नवी दिल्ली 23 डिसेंबर: फूलपूरमधील (Phoolpur) इफको युरिया युनिटमध्ये (IFFCO Urea Unit) अमोनिया वायू गळती झाली आहे. या अपघातात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पाहता योग्य ती खबरदारी न घेतल्यास हा वायू जीवघेणा ठरु शकतो. फूलपूरमध्ये (Phoolpur) अमोनिया वायू गळतीमुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इफकोमधील युरिया युनिटमध्ये मंगळवारी रात्री वायू गळती झाल्याने ही घटना घडली आहे.
अमोनिया वायू गळतीची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील देशात अशा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमी अमोनिया म्हणजे काय, त्यामुळे काय नुकसान होते तसेच वायू गळती रोखण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.
अमोनिया म्हणजे काय आणि त्याचे उपयोग
अमोनिया हा तीव्र वास असलेला रंगहीन आणि हलका वायू असतो. पाण्यात विरघळलेल्या अमोनियाला लिकर अमोनिया म्हणतात. अमोनियाचे अनेक उपयोग आहेत. प्रामुख्याने याचा उपयोग रासायनिक खतांच्या निर्मितीकरता केला जातो. यात युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम फास्फेट, अमोनियम नायट्रेट आणि सोडीअम कार्बोनेट हे प्रमुख घटक असतात. याशिवाय बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात याचा शीतकरण सामुग्री म्हणून उपयोग केला जातो. प्रयोगशाळेत प्रतिकारक म्हणून तर कपड्यांवरील तेलकट किंवा ग्रीसचे डाग काढण्याकरिता याचा घरगुती वापर केला जातो.
खत निर्मितीत (Fertilizers Production) अमोनियाचा सर्वाधिक वापर केला जातो. जगभऱातील 80 टक्के अमोनिया (Ammonia) हा खत निर्मितीकरीता लागतो. त्यातही युरिया निर्मितीसाठी याचा सर्वाधिक उपयोग होतो. युरियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन अमोनिया आणि द्रवरुप कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रक्रियेव्दारे केलं जातं. हीच प्रक्रिया फूलपूरमधील युरिया उत्पादन युनिटमध्ये वापरली जाते. युरिया हा कार्बोनिक घटक आहे. तो रंगहीन, गंधहीन, पांढरा आणि रवाळ विषारी पदार्थ आहे. तो अमोनिया प्रमाणेच पाण्यात सहज विरघळतो. यामुळे शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते.
सामान्यपणे अमोनिया नुकसानकारक नसतो. पण जास्त प्रमाणात त्याचा वास घेतल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. हवेत प्रमाणापेक्षा जास्त अमोनिया मिसळल्यास श्वास गुदमरतो तसेच नाक, घसा आणि श्वासनलिकेत जळजळ होते. सातत्याने या वायूच्या संपर्कात राहिल्यास त्वचा जळणे, दृष्टी कमजोर होणे किंवा डोळ्यांवर परिणाम होऊन कायमचे अंधत्व येऊ शकते.
अमोनिया गळतीपासून सावधान
अमोनियाच्या संपर्कात आल्यास चेहरा आणि डोळे पुरेश्या पाण्याने स्वच्छ धुवावेत असा सल्ला देण्यात येतो. अमोनिया (Ammonia) हा पाण्यात लवकर विरघळत असल्याने पाण्याने चेहरा किंवा डोळे धुतल्यास अमोनिया पाण्यात विरघळून अवयवांवरुन निघून जातो आणि त्याचा घातक परिणाम होत नाही.
अमोनियाचे (Ammonia) उत्पादन आणि औद्योगिक उपयोग हा केवळ भारतातच नाही तर तो अनेक मोठ्या देशांमध्ये कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. जगात अमोनियाचे सर्वाधिक उत्पादन चीन करतो. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. तसेच युरोप आणि अमेरिकेत देखील मोठ्या प्रमाणात अमोनियाचे उत्पादन होते.
अमोनिया (Ammonia) विषारी वायूंप्रमाणेच परिणाम दर्शवतो. परंतु, त्याची उपयुक्तता बघता त्याला नाकारुन चालत नाही. औद्योगिक क्षेत्रातील अमोनिया गळती (Ammonia Leak) हे निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाते. तांत्रिक बिघाडामुळे किंवा मानवी चुकीमुळे अमोनिया गळती झाली आहे का याचा देखील यावेळी तपास केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gas