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत.

हे वाचा - आश्चर्य! 4 पाय आणि 4 हातांचं बाळ; 'देवाचा अवतार' समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले...

2019 मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1.5-2 लाख लोकांना दरवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, केवळ 8,000 (4 टक्के) ते करतात. त्याचप्रमाणे दरवर्षी सुमारे 80,000 रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, परंतु त्यापैकी केवळ 1,800 प्रत्यारोपण होतं. त्याच वेळी, सुमारे 1 लाख रूग्णांना दरवर्षी कॉर्निया किंवा नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, अर्ध्याहून कमी रुग्णांना ते मिळतं. हृदयरोगींसाठी देखील, हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या 10,000 पैकी केवळ 200 दात्यांसोबत जुळतात.

First published:

Tags: Lifestyle, Organ donation