नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : गेली सुमारे अडीच वर्षं जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना (Coronavirus) विषाणूची लाट आता आटोक्यात आली असली, तरी अद्याप तो रूपं बदलून कुठे ना कुठे पसरत आहेच. ओमिक्रॉन (Omicron) हा कोरोनाचा व्हॅरिएंट वेगाने सर्वत्र पसरत होता. आता ओमिक्रॉनचा सेंटॉरस (Centaurus) हा सब-व्हॅरिएंट (Sub Variant of Omicron) येत्या काळात जागतिक पातळीवरचा व्हॅरिएंट होऊ शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. भारतात तर या सब-व्हॅरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेतच; पण जगभरात आतापर्यंत सुमारे 20 देशांमध्ये याचा फैलाव झाला आहे; मात्र दिलाशाची बाब अशी, की नागरिकांमध्ये त्याविरोधात चांगली इम्युनिटी असल्याने संसर्गग्रस्तांची संख्या वाढली असली, तरी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागणाऱ्यांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढत नाहीये. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंटपासून बीए-1 आणि बीए-2 असे दोन सब-व्हॅरिएंट्स तयार झाले. बीए-1पासून पुढे एकही व्हॅरिएंट तयार झाला नाही; मात्र बीए-2पासून पुढे चार सब-व्हॅरिएंट्स तयार झाले. त्यात बीए 4, बीए 5, बीए 2.12-1 आणि बीए 2.75 या सब व्हॅरिएंट्सचा समावेश आहे. बीए 2.75 या सब व्हॅरिएंटलाच सेंटॉरस या नावाने ओळखलं जातं.
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, सेंटॉरसच्या संसर्गावर शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेत. कारण जुलै 2022मध्ये या सब-व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या भारतात वाढली होती. तसंच, युरोप आणि आशियातल्या सुमारे 20 देशांमध्ये याचा आतापर्यंत फैलाव झालेला आहे. भारतात मेपासून आतापर्यंत एक हजार नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. त्यापैकी दोन तृतीयांश नमुने बीए 2.75 अर्थात सेंटॉरसचे होते, असं स्पष्ट झालं आहे. त्याखालोखाल बीए 5 च्या नमुन्यांचं प्रमाण होतं, तर अन्य नमुने ओमिक्रॉनच्या अन्य सब-व्हॅरिएंट्सचे होते. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं, की बीए 2.75 अर्थात सेंटॉरस सब व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या दिल्लीत आढळली आहे. आता त्यात वाढ होत नसून, स्थिरता आली आहे. दरम्यान, बीए 2.75 मध्ये ए452आर हे एक म्युटेशन असून, त्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याची भीती वाढते, असं म्हटलं जात आहे. डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर बीए 2.75 हा जागतिक पातळीवरचा व्हॅरिएंट म्हणून उदयाला येत आहे; मात्र हायब्रिड इम्युनिटीमुळे त्याचा फारसा प्रभाव दिसणार नाही, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. संसर्ग झाल्यामुळे तयार झालेली इम्युनिटी आणि लसीकरणामुळे मिळालेली इम्युनिटी अशा एकत्रित इम्युनिटीला हायब्रिड इम्युनिटी (Hybrid Immunity) असं म्हणतात. ऑक्सफर्ड विद्यापीठातले विषाणूतज्ज्ञ शाहिज जमील यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी बीए 2.75 च्या संसर्गाची नवी लाट येण्याची शक्यता आहे; मात्र आपण आता अशा ठिकाणी आहोत, की हे सर्व व्हॅरिएंट्स एकमेकांसोबत स्पर्धा करत आहेत. त्यांची संख्या जवळपास सारखी आहे. त्यामुळे ज्यांना बीए 5 चा संसर्ग झाला आहे, त्यांना बीए 2.75 चा संसर्ग होण्याची शक्यता नाही, असं त्यांना वाटतं.