मुंबई, 13 जून : पावसाळा तोंडावर आलाय. येत्या 8-10 दिवसांतच मान्सून संपूर्ण भारतभर पसरेल. यामुळे उन्हाचा चटका कमी होईल; पण पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या सुरू होतील. पावसाळ्यात दुचाकीस्वारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. रस्त्यातले खड्डे, चिखल यामुळे रस्ते निसरडे झालेले असतात. त्यात दुचाकी घसरण्याची शक्यता जास्त असते. तसंच पाणी जाऊन दुचाकी बंदही पडू शकते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी मान्सूनमध्ये बाइक चालवताना अधिक काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी दुचाकीची स्वच्छता व दुरुस्तीची कामं पूर्ण केली पाहिजेत. त्याबद्दलची अधिक माहिती घेऊ या. शक्यतो पावसाळा सुरू होण्याआधीच दुचाकीचं सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. यामुळे पावसाळा संपेपर्यंत दुचाकीमध्ये बिघाड होण्याची शक्यता कमी होते. दुचाकीसंदर्भातल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर पावसाळ्यासाठी तुम्ही तयार राहू शकता. बाइक किंवा स्कूटरचा टायर घासून घासून गुळगुळीत झाला असेल, तर पावसाळ्यापूर्वी तो जरूर बदलून घ्या. टायर घासल्याने खिळा किंवा इतर टोकदार गोष्टी घुसून पंक्चर होण्याची शक्यता जास्त असते. ओल्या रस्त्यांवर अशा टायरला चांगली पकड मिळत नाही. त्यामुळे गाडी स्लिप होण्याचा धोका असतो. नवे टायर कोरड्या किंवा ओल्या रस्त्यांवर गाडीला चांगली पकड देतात. त्यामुळे गाडी घसरत नाही. दुचाकी चालवताना गाडीचे सगळे इंडिकेटर्स चालू असणं गरजेचं असतं. रस्त्यांवर आजूबाजूच्या वाहनांना संकेत मिळण्यासाठी गाडीचे इंडिकेटर्स मदत करतात. इंडिकेटरचे बल्ब तुटले/फुटले असतील, तर ते बदलून घ्या. पावसाळ्यात रस्त्यावरची दृश्यमानता कमी झालेली असते. दुचाकीचे हेडलाइट किंवा टेललाइट लावून तुम्ही दृश्यमानता वाढवू शकता. हे लाइट्स खराब झाले असतील, तर पावसाळ्याआधीच ते बदलून घ्या. यामुळे अपघाताचा धोका कमी होईल. बाइक किंवा स्कूटरचं सर्व्हिसिंग करताना ब्रेक व्यवस्थित आहेत ना, याची खात्री करून घ्या. पावसाळ्यात ब्रेक खराब झाले असतील, तर ते महागात पडू शकतं. ब्रेक जास्त घट्ट असतील, तर ओल्या रस्त्यावर गाडी घसरू शकते. तसंच ब्रेक सैल असतील, तर गाडी योग्य वेळी थांबणार नाही. म्हणूनच सर्व्हिसिंग करताना ब्रेकची तपासणी नक्की करून घ्या. गाडीला अपघात झाल्यास डोकं सुरक्षित ठेवण्याचं काम हेल्मेट करतं. त्यामुळे हेल्मेट घालणं गरजेचं असतं. हेल्मेट योग्य पद्धतीनं घालणंही तितकंच जरूरीचं असतं. हेल्मेट घातल्यावर स्ट्रिप लॉक लावणं गरजेचं असतं. यामुळे हेल्मेट डोक्यावरून निघत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.